बळीराजाने रस्त्यावर उतरून जेव्हा त्याचा आक्रोश व्यक्त करायला सुरुवात केली तेव्हा सारेच हबकले होते. कारण आपल्या साऱ्यांचा पोशिंदा तो. तोच जर असा जगण्यावर रुसला तर कसं होणार? पण वर्षानुवर्षे चालत आलेली कमालीची राजकीय अनास्था आणि स्वार्थलोलुप राजकारण यामध्ये हा शेतकरी नुसताच भरडला जात होता हे वास्तव होतं. उत्पादनखर्चही निघेना, हमीभाव मिळेना, जगण्यासाठी कर्ज घेऊन त्याचं ओझं वागवू लागला. तेही डोईजड झालं तेव्हा त्याने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आणि सहन न होणाऱ्या त्रासातून स्वत:ला मुक्त केलं. पण या परिस्थितीविरुद्ध पहिल्यांदाच तो एल्गार करून उठला आणि थेट रस्त्यावर उतरला. असाही उत्पादन केलेला माल पडून सडतोय. तो त्याने चक्क रस्त्यावर फेकला. दुधाचे टँकर रस्त्यावर रिते केले आणि आपल्या आक्रोशाला वाट मोकळी करून दिली. अर्थात त्यातही ओघाने राजकारण घुसलेच. मात्र ही परिस्थिती चिघळेल असे वाटत असताना शासनाला प्रसंगाचे गांभीर्य लक्षात आले आणि कर्जमाफीपासून इतर अनेक शेतकरी हक्काच्या घोषणा झाल्या आणि शेतकऱ्यांचे आंदोलन थांबले. हे आंदोलन योग्य वेळी थांबले कारण बळीराजाच्या डोळ्यांसमोर होता पेरणीचा काळ. काळी माती त्याची वाट पाहत होती. आंदोलन थांबले आणि पोशिंदा पुन्हा मातीतून सोनं काढण्यासाठी सज्ज झाला. योगायोग पहा, हे सारे चित्र बदलत असताना अगदी मोक्याच्या क्षणी मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झाले. बरोबर ठरल्या मुहूर्तावर येऊन सगळीकडे बरसला. त्याच्या आगमनानेच शुभशकुनाची ग्वाही दिली. शेतकरी दुहेरी आनंदाने मनोमन सुखावला. गेले वर्ष त्याला तसे त्रास देणारेच ठरले होते. पाणीटंचाईने लोकांचे हाल होत होते. अनेक भागांत पाणी नव्हते. नद्या, तलाव, विहिरी, ओढे सारे काही कोरडेठाक पडलेले होते आणि पाऊस लांबलेला होता. त्यात भरीस भर शेतकऱ्यांचे न सुटणारे प्रश्न होतेच. त्यामुळे यंदा काय होणार याकडे शेतकरी डोळे लावून बसलेला होता. त्याला योग्य वेळी आलेल्या पावसाने चांगला दिलासा दिला आहे. घाम गाळून शेतातून समृद्धी आणणारा प्रत्येक शेतकरी आता कष्टाने, जिद्दीने आणि नेटाने पुन्हा पीक पीकवणार आहे. साऱ्या बळीराजांचं शिवार आबादानी व्हावं हीच प्रत्येकाची सद्भावना आहे.
शिवार व्हावं आबादानी!
By admin | Published: June 16, 2017 4:16 AM