- धनाजी कांबळे
थेट मोदींनाच आव्हान देऊन ‘चौकीदार चोर है’ म्हणत अवघा देश जागवत निघालेल्या वाघांनी अयोध्या आमच्यासाठी श्रद्धास्थान आहे. आधी मंदिराची चर्चा होईल, त्यानंतरच सरकार, युती बाबतची चर्चा करू, असा ठाकरी दम देणाऱ्या वाघांना कदाचित आपला आवाका समजून आल्याचे दिसत आहे. युतीसंदर्भातील पत्रकार परिषदेत अमित शहांचे स्मितहास्य मोठा भाऊ आम्हीच ठरलो, असेच जणू दर्शवित होते.
शिवसेना मराठी माणसांसाठी आणि मराठी माणूस शिवसेनेसाठी अशी वाघ डरकाळी फोडणाऱ्या शिवसेनेने नमतं घेण्याची भूमिका स्वीकारली आहे. त्यामुळेच दिल्ली दरबारी कितीही भली मोठी आव्हाने देण्यात राऊतांची कसरत होत असताना इकडे प्रत्यक्ष पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मात्र राफेल, नाणार, शेतकरी कर्जमुक्ती, नोटाबंदी, जीएसटी या सगळ्या उठवलेल्या वावटळीवर पाणी सोडून मोठा भाऊ भाजपच आहे, हे मान्य करून टाकले आहे. त्यामुळे आता शिवसेना आणि भाजप केवळ लोकसभा नव्हे, तर विधानसभा देखील एकत्रच लढणार आहेत. विशेष म्हणजे व्यवहारी मानसीकतेच्या अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना आताच विधानसभेसाठीही राजी केल्याने पुन्हा विधानसभेसाठी युती होणार का नाही, या चर्चेला पूर्णविराम दिल्याने एकाच दगडात दोन वेळची हमी मिळवून घेण्यात शहा आणि फडणवीस यांची खेळी यशस्वी ठरली आहे. देशभर राफेलवरून रान उठवलं जात असताना राफेलपेक्षा पीकविमा योजनेत मोठा घोटाळा झाल्याचे उद्धव ठाकरे सांगत सुटले. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेतेही पीक विमा घोटाळ्याबद्दल बोलू लागले. मात्र, कोणताच घोटाळा सत्तेत असताना बाहेर येणार नाही, याची पुरेशी तजवीस राज्यात फडणवीस आणि केंद्रात मोदींनी करून ठेवल्याने जे घोटाळे प्रथमदर्शनी झाले असावेत, असे वाटत होते. त्याची चर्चाच होणार नाही, अशी व्यवस्था या जोडगोळीने केल्याची शंका येते. कारण त्यानंतर कोणत्याच मीडियाने त्याची फारशी दखल घेतली नाही. दरम्यानच्या काळात अयोध्येत राम मंदिरच होणार अशी भीष्मप्रतिज्ञा घेऊन अयोध्येचा दौरा उद्धव ठाकरे यांनी काढला होता. त्यांनी अयोध्येत जाऊन मराठी माणसांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मूळचे अयोध्येतील रहिवासी असलेल्या व्यापारी आणि दुकानदारांना नाराजी व्यक्त केली होती. आधीच राम मंदिरामुळे संवेदनशील बनलेल्या अयोध्येच माणसांच्या रोजच्या जगण्यात त्यामुळे येणाºया अडीअडचणींमुळे नेत्यांचे दौरे होतात, पण आमचे हाल होतात, अशा प्रतिक्रिया माध्यमांमधूनच सगळ्या देशाला समजल्या. केवळ महाराष्ट्राचा विचार केला तर, शेतकरी आत्महत्या आणि शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर आम्ही सरकारमध्ये असलो, तरी आम्ही कधीही राजीनामे देऊ शकतो, अशी पोकळ वल्गना शिवसेनेच्या आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी केली होती. त्यांनी आता सरकारचा कार्यकाळ काही दिवसांवर संपायला आला असला, तरी खिशातले राजीनामे काही बाहेर काढले नाहीत. त्यामुळे विरोधकांनी देखील शिवसेना-भाजपच्या पुतणा-मावशीच्या प्रेमाचा खरपूस समाचार वेळोवेळी घेतलाच होता. तरीही स्वाभिमानी बाणा खुंटीला ठेवून स्वाभिमानाच्या तुलनेत सत्ता महत्त्वाची आहे, हे अचूक जाणणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी कितीही आकांडतांडव झाले, तरी भाजपसोबतचा डाव काही मोडू दिलेला नाही. अगदी सोमवारी युतीच्या घोषणा होण्याच्या आधीच्या काही दिवसांत जिथे जिथे शिवसेनेच्या सभा, बैठका, दौरे झाले. त्यात भाजप, मोदी आणि फडणवीस यांच्यावर टीका करण्याची एकही संधी उद्धव ठाकरे यांनी सोडलेली नाही. विशेष म्हणजे ‘चौकीदार चोर है’ म्हणून दिल्लीत केजरीवाल यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी संजय राऊत यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या मंचावर भाजपवर टीका केली होती. किंबहुना शिवसेना विरोधकांच्या सोबत निवडणुकीत आघाडी करेल की काय, असे वाटावे इतक्या टोकाला संघर्ष गेला असताना, उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत केलेली युती ही प्रत्यक्ष जनतेमध्ये किती टिकते, रुचते आणि मते मिळवून देण्यात यशस्वी ठरते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना शिवसेनेने अफजलखानाची उपमा दिलेली आहे. अर्थात या आधीच्या निवडणुकांमध्येही शिवसेनेने भाजपला जिव्हारी लागेल, अशी टीका केलीच आहे. मात्र, अफजलखानाची उपमा देऊन निवडणुकांमध्ये गनिमी काव्याने सत्ता हस्तगत करण्याचे मनसुबे पाहणाऱ्या शिवसेनेला भाजपचे निष्ठावान आणि पारंपरिक मतदार किती मदत करतील, हे आताच सांगता येणार नाही. मात्र, ज्या ठिकाणी भाजपची विचारधारा मानणारे, भाजपचे हक्काचे मतदार आहेत त्यांचे मन वळविण्यात, त्यांची समजूत घालण्यात नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे यांची टीम यशस्वी होते का, हेही पाहावे लागणार आहे.