शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

जनाची नाही, मनाची तरी लाज बाळगा..!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 3:30 AM

आरोग्य विभागाच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या विभागाचे पुरते बारा वाजवलेले आहेत. राज्यात परिपूर्ण असे एकही प्राथमिक आरोग्य केंद्र नाही.

अतुल कुलकर्णी

सार्वजनिक आरोग्य विभागातल्या अधिकाऱ्यांच्या टोकाच्या अनास्थेने दहा नवजात बालकांचा बळी घेतला. आरोग्य विभागाची यंत्रणा भ्रष्टाचाराने पोखरलेली, स्वार्थी, ढोंगी, मतलबी अधिकाऱ्यांचीच अधिक झाली आहे. या व्यवस्थेने चिमुकल्यांचे किलकिले डोळे पूर्ण उघडायच्या आतच कायमचे मिटवले. संतापाच्या कडेलोटानंतर आता कागदी घोडे नाचवले जातील. एकमेकांवर जबाबदारी ढकलली जाईल. दोन-चार अधिकारी बडतर्फ होतील, पुन्हा काही दिवसांनी सेवेतही येतील. व्यवस्था मात्र सुस्त अजगरासारखी पडून राहील. लोक झाली घटना विसरून जातील. हे पहिल्यांदा घडलेले नाही. २८ मे २०१७ रोजी चार नवजात अर्भके अमरावतीत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. नाशिक जिल्ह्यात इनक्युबेटर, ऑक्सिजनच्या निष्काळजीपणाने ५५ मुलांचे बळी घेतले होते. ओरड झाली, समिती नेमली गेली, अहवाल आला. पुन्हा सगळे विसरून गेले.

सार्वजनिक आरोग्य विभागाला कसलेही उत्तरदायित्वच  उरलेले नाही. कोणाचे कोणावर नियंत्रण नाही. प्राथमिक आरोग्य केंद्राचे (पीएचसी) डॉक्टर आरोग्य विभागाचे, बाकीचा स्टाफ ग्रामविकास विभागाचा. जिल्हा आरोग्य अधिकारी आणि त्याच्या नियंत्रणातील डॉक्टर्स सार्वजनिक आरोग्य विभागाचे. मेडिकल कॉलेजचे डॉक्टर-अधिकारी वैद्यकीय शिक्षण विभागाचे आणि महापालिकांच्या दवाखान्यात काम करणारे महापालिकांच्या ताब्यात. कोणाचा कोणाला पायपोस नाही. राज्याचे आरोग्य संचालक पीएचसी किंवा जिल्हा आरोग्य केंद्राला कधीही भेट देत नाहीत. अडचणी समजून घेत नाहीत. गरज नसणारी औषधे खरेदी केली जातात, ती धूळ खात पडून राहतात. गरजेची औषधे रुग्णांना विकत आणायला लावली जातात. संचालकांनी भेट देऊन पाहणी केली पाहिजे, ही त्यांची जबाबदारी आहे. पण, असे कधीच घडत नाही. पीएचसीमध्ये नेमलेले डॉक्टर कामावरच येत नाहीत, येणारे वेळा वाटून घेतात. चांगली औषधे नाहीत, खायला सकस अन्न नाही, सर्वत्र घाणीचे साम्राज्य, तरीही गोरगरीब रुग्ण त्याच डॉक्टरला देव मानून हाता-पाया पडत उपचाराची भीक मागत राहतात. 

