- संदीप प्रधान (वरिष्ठ सहायक संपादक, लोकमत, ठाणे)
ठाणे व कल्याण हे गड राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आले ही त्यांच्याकरिता मोठी उपलब्धी आहे. पक्षाचे नाव व चिन्ह हे निवडणूक आयोगाने बहाल केल्यानंतरही जनतेच्या न्यायालयात शिंदे यांच्यापेक्षा उद्धवसेनेला अधिक जागा मिळाल्याने खरी शिवसेना ठाकरेंची असे उत्तर मिळाल्याने शिंदे यांच्याकरिता ‘थोडी खुशी, थोडा गम’ अशी अवस्था आहे. ठाणे हा शिंदे यांचा गड वेगवेगळ्या सर्वेक्षणाचे दाखले देऊन व संघटनात्मकदृष्ट्या भाजप श्रेष्ठ असल्याचे दावे करून हिसकावून घेण्याचा प्रयत्न भाजपने केला. शिंदे यांनी चिकाटीने वाटाघाटी करून ठाणे लोकसभा मतदारसंघ सोडवून घेतला. भाजपचे संजीव नाईक यांनी या मतदारसंघात उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच प्रचार सुरू केला होता. भाजपने अशी वातावरणनिर्मिती केली होती की, ठाण्याची जागा शिंदेसेनेला मिळणारच नाही.
ठाणे व नाशिकच्या मतदारसंघाकरिता शिंदे यांना बराच संघर्ष करावा लागला. ठाण्यात नवी मुंबई, मीरा-भाईंदर येथील भाजप नेते सहकार्य करतील किंवा कसे, याबाबत साशंकता होती. मात्र शिंदे यांनी ठाण्यात ठाण मांडून नरेश म्हस्के यांच्याकरिता व्यूहरचना केली. कल्याणमध्ये शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकरिता अनुकूल परिस्थिती होती. ठाणे, कल्याण व भिवंडी या तीन जागांपैकी शिंदेसेनेच्या वाट्याच्या दोन्ही जागांवर त्यांनी विजय मिळवला. मात्र भिवंडीत भाजपचे उमेदवार व केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील पराभूत झाले आहेत. ठाणे जिल्ह्यावर पुन्हा पकड घट्ट करण्याचे भाजपचे मनसुबे उधळले गेले. समजा ठाण्यात शिंदेसेनेचा उमेदवार पराभूत झाला असता तर भाजपने शिंदे यांचा त्यांच्या बालेकिल्ल्यात जोर नाही, असा शिक्का मारून बारामतीत पराभव पत्कराव्या लागलेल्या अजित पवार यांच्या पंगतीत त्यांना बसवले असते. विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार व एकनाथ शिंदे यांची वाटाघाटींची क्षमता संपली असती.
महाराष्ट्रात महायुतीचा प्रयोग करणाऱ्या भाजपला मतदारांनी सणसणीत चपराक दिल्याने भाजपची प्रकृती तोळामासा झाली. अजित पवार यांचाही मुखभंग झाला. त्या तुलनेत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याइतके नसले तरी बऱ्यापैकी यश मिळवल्याने येत्या विधानसभा निवडणुकीत शिंदे यांनी जागावाटपात आपल्या शब्दाचे वजन टिकवून ठेवले. मुंबईत मात्र शिंदे यांचे स्थान नाही हे सिद्ध झाले. मुंबईकरांनी मागील दोन निवडणुकीत मुंबईवर गुजराती व उत्तर भारतीय मतदारांच्या आधारे कब्जा केलेल्या भाजपलाच हिसका दाखवला असताना शिंदे यांना मात्र सामान्य मतदारांनी ठाण्याची वेस ओलांडून मुंबईत पाऊल ठेवू दिलेले नाही.