डॉ. प्रकाश कोठारी 50 वर्षांपेक्षा अधिक काळ लैंगिक विषयाचे तज्ज्ञ म्हणून कार्यरत असून, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेक्सॉलॉजिस्ट म्हणून प्रख्यात आहेत. त्यांच्या आरोग्य सेवेची दखल घेऊन 2002 साली त्यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, ज्यावेळी लैंगिक शिक्षण या विषयावर कुणी बोलायला धजावत नव्हते. त्यांनी 2004 मध्ये लैंगिक शिक्षण कशा पद्धतीने देता येईल, याचा मसुदा तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना तयार करून दिला होता आणि लैंगिक शिक्षण काळाची गरज असल्याचे अधोरेखित केले होते.
आजही आपल्याकडे लैंगिकता या विषयावर मोकळेपणाने चर्चा होत नाही.- हे खरंय. आजही आपल्याकडे अनेक जण या विषयावर फारसे मोकळेपणाने बोलत नसले तरी याबाबत काही प्रमाणात जनजागृती होण्यास सुरुवात झाली आहे. ज्यावेळी या विषयावर फारसे कुणी बोलत नव्हते, त्यावेळी मी १९८५ मध्ये लैंगिकता विषयावरील ७ वी जागतिक वैद्यकीय परिषद भारतात आयोजित केली होती. त्यावेळी तत्कालीन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री विठ्ठल गाडगीळ यांच्या हस्ते त्या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यावेळी दूरदर्शनवर याची विस्तृत माहिती प्रसारित करण्यात आली होती. त्यानंतर १९९१ मध्ये पहिली ऑर्गझम या विषयावरील वैद्यकीय परिषद आयोजित करण्यात आली. त्यावेळी प्रख्यात साहित्यिक मुल्कराज आनंद, प्रसिद्ध नृत्यांगना प्रतिमा बेदी आणि जगप्रसिद्ध सतार वादक पंडित रवीशंकर यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी तत्कालीन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री वसंत साठे यांनी उद्घाटनपर भाषण केले होते. या दोन्ही वैद्यकीय परिषदांमध्ये लैंगिकता विषयावर शास्त्रीय पद्धतीने चर्चा घडवून आणली. तसेच २००४ मध्ये या विषयावर आणखी एक परिषद आयोजित केली होती.
सध्याच्या काळात लैंगिक शिक्षणाची गरज आहे काय? - सध्याचे युग हे इंटरनेटचे युग आहे. सर्व गोष्टी इंटरनेटवर उपलब्ध आहेत. त्यात चांगल्या आणि वाईट गोष्टीही आहेत. त्यामुळे त्यातील चांगले काय हे जाणून घेण्यासाठी लैंगिक शिक्षणाची गरज आहे. ज्याकडे या विषयाचे ज्ञान आहे, तो चांगल्या गोष्टी घेऊ शकतो. मात्र, ज्याच्याकडे नाही, तो वाईट गोष्टींचा स्वीकार करतो. त्यामुळे त्या व्यक्तीच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लैंगिक शिक्षण हे शालेय वयातच दिले पाहिजे. मुला-मुलींमध्ये यौवनावस्था येण्यापूर्वीच लैंगिक शिक्षण देणे गरजेचे आहे. भारतात वाढती लोकसंख्या, लैंगिक शिक्षणाअभावी एड्सचा प्रादुर्भाव वाढला आहे. या दोन्हींवर नियंत्रण मिळविण्यासाठी लैंगिक शिक्षण हा एकमेव पर्याय आहे. माझ्या यूट्युब चॅनेलवर अनेक व्हिडीओ आहेत, ते पाहिले तरी सर्व गोष्टी माहिती होतील.
लैंगिक शक्तिवर्धक औषधांचा अतिरेक हा सध्या चर्चेचा विषय झाला आहे? ही औषधे कुणीही घेऊ शकतो का? - सध्या बाजारात लैंगिकता वाढण्याच्या नावाखाली अनेक औषधे मिळत आहेत. त्यामध्ये अनेक वेळा फसवणूकसुद्धा होत असते. त्यामुळे ज्या व्यक्तींना या औषधांची गरज आहे, त्यांनी प्रथम वैद्यकीय सल्ला घ्यावा. डॉक्टरांनी सांगितलेली औषधे, आहे त्या प्रमाणातच घ्यावीत. त्यांचा अतिरेक करू नये. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. ज्या व्यक्तींना लैंगिक समस्या आहेत त्यांच्या काही वैद्यकीय चाचण्या केल्या जातात. त्यानंतर त्यांना गरजेनुसार औषधे दिली जातात. त्यामुळे कोणत्याही लैंगिक समस्यांशी निगडित औषधे घेताना त्यांची डॉक्टरांकडूनच खात्री करून घ्या.
लैंगिक समस्या घटस्फोटाचे एक कारण आहे? भारतातील पहिला लैंगिक विकार औषध विभाग केईएम रुग्णालयात ४० वर्षांपूर्वी सुरू केला. तेथे सुरुवातीला कुणीही येत नव्हते. मात्र, त्याच ठिकाणी मी माझ्या काळात ५५ हजार रुग्ण तपासले आहेत. त्या ठिकाणी पुरुषांनंतर महिलाही उपचारासाठी येऊ लागल्या होत्या. माझ्याकडे लैंगिक समस्यांमुळे घटस्फोटाची प्रकरणेसुद्धा येत होती. कारण घटस्फोटांमध्ये लैंगिक समस्या एक महत्त्वाचे कारण आहे. आतापर्यंत ४५० जोडप्यांचा घटस्फोट वाचविला आहे. योग्य औषधोपचारांनंतर त्यांच्या समस्यांवर मात केली आहे.
लैंगिक समस्या होऊ नये, म्हणून काय केले पाहिजे? पहिले म्हणजे मद्यपान आणि धूम्रपान यांच्यापासून दूर राहा. नियमितपणे योग्य आहार घ्या. रोज व्यायाम करा. जीवनशैली उत्तम ठेवा. कोणताही त्रास होणार नाही.
लैंगिक शिक्षणाला कोणत्याही साहित्य प्रकारात का जवळ केले जात नाही?लैंगिक शिक्षणाबद्दल आज आपण बोलतोय. मात्र, या विषयाला फार मोठा इतिहास आहे. मानवी भावभावना आणि लैंगिक संबंध याविषयी प्रसिद्ध शायरांनी शायरी केल्या आहेत. शेरोशायरी वाचण्याची मला आवड आहे. अनेक खतनाम शायर आणि त्यांच्या शायरीतून त्याचे वर्णनही केले आहे. जाँनिसार अख्तर त्यांच्या एका शायरीत वेगळं काय सांगतात - जुल्फें, सीना, नाफ, कमरएक नदी में कितने भंवरत्याचप्रमाणे, अहमद फराज लिहितात - बर्बाद करने के बहुत रास्ते थे फराज,न जाने उन्हें मुहब्बत का ख्याल क्यूँ आया...
(मुलाखत : संतोष आंधळे)