- सचिन जवळकोटे
गेल्या पाच वर्षांपासून सोलापूरची भूमी परमुलखातल्या नेत्यांकडं आपलं ‘पालकत्व’ सोपवून बसलेली. कधी इंदापूर तर कधी तब्बल सहा आमदार निवडून देणाऱ्या या जिल्ह्यात आता ‘कमळ’वाल्यांचं ‘मिशन इलेव्हन’ सुरू झालेलं. मात्र याला पुरून उरतेय माढा-परंडा बॉन्ड्रीवरची ‘सावंतशाही’. शहरात ‘दोन देशमुखां’च्या मतदारसंघाला खेटून असणाऱ्या ‘मध्य’मध्ये आपलं साम्राज्य निर्माण करण्यासाठी कामाला लागलीय खूप मोठी यंत्रणा; कारण ‘शहाजीबापूं’च्या सांगोल्यापलीकडं स्वतंत्र ओळख नसलेल्या ‘शिंदे गटा’ला लागलीय आपल्या अस्तित्ववाची चिंता..लगाव बत्ती..
माढ्याच्या ‘तानाजीरावां’नी मध्यंतरी परंड्यात महाशिबिर घेतलेलं. या इव्हेंटचा अख्ख्या राज्यात गाजावाजा करण्यात ‘सावंत टीम’ यशस्वी झालेली. आता आषाढी एकादशीला पंढरीत असंच ‘महा महा शिबिर’ घेण्याचं ‘सावंतां’नी ठरविलेलं. परफेक्ट टायमिंग साधलेला; कारण या दिवशी इथं असतात त्यांचे सीएम् एकनाथभाई. हा दिवस जणू ‘जिल्ह्यातल्या ‘शिंदे सेने’साठी एखाद्या मोठ्या सणासारखाच.
या शिबिरात म्हणे दोन दिवसांत वीस लाख वारकऱ्यांची तपासणी होणार. दोन हजार डॉक्टर रात्रंदिवस काम करणार. कल्पना खूप छान, हेतू खूप चांगला. मात्र प्रत्यक्ष यंत्रणा बजावणीवर खुद्द प्रशासनातली मंडळीच खासगीत संशय व्यक्त करू लागलेली. ‘पालकमंत्र्यां’समोरही चुळबूळ झालेली. शंकाखोरांच्या नसत्या कल्पनांनाही भलतेच धुमारे फुटलेले. वीस लाख वारकरी असतानाच कुठं..मिनिटाला सातशे वारकरी तपासणं कस शक्य..चेंगराचेंगरी झाली तर कसं..बापरे बाप..प्रशासकीय यंत्रणेतला छुपा विरोध राजकीय पातळीवर जाऊन पोहोचला.
मुंबईतही वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झडू लागली. ‘विखे-पाटील’ व्हर्सेस ‘सावंत’ असे चित्र मंत्रालयात तयार झालं. वारकऱ्यांचा हेल्थ राहिलं बाजूलाच; सत्ताधाऱ्यांमधली ‘कम्युनिकेशन तब्येत’ पुरती ढासळली. हे शिबिर कसं होणार माहीत नाही; परंतु ‘कमळ’वाल्यांची लॉबी झुगारून देण्यासाठी ‘सावंत टीम’ लागली कामाला.
एकीकडं ‘कमळ’वाले प्रत्येक मतदारसंघाचा प्रमुख निवडण्यातच गर्क असताना दुसरीकडे ‘एकनाथभाईं’ची यंत्रणा गुप्त मीटिंगा घेण्यात रमलेली. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील चारही जिल्हाप्रमुखांना ‘वर्षा’ बंगल्यावर बोलावलेलं. सीएम दिल्लीला; मात्र ‘श्रीकांतदादां’नी बैठकीचं नेतृत्व केलेलं. गेल्यावेळी ‘धनुष्यबाणा’वर लढल्या गेलेल्या प्रत्येक मतदारसंघावर पॉइंट टू पॉइंट चर्चा करण्यात आली. प्लस-मायनसवर फोकस करण्यात आला. प्रत्येक मतदारसंघाची डिटेल माहिती ‘सीएम् सुपुत्रां’नी टिपून घेतलेली.
‘करमाळ्यात’ ‘सावंतां’नी गेल्या आमदारकीची चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न सुरू केलेला. एकीकडं ‘बागलां’च्या कारखान्याला आर्थिक ताकद देताना दुसरीकडे ‘नारायणआबां’ची प्रतिष्ठा उजळविण्याचाही कार्यक्रम राबविलेला. दोघांपैकी एकजणच उभारला तर ‘करमाळा आपलाच’ याच पॉइंटवर एकमत झालेलं. ‘माढ्यात’ ‘कोकाटें’नाच ताकद देण्याचं ठरलं. मात्र ऐन इलेक्शनच्या तोंडावर ‘बबनदादां’नी ‘पॉलिसी विथ पार्टी’ बदलली तर मतदारसंघ ‘कमळ’वाल्यांना सोडून द्यावा लागेल की काय, यावरही चर्चा झालेली.