सार्वजनिक आरोग्य विभागात विविध प्रकारचे १३,२६१ दवाखाने आणि २६,५८३ बेड आहेत. वर्षाला हा विभाग ९ कोटी रुग्ण तपासतो. त्यातले ५५ लाख रुग्ण अ‍ॅडमिट होतात. या विभागाला वर्षाला ५५०० कोटी रुपये मिळतात. त्यापैकी रुग्णांच्या औषधांवर फक्त ९० लाख रुपये खर्च होतात. वैद्यकीय शिक्षण विभागाची अवस्था वेगळी नाही. पण, मेडिकल कॉलेजची गरज कोरोनाच्या काळात समोर तरी आली. आरोग्य विभागात काम करणाऱ्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या विभागाचे पुरते बारा वाजवलेले आहेत. जर हे खोटे असेल तर राज्यातले एक प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा एक जिल्हा रुग्णालय सर्व सोयींनी व डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी परिपूर्ण असल्याचे दाखवून द्यावे. भंडाऱ्यात सदोष इनक्युबेटरमुळे मुलांचा जीव गेल्याची प्राथमिक माहिती आहे. २०१७ मध्ये नाशिकमध्ये इनक्युबेटर व ऑक्सिजनच्या अभावामुळे ५५ मुले दगावली होती. इनक्युबेटर कसे असावे, यासाठी ‘लोकमत’ने नाशिक विद्यापीठाचे तत्कालीन राज्यपाल नियुक्त सदस्य डॉ. मिलिंद देशपांडे यांची प्रतिक्रिया छापली तेव्हा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने “तुम्ही अशी कशी प्रतिक्रिया दिली?”- म्हणून त्यांना धमकावले होते. लोकांचे ऐकून घेण्याची मानसिकता वरिष्ठ अधिकाऱ्यांची उरलेली नाही. परीकथेतल्या राक्षसाचा जीव पिंजऱ्यातल्या पोपटात, तसा सार्वजनिक आरोग्य विभागाचा जीव औषध, यंत्रसामग्रीच्या खरेदीत आहे. ही खरेदी हाफकिन संस्था करेल, असे शपथपत्र सरकारने न्यायालयात दिले. मात्र तेसुद्धा हाणून पाडण्याचे प्रयत्न आजही चालूच आहेत. निकृष्ट, भ्रष्ट खरेदीमुळे दर्जेदार औषध कंपन्या यायला तयार नाहीत. अनेक नामवंत कंपन्या आरोग्य विभागाच्या औषध खरेदीचे टेंडर भरायला तयार नसतात. ओरबाडून खाण्याच्या वृत्तीमुळे आरोग्य विभाग बदनाम झालाय.

सरकारला खरोखरीच आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभाग नीट करायचा असेल तर काही धाडसी निर्णय घ्यावे लागतील. राज्यातल्या आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांपासून शिपायापर्यंत सगळ्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्याबद्दल मिळणारी वैद्यकीय प्रतिपूर्ती व्यवस्था बंद करून टाकावी. पूर्वी सरकारी इस्पितळात एखाद्या आजारावर उपचार होत नसेल तर तसे प्रमाणपत्र घेऊनच खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जावे लागत असे. मात्र आता अनेक नामवंत खाजगी हॉस्पिटल्सना इम्पॅनलमेंट करण्याची स्पर्धाच सुरू झाली. सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारी व्यवस्थेत मोफत उपचार होतील पण खाजगी हॉस्पिटलमध्ये गेल्यास पैसे मिळणार नाहीत असा कायदा होणार नाही, तोपर्यंत ही व्यवस्था सुधारणे ब्रह्मदेवालाही शक्य नाही. असा निर्णय झाला तर सर्व सरकारी हॉस्पिटल्स झपाट्याने सुधारतील. आजही डोळे तपासायला  सर्व नेत्यांना, अधिकाऱ्यांना डॉ. तात्याराव लहानेच का पाहिजेत? मुंबईच्या डेंटल कॉलेजातच सगळ्यांना दातांवर उपचार का करावे वाटतात? गोरगरिबांनी सरकारी दवाखान्यात आणि श्रीमंतांनी खाजगी हॉस्पिटलात जायचे हा नियम कोणी तयार केला?  भारतीय राज्य घटनेच्या आर्टिकल २१ नुसार नागरिकाला जगण्याचा मूलभूत हक्क आणि संरक्षणाची हमी देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निकालात उत्तम आरोग्याच्या हक्काचा समावेश करण्यात आला आहे. हा अधिकार जगण्याच्या हक्काचा अविभाज्य भाग असेल.  त्यामुळे या हक्काच्या संरक्षणाची राज्याची वैधानिक जबाबदारी आहे. Highest Attainable Standards आरोग्य सेवा पुरविणे राज्यावर कायदेशीररीत्या बंधनकारक आहे. अशी सेवा उपलब्ध करून देण्यात शासन अपयशी ठरल्यास ते या मूलभूत हक्काचे/अधिकाराचे उलंघन समजले जाईल, हे डोळे आणि डोके उघडे ठेवून समजून घ्यावे लागेल. नाहीतर कायदेशीर कारवाईचे मार्ग दाखवावे लागतील.

मातेने कोरोनाच्या काळातही अनंत अडचणी सहन करून ९ महिने पोटात वाढवलेले मूल अधिकाऱ्यांच्या, नेत्यांच्या निष्काळजीपणामुळे हकनाक जात असेल तर त्या मातेचा तळतळाट लागल्याशिवाय रहणार नाही. किमान त्याची तरी भीती बाळगा... जागे व्हा... जनाची नाही तर नाही, मनाची तरी लाज बाळगा!atul.kulkarni@lokmat.com

(लेखक लोकमतमध्ये वरिष्ठ सहायक संपादक आहेत) 

टॅग्स :Bhandara Fireभंडारा आगministerमंत्री