मनोरंजनात्मक चित्रपट करतानाच त्याला एखाद्या सामाजिक विषयाची जोड दिली, तर तो चित्रपट जास्त ‘अपील’ होऊ शकतो, असा प्रकार आतापर्यंत बऱ्याच चित्रपटांनी हाताळला आहे. ‘शिनमा’ हा चित्रपटही त्याहून वेगळा नाही. पण दुष्काळ आणि पाणी प्रश्नाची मांडणी करतानाच या चित्रपटात गांभीर्य आणि विनोदाची सरमिसळ झाली आहे. तसे झाले नसते, तर हा एक महत्त्वाचा सामाजिक चित्रपट ठरू शकला असता.‘सिनेमातला सिनेमा’ असा या चित्रपटाचा थाट आहे. के. वासू या मुळातल्या उत्तम माहितीपट बनवणाऱ्या दिग्दर्शकाच्या पुढे नियतीच्या फेऱ्यामुळे ‘सी-ग्रेड’चे चित्रपट बनवण्याची वेळ आलेली असते. त्यातच हिंदीतला ‘शोले’ हा चित्रपट मराठीत तयार करण्याची त्याला कल्पना सुचते. त्यानुसार तो व त्याचा सहकारी पंकज, एका निर्मात्याला पटवून चित्रपटाची सगळी टीम तयार करतात. धूळपाटी या दुष्काळी गावात चित्रपटाचे शूटिंग करायचे ठरते. पण तिथे शूटिंग करतानाच के. वासूच्या संपर्कात आलेला तिथला सामाजिक कार्यकर्ता गावातल्या पाणी प्रश्नाला चित्रपटातून वाचा फोडण्यासाठी गळ घालतो. आयत्या वेळी अंगावर आलेले हे प्रकरण के. वासू दूर करण्याचा आटोकाट प्रयत्न करतो; पण शेवटी तो हा प्रश्न चित्रपटात घेतो. शूटिंगच्या सेटवर निर्माण होणारे हलकेफुलके प्रसंग आणि सोबत पाणी प्रश्नाचा केलेला गंभीर ऊहापोह असा बाज या चित्रपटाने स्वीकारला आहे.चित्रपटाचा विषय तसा चांगला असला तरी कथा, पटकथा व दिग्दर्शन अशी जबाबदारी सांभाळणाऱ्या मिलिंद कवडे यांनी त्याला सिनेमाच्या शूटिंगचे जे कोंदण दिले आहे, त्याची आवश्यकता वाटत नाही. केवळ मनोरंजनाची पेरणी असावी म्हणून हा खटाटोप त्यांनी केला असावा. या चित्रपटातून दिग्दर्शकाला पाणी प्रश्नावरच ठामपणे बोलायचे आहे हे स्पष्ट होत असताना, त्याला विनोदाची फोडणी देण्याची गरज नव्हती. यातल्या व्यक्तिरेखांच्या तोंडून दिग्दर्शक दुष्काळाचे भीषण वास्तव वदवून घेत असताना, यात पेरलेले विनोद ओढूनताणून निर्माण केले गेल्याचे स्पष्ट होत जाते. यातले काही प्रसंग अनावश्यक वाटतात. या चित्रपटातले आयटम साँग कितीही चांगले झाले असले, तरी ती या चित्रपटाची गरज ठरू शकत नाही.या सिनेमातल्या सिनेमाचा दिग्दर्शक के. वासू याच्या भूमिकेत अजिंक्य देव याने एकहाती कामगिरी बजावली आहे आणि त्याने त्याच्या अनुभवाच्या जोरावर या भूमिकेला चांगला न्याय दिला आहे. त्याला विजय पाटकर यांची योग्य साथ लाभली आहे. यतीन कार्येकर, किशोरी शहाणे, आनंदा कारेकर, गुरलीन चोप्रा, गणेश यादव, अंशुमन विचारे, सौरभ गोखले या व अशा कलाकारांची मोठी फळी चित्रपटात आहे आणि त्यांनी त्यांचे योगदान या चित्रपटात दिले आहे. विनोद व सामाजिक प्रश्न या दोन बाबींत या चित्रपटाचा गोंधळ झाला आहे; अन्यथा दुष्काळ या विषयावर एक चांगला सामाजिक चित्रपट यातून निर्माण होणे अवघड नव्हते.
गांभीर्य आणि विनोदाची सरमिसळ!
By admin | Published: November 28, 2015 1:06 AM