राजर्षी शाहू महाराज यांच्या अठ्ठावीस वर्षांच्या राज्य कारभाराचा प्रत्येक निर्णय क्रांतिकारी ठरला आहे. त्या अठ्ठावीस वर्षांच्या कालखंडाची शताब्दी चालू आहे. विसाव्या शतकाचा प्रारंभ झाला, तेव्हा राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याचा विधायक धडाका कोल्हापूर संस्थानात चालू होता. आज आपण एकविसाव्या शतकाच्या आरंभात आहोत आणि समाजाच्या सर्वांगीण सुधारणांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याची चर्चा करतो आहोत. हाच विचार शंभर वर्षांपूर्वी राजर्षी शाहू महाराज यांनी केला. त्यांची प्रत्येक कृती ही समाजाच्या विकासाचा पाया घालणारी ठरली आहे. त्यामुळे राजर्षी शाहू महाराज यांचे विचार, कृती आणि धोरणांत्मक निर्णय याचा अनेक वर्षे अभ्यास चालू आहे. शाहू महाराज यांच्या विचारांचा प्रसार हा एक सामाजिक चळवळीचा भाग बनून राहिला आहे. कोल्हापूरच्या महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीने ही चळवळ अविरतपणे चालू ठेवली आहे. या प्रबोधिनीचे संस्थापक संचालक इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांनी शाहू महाराज यांच्या कार्याचे आदर्श मॉडेल मानव जातीच्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचविण्याचा चंग बांधला आहे. इतिहासाचे संशोधन हे समाज उन्नतीसाठी प्रबोधन करणारे असावे, ते संशोधन केवळ सनावळी किंवा इतिहासाचे दाखले जमविणारे नसावे, अशी त्यांची भूमिका आहे. त्याच भूमिकेतून एका युगपुरुषाच्या कार्याची ओळख मराठी जगतातच नव्हे, तर संपूर्ण भारत वर्षाला व्हावी, असा त्यांचा प्रयत्न आहे.राजर्षी शाहू महाराज यांची १९७४ मध्ये जन्मशताब्दी साजरी करण्यात आली. तेव्हापासून सातत्याने चार दशके प्रा. डॉ. जयसिंगराव पवार शाहू विचार प्रसारासाठी काम करीत आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून राजर्षी शाहू महाराज यांच्या संपूर्ण जीवनाची आणि त्यांच्या कार्याची नोंद विस्ताराने करण्यासाठी स्मारक ग्रंथाचे काम हाती घेतले. सलग सात वर्षे काम करून २५ मे २००१ रोजी बाराशे पानांचा राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ तयार झाला. यापूर्वीही राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर अनेक अंगाने प्रकाश टाकण्याचा प्रयत्न झाला होता. पण त्यांनी ज्या-ज्या क्षेत्रात काम केले, त्या सर्वांची नोंद या ग्रंथाने एकत्रितपणे घेतली आहे, ते विशेष आहे. हे काम ऐतिहासिकच आहे. कोल्हापूरच्या इतिहासाला आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या व्यक्तिमत्त्वास शोभेल असेच झाले आहे. या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा नव्या राजवाड्याच्या प्रांगणात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते झाला होता. तेव्हा त्यांनीच सूचना केली होती की, या ग्रंथाचे भाषांतर इतर भारतीय भाषांतदेखील झाले पाहिजे. त्यासाठी मदतीचा हातही त्यांनी पुढे केला. महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीच्या वतीने प्रा. डॉ. पवार यांनी तोच ध्यास मनी बाळगून कामाला सुरुवात केली. भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्टात असलेल्या सर्व चौदा भाषांत हा ग्रंथ भाषांतरित करण्याचा संकल्प सोडला आहे. तसेच किमान दहा विदेशी भाषांमध्ये या ग्रंथाचा अनुवाद करण्याचाही निर्धार त्यांनी केला आहे. त्यानुसार आजवर कानडी, तेलुगू, कोकणी, उर्दू, हिंदी, इंग्रजी आणि जर्मनी या भाषांतील ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. सिंधी, बंगाली, ओरिया, गुजराती भाषांतील काम जवळ जवळ पूर्ण झाले आहे. तसेच रशियन आणि चिनी भाषांतील ग्रंथही प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा प्रवास जर्मनी आणि इंग्रजी भाषांतून युरोप खंडात पोहोचला आहे. तो आता चिनी आणि रशियन भाषांतही पोहोचणार आहे. भारतीय भाषेत शाहूंचे विचार पोहोचविण्याचा संकल्प प्रारंभी होता. आता ती भारतीय उपखंडाची सीमाही पार करीत आहे. एका राजाचा हा इतिहास जागतिक पातळीवर अभ्यासाचा विषय ठरावा, हा फुले-शाहू-आंबेडकर विचारांच्या महाराष्ट्राला अभिमानस्पद वाटावा, असा आहे. शाहू स्मारक ग्रंथाचे रशियन भाषेतील अनुवाद शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागप्रमुख प्रा. डॉ. मेधा पानसरे व रशियन भाषांतरकार प्रा. तत्याना बीकवा यांनी केले आहे. चिनी अनुवाद पुण्यात राहणाऱ्या प्रा. ओ ताई ली यांनी केले आहे. इतिहास प्रबोधिनीच्या कार्याने शाहू विचारांचे मॉडेल जगभर पोहोचते आहे, याबद्दल या सर्वांचे अभिनंदन!- वसंत भोसले
शाहूविचार सीमापार
By admin | Published: November 18, 2016 12:38 AM