जोपर्यंत ‘देशमुखां’मधली बेकी संपत नाही तोपर्यंत ‘सांगोल्या’च्या शहाजीबापूं’चं टेन्शन घेण्यासारखं नव्हतं. ‘मोहोळ’मधलं ‘क्षीरसागर आपलेच’ असाही दावा करण्यात आला. मात्र तिथंही ‘बबनदादां’सोबत ‘अनगरचे दाजी’ बदलले तर काय करायचं, असा प्रश्न उपस्थित झाला. जिथं ‘अनगरकरां’नाच काय निर्णय घ्यावा कळेना. तिथं मुंबईत बघून ‘शिंदे फॅमिली’ कसला डिसिजन घेणार? लगाव बत्ती..
‘बार्शी’च्या ‘सोपलां’चाही तोच प्रॉब्लेम. त्यांनाच माहीत नाही, ते सध्या नेमक्या कोणत्या पार्टीत ! तशात ‘राजाभाऊं’ची अपक्ष आमदारकी ‘कमळ’ फुलांच्या गंधात न्हाऊन निघालेली. त्यामुळं त्या मतदारसंघावरही ‘बघू-करू’ची एवढ्यावरचा विषय संपलेला संपविण्यात आलेला.
खरी चर्चा रंगली शहरातल्या ‘मध्य’ मतदारसंघाची. या ठिकाणी ‘धनुष्यबाण’ प्रत्येकवेळी — करायचं; परंतु निकालादिवशी तुटून पडायचं. तरीही पंचवीस ते तीस हजारांची मतं हक्काची राहिलेली. या ठिकाणी ‘नवा चेहरा’ अन् ‘खमकं नेतृत्व’ दिलं तर घडवू शकतो चमत्कार, असे ‘सावंतां’च्या ‘शिवाजीरावां’नी मोठ्या आत्मविश्वासानं सांगताच अनेकांचे डोळे चमकले; कारण ते म्हणे स्वत: इथं इच्छुक. मीटिंग संपली.
सोलापूरच्या ‘शिंदे कन्ये’विरोधातील ‘प्लॅनिंग’ मुंबईच्या ‘शिंदे पुत्रां’नी मन लावून ऐकलं.
‘पत्की, बरडे, आडम, कोठे अन् मानें’सारखी कैक दिग्गज मंडळी शहरातली असूनही तीन वेळा ‘प्रणितीताई’ निवडून आलेल्या. आता हे बाहेरून आलेले ‘सावंत’ काय करणार? असा प्रश्न खुद्द कार्यकर्त्यांना पडलेला. मात्र ‘सावंतांची यंत्रणा’ खूप अभ्यास करून बसलेली. ‘मध्य’मध्ये बेरोजगारी हाच मोठा इश्यू असल्याचं त्यांनी मार्क केलेलं. त्यावर कामही सुरू झालेलं. शहरात एक मोठा उद्योग आणण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले. निव्वळ ‘प्रोडक्शन’पेक्षा जास्तीत-जास्त ‘कामगार भरती’वर जोर देण्यात आलेला. मोची वस्तीपासून लोधी गल्लीपर्यंत साऱ्याच समाजांना डोळ्यासमोर ठेवलेलं.
पाच फॅक्टऱ्यांसह एज्युकेशन कॅम्पही ‘सावंतां’च्या दिमतीला. तब्बल अठ्ठावीस हजार कर्मचारी कामाला. गाड्यांचे ड्रायव्हरच म्हणे एक हजाराहून जास्त. ही अख्खी यंत्रणा इथं कामाला लावण्याचीही त्यांची तयारी. ‘मध्य’मध्ये बंगला बांधून राहण्याच्याही हालचाली. ‘पाण्यासारखा पैसा अन् महातुरायासारखी माणसं’ वापरून चमत्कार घडविण्याचा ‘शिवाजीरावां’चा अजेंडा. मात्र ‘तानाजीराव’ दोनवेळा परंडा जिल्ह्यातून निवडून आले असले तरीही ‘सावंत बंधू’ खुद्द स्वत:च्याच माढ्यात दोनपेक्षा पराभव पत्करलेले. त्यामुळं ‘ते’ जे काही इथं करतील ते खूप जपून अन् विचार करूनच. ‘माढ्यात दूध’ पोळल्याने ‘सोलापूरचं ताकरु’ फुंकूनच..
लगाव बत्ती..