हरीष गुप्ता
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची भाजपकडून प्रतिदिन समाजमाध्यमे किंवा इतरत्र सापडेल तेथे थट्टा होत असली तरी त्यांच्या पक्षात मात्र राहुल यांना प्रचंड मागणी आहे. राहुल यांचे राजकीय व्यवहार आणि कार्यालय सांभाळणाऱ्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस पक्षाने लोकसभेची उमेदवारी दिलेले अनेकजण राहुल यांनी आपल्या मतदारसंघात प्रचाराला यावे यासाठी आतुर आहेत. प्रियंका गांधी वाड्रा यांनाही मोठी मागणी आहे. अलीकडेच एका काँग्रेस नेत्याला राहुल गांधी यांची मिनिटभराची भेट हवी होती. परंतु ती घडवून न आणल्यामुळे हे नेताजी कुरकुर करू लागले तर राहुल गांधी यांचे सहाय्यक त्यांच्यावरच भडकले. हे ज्येष्ठ नेते दिल्लीमधले होते आणि गेल्या महिनाभरापासून ते राहुल यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत होते. सहाय्यक महोदयांनी त्यांना सांगितले की, जवळपास सातशेहून अधिक नेत्यांना राहुल गांधी यांची भेट घ्यावयाची आहे. परंतु ते निवडणूक प्रचार आणि इतर महत्त्वाच्या कामात अत्यंत व्यग्र आहेत.
काँग्रेसचे माध्यम प्रभारी जयराम रमेश यांनी नुकतीच समाजमाध्यमांवर एक पोस्ट टाकली. मिलिंद देवरा यांनी आपल्याशी फोनवर बोलून राहुल गांधी यांच्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची शिवसेना दावा सांगत असल्याबद्दल त्यांना चिंता व्यक्त करावयाची होती. तसे पाहता मिलिंद देवरा हे राहुल गांधी यांच्या जवळचे मानले जात असताना त्यांना त्यांच्याशी थेट बोलता आले नाही, याविषयी पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
भाजपची डोकेदुखी
केरळमधील ख्रिश्चनबहुल लोकसंख्या असलेल्या अनेक मतदारसंघात भाजपच्या नेतृत्वाला गंभीर प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. पंतप्रधान मोदी यांनी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक पावले उचलली. धार्मिक नेत्यांना आपल्या घरी बोलावले. तरीही समस्या होत्या तशाच आहेत. पोप फ्रान्सिस यांना गेल्या कित्येक वर्षात प्रथेप्रमाणे बोलावले गेले नाही, याबद्दलही नाराजी आहे. निमंत्रण पाठविण्यात आल्यानंतर उभयंताना सोयीचे जावे अशा रीतीने भेटीची वेळ ठरवली जात आहे, असा खुलासा सरकार पक्षाकडून करण्यात आला.
अल्पसंख्याकांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी अल्पसंख्याक शिक्षण संस्थांचा राष्ट्रीय आयोग स्थापन करण्यात आला. परंतु गेली काही वर्षे केवळ एका सदस्यावर तो चालवला जात आहे. तीन जणांची नियुक्ती केली गेलेली नाही, यावरही ख्रिश्चन नाराज आहेत. गेल्या आठ वर्षांपासून आयोगावर ख्रिश्चन सदस्य नेमण्यात आलेला नाही. शाहीद अख्तर हेच एकटे सध्या या आयोगाचे सदस्य आहेत. एकंदरीत ख्रिश्चन समाज आणि प्रामुख्याने कॅथॉलिक चर्च हजारोंच्या संख्येने असलेल्या शिक्षणसंस्था चालवते. एकट्या कॅथॉलिक चर्चकडे ५० हजार संस्था आणि ६ लाख विद्यार्थी आहेत.
राघव चढ्ढा कुठे आहेत?माध्यमांचे आवडते राघव चढ्ढा महिनाभरापासून बेपत्ता आहेत. डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी पत्नी परिणिती चोप्रासह ते लंडनला गेले असे सांगितले जाते. परंतु ‘इंडिया फोरम २०२४’ आणि इतरही काही कार्यक्रमात ही जोडी दिसली. ‘दिल्ली जल बोर्डा’च्या चौकशीत चढ्ढा यांचे नाव येण्याच्या शक्यतेमुळे ते भारतात परत येणे लांबवत असल्याची चर्चा आहे. २ लाखाच्या लाच प्रकरणी ईडीच्या आरोपपत्रात अजूनपर्यंत तरी चढ्ढा यांचे नाव नाही. परंतु चढ्ढा यांना चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे. परिणीती चोप्रा यांच्या भगिनी प्रियांका चोप्रा यांचेही सत्ता वर्तुळात निकटचे संबंध असून प्राप्त संकटातून काही मार्ग काढता येतो काय, या प्रयत्नात त्या आहेत, असे म्हणतात. वरुण गांधी यांचे कोडे
भाजपने वरुण गांधी यांना लोकसभेची उमेदवारी नाकारली आणि त्यांच्या मातोश्री मनेका यांना मात्र दिली, असे का? अनेकांना हा प्रश्न गोंधळात टाकत आहे. वरुण गांधी यांना २०२१ मध्ये मोदी मंत्रिमंडळात प्रवेश मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी केलेल्या काही विधानांची किंमत त्यांना मोजावी लागली, असे अनेकांचे म्हणणे आहे. वरुण गांधी यांना राज्यमंत्रीपद देऊ करण्यात आलेले होते. परंतु त्यांनी सुचवले की, स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्रीपद मिळाले तर आपल्याला आपली कार्यक्षमता सिद्ध करता येईल. २०१९ साली मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळात मनेका गांधी यांचा मंत्रिमंडळातील प्रवेश हुकला होता. तेव्हापासून मनेका यांनी तोंड बंद ठेवले आणि पक्षाने त्यांना दिलेले काम मुकाट्याने केले. परंतु वरुण यांना ते साधले नाही. काँग्रेसमधील गांधी कुटुंबाच्या एखाद्या सदस्याविरुद्ध आपण निवडणूक लढवणार काय? असे वरुण यांना विचारण्यात आले होते, असेही बोलले जाते. परंतु या माहितीला दुजोरा मिळू शकलेला नाही. वरुण यांनी नकार दिला नाही, पण उत्सुकताही दाखवली नाही असे म्हणतात. उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर वरुण गांधी आता मौन राखून आहेत. ‘आपल्यासाठी माझ्या घराचे दरवाजे उघडे आहेत’ असे एक भावपूर्ण पत्र त्यांनी पिलीभीतमधल्या मतदारांना पाठवले आहे इतकेच.
(लेखक लोकमतमध्ये नॅशनल एडिटर आहेत, नवी दिल्ली)