सुपारीचे फुटणे ही बाब तशी लग्नकार्याशी म्हणजे मंगल विधीशी निगडित असली तरी, तिच्या देण्या-घेण्याला आणखी वेगळे अर्थ व संदर्भही आहेत. घात-आघाताशी निगडित हे संदर्भ गुन्हेगारी जगतातील कारवायांबद्दल जसे जोडले जातात, तसे निवडणुकांतील उमेदवारीबाबतही हल्ली ते दिले जाऊ लागले आहेत. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदार-संघातील येऊ घातलेल्या निवडणुकीसाठी शिवसेना नेते संजय राऊत यांनी पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचा आरोप करताना नाशिकच्या शिवाजी सहाणे यांनीही असाच ‘सुपारी’चा संदर्भ दिल्याने राजकीय आरोपांची सुपारी अडकित्त्यात अडकून गेली आहे.नाशकातील उन्हाची तलखी एकीकडे वाढत असतानाच उमेदवारीसाठी तहानलेल्यांच्या तडाख्याने शिवसेना घामाघूम झाली आहे. आणखी चार-सहा महिन्यांनी होऊ घातलेल्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हा माहौल तापून गेला आहे, आणि त्याला कारण ठरले आहे ते या मतदारसंघातून गेल्या वेळी लढलेल्या शिवाजी सहाणे यांच्या शिवसेनेतून हकालपट्टीचे. राष्ट्रवादीचे नव्हे तर मातब्बर नेते छगन भुजबळ यांचे उमेदवार म्हणविलेल्या जयंत जाधव यांना तोडीस तोड देत शिवसेनेच्या सहाणे यांनी बरोबरीची मते मिळविली होती. परंतु चिठ्ठीने झालेल्या फैसल्यात जाधव विजयी ठरले होते. या निकालाबद्दल न्यायालयाची पायरी चढली गेली; परंतु दरम्यानच्या काळात जाधव यांचा कार्यकाळ पूर्णही झाला आहे. त्यामुळे नशिबाने संधी हुकवलेल्या सहाणे यांनाच यंदा शिवसेनेची दुबार उमेदवारी मिळणे गृहीत धरले गेले होते. त्याच समजातून त्यांनी प्रचारही आरंभिला होता. परंतु उमेदवारीच्या निश्चितीऐवजी त्यांची पक्षातूनच गच्छंती घडून आल्याने ‘सुपारी’चा अध्याय पुढे आला आहे.शिवसेना नेते संजय राऊत मराठा द्वेष्टे असल्याचा आरोप करतानाच त्यांनी सुपारी घेऊन नरेंद्र दराडे यांना उमेदवारी दिल्याचा गौप्यस्फोट सहाणे यांनी केल्याने तो पक्षाच्या जिव्हारी लागला. तो खोडून काढण्यासाठी पक्षाच्या नवनियुक्त महानगरप्रमुखांसह मध्यंतरी बराच-काळ पक्ष कार्यालयाकडे न फिरकलेले माजी जिल्हाप्रमुखही माध्यमांना सामोरे गेलेले दिसून आले. दराडे काँग्रेसमधून शिवसेनेत आले आहेत. पक्षीय व्यासपीठावरही त्यांचा वावर नसतो, तरी त्यांची उमेदवारी पुढे आणली गेली व सहाणे यांना पक्षविरोधी ठरविले गेले. त्यामुळे शिवसेनेतील ‘सुपारी फुटणे’ स्वाभाविक ठरले आहे. अर्थात, मध्यंतरी भाजपाकडून नारायण राणे यांना नाशकातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता चर्चिली गेली असताना राणे यांना राज्यसभेत पाठविले गेले. त्यामुळे आपल्या मार्गातील खोडा दूर झाल्याबद्दल उपकृततेची भावना व्यक्त करण्यासाठी सहाणे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती, ही बाब राऊत यांच्यासारख्या चाणाक्ष नेत्याच्या नजरेतून सुटणे अशक्यच होते. शिवसेना व भाजपातील टोकाचा कलह पाहता सहाणे यांची ही कृती शहाणपणाची नव्हतीच, त्यामुळे ती पक्षविरोधी ठरावीही; परंतु तसे असले तरी त्याखेरीजच्या ‘सुपारी’कडे दुर्लक्ष होणारे नाही. कारण यापूर्वी महापालिका निवडणुकीत अशाच सुपाऱ्या घेऊन उमेदवाºया दिल्या गेल्याच्या आरोपातून तत्कालीन महानगरप्रमुख व माजी जिल्हाप्रमुखात हाणामारी घडून आल्याचे नाशिककरांनी पाहिले आहे. महापालिकेतील पदे देतानाही अशाच चर्चा घडून आल्या होत्या. त्यामुळे या नव्या सुपारी प्रकरणाने या पक्षाला पुन्हा त्याच मळलेल्या वाटेवर आणून उभे केले आहे.- किरण अग्रवाल
पुन्हा फुटली शिवसेनेतील ‘सुपारी’
By किरण अग्रवाल | Published: March 31, 2018 2:22 AM