- डॉ. रामचंद्र देखणेसत्य, सौंदर्य, कला आणि साहस ही जीवनाची चार मूल्ये मानली आहेत. शांती हे या चारही मूल्यांमध्ये सुसंवाद साधणारे अंतिच मूल्य आहे. शांती म्हणजे सर्व सहन करणे, शांती म्हणजे कुणालाही न दुखावणे, काहीही झाले तरी वाद नको म्हणून निमूटपणे बसणे, अशी शांतीविषयीची काही विपरित कल्पना घेतली जाते. वास्तविक शांती म्हणजे निवृत्तीपर नैष्कर्म्याची कल्पना नसून, शरीरामध्ये आणि मानवी लोकजीवनामध्ये उत्साह ओतणारी, त्याला कार्यतत्पर बनविणारी अशी प्रवृत्तीपर भावना आहे. शांती ही नैतिकतेची अधिष्ठायी आहे. संतश्रेष्ठ तुकोबाराय म्हणतात, ‘‘म्हणवूनी शांती धरा, उतरात पैलतीरा’’नैतिकतेच्या पैलतीरावर जाण्यासाठी शांती हीच तारू आहे. ज्याने आपल्या सर्व इंद्रियांच्या ठिकाणी शांतीचे अलंकार धारण केले आहेत, त्याच्या सहजक्रियेतही नीती जन्म घेते आणि असा देह म्हणजे देवाच्या आवडीचे विश्रांतीस्थान होय. म्हणून तर वारकरी संप्रदायाचे कळस अर्थात जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबाराय म्हणतात,‘‘दया क्षमा शांती,तेथे देवाची वसती।’’परंतु, अगोदर दया म्हणजे काय, ती कुणावर करायची याचेही विवेचन संतश्रेष्ठ तुकोबाराय करतात. भूतांचे पालन करणे ही दया आहे. तसेच आणिक निर्दालन कंटकंचे म्हणजे कंटकांचे निर्दालन हीदेखील दयाच आहे. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांची दया ही प्रवृत्तीधर्माचेही सत्य जागविणारी आहे. शांती हे मानवी जीवनाचे खरे प्रयोजन आहे. ऋषिमुनींनी देवाजवळ जगाच्या शांतीसाठी मागणे मागितले. यजुर्वेदाचा छत्तीसावा अध्याय हा शांतीपाठार्थ म्हणून प्रसिद्ध असून, त्यात विश्वाचे शांतीगीत ऐकायला मिळते. आचार्य विनोबाजी भावे यांनी शांती तत्त्वाचे विवेचन फारच सुंदरपणे केले आहे. ते म्हणतात, ‘‘शांती शांतीमध्येही फरक आहे. दगड मूळच शांतच असतो, देवळाच्या पायरीलाही दगडच बसविलेला असतो.’’शेंदूर लावून दगडाचाच देव आपल्यासमोर असतो. म्हणजे शेंदूर लावल्यानंतरही तो शांतच असतो. पण दगडाची जड जड शांती निराळी आणि देवाची स्फूर्तिदायक शांती निराळी. दगड आणि दगडाचा देव हे दोन्हीही एका अर्थाने कर्मसंन्यासी. पण त्याच दगडातील देवाच्या कर्मसंन्यासातून भक्तांच्या डोळस श्रद्धेला कर्मयोगाचे अनंत किरण पसरलेले दिसतात. त्यामुळे त्याच्या कर्मसंन्यासात जे विशिष्ट सामर्थ्य आहे ते दगडाच्या कर्मसंन्यासात नाही. देवामधली प्रचंड कर्मप्रेरक शक्ती ही दगडात नाही म्हणून तर एकाच्या पायावर डोके ठेवले जाते तर दुसऱ्याच्या डोक्यावर पाय ठेवून पुढे जावे लागते. शांती हे स्थिरतेचे लक्षण असले तरी ती कर्मप्रेरक शक्ती असते, हे महत्त्वाचे.
शांती कर्मप्रेरक शक्ती
By admin | Published: March 16, 2017 1:02 AM