गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये कोरोना लॉकडाऊन सुरू असताना मुंबई शेअर बाजाराचानिर्देशांक- सेन्सेक्सने ६२ हजार २४५ या सर्वोच्चांकाला स्पर्श केला होता. त्यानंतर, मात्र, कोरोना संकटात रुतलेले अर्थचक्र नोव्हेंबर २०२१पासून पुन्हा बाहेर येत आहे असे वाटत असतानाच जागतिक पातळीवर इंधनाच्या किमतीमध्ये लक्षणीय दरवाढ झाली, पाठोपाठ रशिया आणि युक्रेन युद्धाने डोके वर काढले आणि पाहता पाहता साऱ्या जगाचे अर्थकारण एका संभ्रमित वळणावर येऊन गंटागळ्या खाऊ लागले.
जगाच्या अर्थकारणात आता पहिल्या सहामध्ये आलेल्या भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थेवर याचे परिणाम उमटले नसते तरच नवल होते. मात्र, यावेळी परिस्थिती थोडी वेगळी आहे. आजवर जागतिक अर्थकारणातील धक्क्यांनी हलणारी भारतीय अर्थव्यवस्था यावेळी तितकीशी हलली नाही किंवा त्या धक्क्यांतही भारतीय अर्थव्यवस्था देशांतर्गत अर्थकारणात येणाऱ्या मजबुतीमुळे काहीसा भक्कम टिकाव धरून आहे. त्यामुळेच सेन्सेक्सने पुन्हा एकदा ६० हजारांचा टप्पा पार केला आहे. त्यातही विशेष असे की, भारतीय शेअर बाजारातील आजवरचा सर्वात प्रमुख घटक मानल्या जाणाऱ्या परकीय वित्तीय संस्थांना सध्या अमेरिका खुणावते आहे.
अमेरिकेने तेथील व्याजदरात वाढ केल्यामुळे अनेक परकीय वित्तीय संस्थांनी अमेरिकेकडे कूच केले आहे. मात्र त्याचवेळी देशी वित्तीय संस्था, हाय नेटवर्थ व्यक्ती आणि सामान्य गुंतवणूकदार यांना मात्र भारतीय अर्थव्यवस्थेचे भविष्य उज्ज्वल वाटत असल्यामुळे त्यांचा बाजारातील उत्साह कमी झालेला नाही. आजवरच्या सर्वोच्चांकापासून दोन हजार अंश दूर असलेला सेन्सेक्स येत्या १५ दिवसांत कदाचित नवा विक्रमही नोंदवेल. भारताच्या देशांतर्गत घडामोडींचा त्या सर्वोच्चांकावर अधिक प्रभाव राहील.
रशिया-युक्रेनच्या युद्धामुळे जागतिक चलन मानल्या जाणाऱ्या अमेरिकी डॉलरमध्ये मोठ्या प्रमाणावर उलथापालथी झाल्या. इंधनाच्या किमतीही वारेमाप वाढल्या. इंधनाच्या बाबतीत परावलंबित्व असलेल्या भारताला याचा मोठा फटका बसणार हे वाढलेल्या महागाईतून स्पष्ट झाले. मात्र, त्याचवेळी अर्थव्यवस्था सावरण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय वेगाने घेतले गेले. त्यामुळे अर्थव्यवस्था सावरण्यास मदत होताना दिसते. यामध्ये गेल्या तीन पतधोरणाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या दरवाढीमुळे चलनवाढीला ब्रेक लागताना दिसत आहे. याचा परिणाम म्हणजे, किरकोळ महागाई आटोक्यात येते आहे.
इंधन हा भारतीय अर्थव्यवस्थेत कळीचा मुद्दा. त्यामुळे चलनवाढ आटोक्यात आणण्यासाठी पावले उचलणाऱ्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कृतीला पूरक म्हणून सरकारने इंधनावरील करात कपात केली. पेट्रोल, डिझेल पुरतीच ही कपात मर्यादीत न ठेवता नैसर्गिक गॅस आणि अन्य गॅसोलिन उत्पादनांमध्येदेखील कपात केली. त्यामुळे आता सामान्यांच्या खर्चात बचत होऊन त्यांची क्रयशक्ती वाढण्यास पुन्हा नवीन बळ प्राप्त होणार आहे. शेअर बाजारात जेव्हा जेव्हा अशा सकारात्मक घडामोडी होतात, त्यावेळी सर्वसामान्य माणूस व्यथित होताना दिसतो. हा विरोधाभास एवढ्याचसाठी की, त्याच्या आजूबाजूचे मित्र, नातेवाईक यांच्या संपत्तीमध्ये त्याला वाढ होताना दिसते. मात्र, आपण काहीच केले नाही अथवा आपण कधी श्रीमंत होणार या भावनेने तो ग्रासला जातो.
अशा स्थितीत राकेश झुनझुनवाला यांचे एक वाक्य इथे नीट समजून घ्यायला हवे. ते म्हणत, बाजारात गुंतवणूक करण्याची योग्य वेळ कोणती असे मला जेव्हा विचारले जाते तेव्हा मी सांगतो की, तुम्हाला ज्यावेळी गुंतवणूक करावीशी वाटेल तीच योग्य वेळ आहे आणि तुम्ही कधी गुंतवणुकीस सुरुवात केली हे महत्त्वाचे नसून किती काळ गुंतवणूक टिकवून ठेवली हे महत्त्वाचे आहे. याचाच अर्थ, आज जरी तुम्ही गुंतवणुकीस सुरुवात केली आणि त्यामध्ये सातत्य तसेच दीर्घकालीन दृष्टिकोन असेल तर तुम्हाला मिळणारा परतावा हा तुमच्या दारी श्रीमंतीचे रेड कार्पेट टाकल्याशिवाय राहणार नाही. त्या यशाची फळे आपल्यालाही चाखायला मिळतील.
भांडवली बाजार हे भावनेवर चालतात. मात्र, या भावनांमागे विद्यमान स्थितीत होणाऱ्या घडामोडींचे भविष्यवेधी विश्लेषण गरजेचे असते. त्यामुळेच भारतीय बाजारात झालेल्या इंधनाच्या किमतीमधील कपात लक्षात घेता आगामी काळात सर्वसामान्यांपासून महाकाय कॉर्पोरेट कंपन्यांपर्यंत साऱ्यांच्याच खर्चात होणारी बचत आणि बचतीद्वारे उपलब्ध पैसा वैयक्तिक समृद्धीपासून ते गुंतवणुकीपर्यंत वापरला जाईल, या आशेच्या भावनेवर सेन्सेक्सचा वारू पुन्हा फुरफुरताना दिसतो आहे.