- हरीष गुप्ता(नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली)
सुशांतसिंह राजपूत, कंगना राणावत प्रकरणे गाजू लागल्यावर निर्माण झालेला राजकीय पेच सोडवण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कामाला लागले. पण प्रकरणांची बारीक छाननी केल्यावर लक्षात आले की यात गुंतलेले लोक त्यांचेच निकटवर्तीय आहेत. सुशांतसिंह प्रकरण आत्महत्येचे आहे असे जाहीर करणारे गृहमंत्री अनिल देशमुख राष्ट्रवादी पक्षाचे.कंगनाशी वाग्युद्धात गुंतलेले संजय राऊतही पवारांशी सलगी राखून आहेत. मुंबई पोलिसांनी सुशांत प्रकरणाचा विचका केला म्हणावे तर गृहखाते राष्ट्रवादीकडेच आहे. बिहारचे एनडीए नेते यात उतरले. त्यांनी परिस्थितीचा पुरा फायदा उठवला. दिल्लीची अंतस्थ वर्तुळे सांगतात की, राऊत यांचे बॉस भले उद्धव ठाकरे असतील; पण ते पवारांना अधिक जवळचे आहेत. राऊत उद्धव यांच्यावर अनेक कारणांनी नाराज आहेत. ठाकरे ना राऊतांना बोलू शकत ना देशमुखांना वेसण घालू शकत ! अर्थात ही गोष्ट वेगळी की ठाकरेंनी मौन सोडले नाही आणि महापालिकेने हे प्रकरण नीट हाताळले नाही, म्हणूनच सगळा विचका झाला!अधीर रंजन यांचा भाव वधारलालोकसभेतील कॉँग्रेस पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी यांच्या राजकीय कारकिर्दीत इतका सुगीचा काळ कधीच आला नव्हता. ते पाचव्यांदा खासदार झाले असले तरी पुढच्या बाकांवर कधीच बसले नव्हते. परंतु २०१९च्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खरगे यांचा धक्कादायी पराभव झाल्याने सोनिया गांधी यांनी अधीर रंजन यांची नेतेपदी निवड केली आणि त्यांचे दिवस पालटले. लवकरच ते विरोधी पक्षनेते नसतानाही वजनदार अशा सार्वजनिक लेखा समितीचे चेअरमन झाले. राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद त्यांच्यापेक्षा खूपच ज्येष्ठ आहेत तरी सोनिया गांधींच्या अनुपस्थितीत अधीर रंजन यांनी लेखा समितीचे काम चेअरमन म्हणून चालवले. पक्षात आझाद यांचा भाव घसरत असल्याचे हे दुसरे लक्षण मानले जाते. हे पुरेसे नव्हते म्हणून की काय अधीर रंजन यांना आझाद यांच्या बंगल्यासमोर साउथ अॅव्हेन्यू लेनमध्ये बंगला मिळाला. म्हणतात ना, भगवान देता है, तो छप्पर फाडके देता है....रिट्विट करा नाहीतर पासवर्ड्स द्या...पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना मिळणारे लाइक्स आणि हिट्सची संख्या कमालीची घसरल्याने भाजपचा आयटी सेल सध्या खूपच काळजीत आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचा सेल यांनी काही ट्विट केले की तुम्ही लागलीच ते रिट्विट करा, असे पक्षाच्या खासदारांना सांगण्यात आले आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात मिळून पक्षाकडे ४००हून अधिक खासदार आहेत. पण अशा रिट्विटिंगमध्ये काही कळीच्या अडचणी आहेत. ज्येष्ठ खासदारांनी कनिष्ठांच्या ट्विट्स दिवसभर पुन्हा कशा पाठवायच्या? मग त्यांच्या ट्विटर अकौंटचे पासवर्ड विनंतीपूर्वक मागितले गेल्याचे कळते. पुढचे काम पक्षाचा आयटी सेल करणार आहे.गमछा जाऊन ‘मास्क’ कसा आला?कोविडच्या छायेत सुरू झालेल्या संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद संकुलात प्रवेश करताना निळ्या रंगाचा तीन पदरी मास्क वापरायचे ठरवले. यापूर्वी ते दूरचित्रवाणीवर दिसायचे तेव्हा गमछा असायचा. संसदेत मात्र ते गरिबांचा मास्क घालून आले त्याचे अनेकांना आश्चर्य वाटले.एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया आणि इतर आरोग्यविषयक जाणकारांनी मोदींना त्यांचे गमछा वापरणे धोक्याचे ठरू शकते असे सुचवले. मग मोदींनी इतर खासदार, पुढाऱ्यांप्रमाणे एन-९५/एन-९९ मास्क न वापरता निळ्या रंगाचा सामान्य लोक वापरतात तसा मास्क पसंत केला. दोन रुपयांना मिळणारा मास्क वापरून मोदींना कदाचित वेगळा संदेश द्यायचा असेल !मास्क न घालता कंगनाची बेमुर्वतखोरी दुसरीकडे सार्वजनिक ठिकाणी मास्क लावण्यासारखे आरोग्य मंत्रालयाने घालून दिलेले नियम धुडकावणे कंगना राणावतने मात्र सुरूच ठेवले आहे. लोकांशी बोलताना दोन मीटर अंतर ठेवा हा नियमही तिने पाळला नाही. तिच्या घराचा काही भाग पाडण्यात आला तेथे ती कर्मचारी, कमांडो यांच्याबरोबर मास्क न लावता फिरली.इतके पुरेसे नव्हते म्हणून की काय राज्यपाल कोशियारी यांच्याकडेही ही ‘झाशीची राणी’ मास्क न लावता गेली. राज्यपालांनी मात्र मुखपट्टी बांधलेली होती. कंगना आणि तिची बहीण रंगोली यानी कोविडच्या नियमांबद्दल तुच्छताच दाखवली. बिहारच्या आयपीएस अधिकाऱ्यांना सक्तीने क्वॉरण्टाइन करणारी बिच्चारी महापालिका कंगनाला काहीही म्हणू शकली नाही.