शरद पवार सध्या गप्प गप्प आहेत, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 06:58 AM2023-07-27T06:58:31+5:302023-07-27T07:00:44+5:30
शरद पवार ना बंगळुरू बैठकीत काही बोलले, ना राज्यसभेत. ते गप्प आहेत. साथ सोडून गेलेल्यांवर बाजी उलटवण्याच्या संधीची वाट पाहत असावेत!
हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली
बंगळुरूमध्ये १८ जुलै रोजी झालेल्या विरोधी पक्षांच्या शिखर बैठकीत बोलायला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नकार दिला. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी विनंती करूनसुद्धा पवार यांनी मौन राखणे पसंत केले. बैठकीच्या प्रारंभीच पवारांनी अनिच्छा दाखवल्यावर खरगे पुढच्या वक्त्याकडे वळले; पण पुन्हा त्यांनी पवार यांना विचारले. तरीही पवार बोलण्यास उत्सुक नव्हते. अजित पवार यांनी पक्ष फोडून भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर पवार यांची गाडी बिनसलेलीच आहे. ते गप्प गप्प दिसतात. राजकीय कारकिर्दीच्या संध्याकाळी साथ सोडून गेलेल्यांवर बाजी उलटवण्याची संधी केव्हा येते याची ते वाट पाहत आहेत. राज्यसभेतही ते अजिबात बोललेले नाहीत.
खरेतर पक्षातील बहुसंख्य खासदार त्यांच्याबरोबर आहेत. महाराष्ट्रातील शक्तिपरीक्षाही अद्याप झालेली नाही. पुढे काय वाढून ठेवलेले आहे याची चाहूल घेण्याची विलक्षण हातोटी पवार यांच्याकडे आहे. अजिबात घाई न करता बाजी उलटवण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. सध्या वार झेलत आहेत, एवढेच! त्यांचा एक पाय २६ पक्षांच्या आघाडीत म्हणजे ‘इंडिया’मध्ये आहे आणि त्यांचे बहुसंख्य आमदार मात्र ‘एनडीए’सोबत आहेत.
प्रवेशासाठी शुभमुहूर्ताची प्रतीक्षा संसदेची नवी इमारत सध्या पूर्णपणे तयार असून, तज्ज्ञांची सुरक्षा कवायतही त्या ठिकाणी यशस्वीपणे पार पडली आहे. भविष्यातील सर्व गरजांचा विचार करून हे नवे संसद भवन तयार करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा तो एक भाग आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन येथेच भरेल अशी अनेकांची अटकळ होती. अचानक बातमी आली की, पावसाळी अधिवेशनाच्या मध्यावर केव्हातरी स्थलांतर होईल.
कारण काय?- अलीकडे झालेल्या जोरदार पावसाचे पाणी या वास्तूत झिरपून साठले आहे, असे राजस्थानमधील लोकसभेचे खासदार हनुमान बेनिवाल म्हणतात. हे बेनिवाल एनडीएबरोबर नाहीत आणि विरोधी पक्षांबरोबरही नाहीत. अधिकाऱ्यांनी मात्र साफ इन्कार केला आहे.
आतल्या गोटातली मंडळी काही वेगळेच सांगतात. ज्योतिषी मंडळींशी चर्चा करून या वास्तूच्या प्रवेशासाठी आणि तेथे अधिवेशन भरण्यासाठी शुभमुहूर्त शोधला जातोय म्हणे ! चांगल्या मुहूर्ताबाबत मतभेद असल्याने तूर्तास तरी अधिवेशन जुन्या इमारतीतच भरले आहे. प्रवेशाबाबत नव्या तारखेची घोषणा मात्र कोणत्याही क्षणी होऊ शकेल.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अस्वस्थ का?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गेल्या काही दशकात मणिपूरमध्ये खूप मोठे काम केलेले आहे. या पार्श्वभूमीवर तिथल्या हिंसाचारामुळे संघातील मंडळी गोंधळात आहेत. ६८ वर्षांपूर्वी संघाने वनवासी कल्याण आश्रमाची स्थापना केली. ईशान्य भारतातील आदिवासींच्या कल्याणाचा हेतू त्यामागे होता. दोन जमातींमधील संघर्ष हा हिंदू आणि ख्रिश्चन यांच्यातील संघर्षात रूपांतरित होऊ नये, याची काळजी घेणे हे दुसरे महत्त्वाचे काम होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर आल्यानंतर ईशान्य भारतासाठी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी पुष्कळ काही केले.
मे महिन्यात मणिपूरमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू झाला आणि हाताबाहेर जाऊ लागला तेव्हा याबाबत हस्तक्षेप करण्याची विनंती सरकारला उच्च पातळीवरून करण्यात आली. दीड एक महिन्यानंतर १९ जूनला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मणिपूरमध्ये शांतता राखण्याचे आवाहन सर्वांना केले. मणिपूरमध्ये जे घडते आहे त्यामुळे झालेल्या जखमा भरून यायला पुढची काही दशके लागतील म्हणून संघाच्या वर्तुळात चिंतेचे वातावरण आहे.