बेळगाव, कारवार, निपाणीसह सीमावर्ती भागातील समस्त मराठीभाषिक मुलुख महाराष्ट्रात सामील झाला पाहिजे, ही महाराष्ट्राची गेली पन्नासहून अधिक वर्षे जुनी मागणी. त्यासाठी अनेकदा आंदोलनं झाली. आजही महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सीमाभागातील काही संघटना या मागणीचा सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. मात्र, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. दोन्ही बाजूंची तिथेच खरी कसोटी लागणार आहे. असे असताना उगीच बेटकुळ्या दाखविण्यात अर्थ नाही. कर्नाटकचे एक तोंडाळ मंत्री रोशन बेग यांनी एकलेचे तारे तोडले म्हणून त्यांना ‘जय महाराष्ट्र’ घालण्याचा उठवळपणा करण्याची दिवाकर रावते आणि दीपक सावंत या शिवसेना नेत्यांना काही गरज नव्हती. महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगावात आयोजित केलेल्या मोर्चात सहभागी व्हायचेच होते, तर गनिमीकावा करता आला असता. मात्र, रावतेंना प्रसिद्धीचा सोस भारी ! कोल्हापुरात पोहोचताच त्यांनी ‘बातमी’ देऊन कर्नाटकची पोलीस यंत्रणा जागी केली. निपाणीच्या अलीकडेच त्यांना अडविले गेले. तिथेच ‘जय महाराष्ट्र’ ठोकून रावते परतले ! कधीकाळी सीमाप्रश्न हा शिवसेनेचा अस्मितेचा विषय होता. बाळासाहेब ठाकरे यांनी या प्रश्नावर नेहमीच सडेतोड भूमिका घेतली. इंदिरा गांधी, मोरारजी देसाई, यांची गय केली नाही. स्वत: आंदोलनात उतरले. १९६९ साली मुंबईत आलेले उपपंतप्रधान मोरारजी देसाई यांची गाडी शिवसैनिकांनी अडविली. पोलिसांनी लाठीमार केला आणि ठिणगी पडली. बाळासाहेबांना अटक झाली. मुंबई पेटली. १९८७ साली छगन भुजबळांनी बेळगावात केलेलं आंदोलन तर आजही स्मरणात आहे. बाळासाहेब ठाकरे, एस. एम. जोशी, एन. डी. पाटील, शरद पवार हे नेते बेळगावात सत्याग्रह करणार होते. पूर्वतयारीची जबाबदारी भुजबळांकडे होती. पण भुजबळांना बेळगावामध्ये पाय ठेवू देणार नाही, अशी भूमिका कर्नाटक सरकारने घेतली. सीमाभागात प्रचंड पोलीस फाटा तैनात करण्यात आला. भुजबळांनी शक्कल लढवली. वेशांतर करून आणि लोखंडी पाइपचा कारखानदार बनून त्यांनी बेळगावात प्रवेश मिळवला. पोलिसांच्या नाकावर टिच्चून त्यांनी तिथं मोठं आंदोलन केलं. अटक झाल्यानंतर त्यांची खरी ओळख पटली. भुजबळांच्या तोडीचा एकही नेता सध्या शिवसेनेत उरलेला नाही. त्यामुळे तोंडदाखले आंदोलन करून नामुष्की ओढावून घेण्याची पाळी आली. वाघांचे वाघरू झाले की असेच होते !
तोंड दाखवून अवलक्षण
By admin | Published: May 26, 2017 1:32 AM