- विजय बाविस्करराज्यात क्रीडा संस्कृती रुजावी, आंतरराष्टÑीय स्पर्धांमध्ये खेळाडूंनी पदके मिळवावीत, हा पुरस्काराचा हेतू असतो. यानिमित्ताने वेळेत कौतुकाची थाप पाठीवर पडल्यावर खेळाडू आणखी जोमाने कामाला लागू शकतात.शिवछत्रपती पुरस्कारांच्या घोषणेला अखेर मुहूर्त लागला. १७ फेब्रुवारी रोजी कार्यक्रमही होणार आहे. तब्बल तीन वर्षांच्या रखडलेल्या पुरस्कारांचे वितरण होईल. शासनाने यावेळी शिवजयंतीच्या दरम्यान पुरस्कार सोहळ्याचा मुहूर्तही पाळला आहे. परंतु, यानिमित्ताने एकंदरच या पुरस्कारांबाबत आणि क्रीडाक्षेत्राबाबत शासनाने गांभीर्याने विचार करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली. क्रीडाक्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे, यासाठी दरवर्षी हे पुरस्कार दिले जावेत, अशी अपेक्षा असते. मात्र, गेल्या ४६ वर्षांमध्ये फार कमी वेळा याबाबत नियमितता पाळण्यात आली आहे. १९६९-७० पासून ही योजना सुरू करण्यात आली. वैयक्तिक व सांघिक खेळांमध्ये सलग तीन वर्षे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व करणाºया खेळाडूंना हा पुरस्कार दिला जातो. प्रशिक्षक, संघटक, कार्यकर्त्यांबरोबरच अनेक वर्षे क्रीडाक्षेत्रात अहोरात्र मेहनत करीत खेळाडू घडविणाºया ज्येष्ठ संघटकांना जीवनगौरव पुरस्कारही सुरू करण्यात आला आहे. महिला संघटकांकरिता जिजामाता पुरस्कार हा स्वतंत्र पुरस्कार सुरू करण्यात आला. शारीरिकदृष्ट्या दिव्यांग असलेल्या खेळाडूंकरिता एकलव्य पुरस्कार, तर साहसी क्रीडाप्रकारात नेत्रदीपक कामगिरी करणाºयांसाठी साहसी क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. यासाठी खेळाडूंनी अर्ज करणे अपेक्षित असते. पुरस्कारांसाठी अर्ज मागविणे हेच गैर आहे. मुळात शासनाच्या क्रीडा विभागाकडे खेळाडूंची माहिती, कामगिरी यांची माहिती असणे आवश्यक आहे; परंतु केवळ खेळाडूंनी दिलेल्या माहितीवरच पुरस्कार दिले जातात. त्यातही निवड समितीच्या बैठका वेळेवर होत नाहीत. निश्चित केलेल्या नावांवर शिक्कामोर्तब होण्यापूर्वी त्यामध्ये अनेक दुरुस्त्या होतात. यादी निश्चित झाल्यानंतर क्रीडा खाते अन्य मंत्र्यांकडे गेल्यामुळे पुन्हा त्यांच्याकडून काही बदल होतात. शासनाने पुरस्कारांबाबत ठरविलेले अनेक निकष आता कालबाह्य झाले आहेत. काही महत्त्वाच्या स्पर्धांमधील कामगिरीचा पुरस्कारांसाठी विचारच केला जात नाही. त्यामुळे खेळाडूंवर अन्याय होतो. यंदाच्या पुरस्कारांबाबतही काही तक्रारी आता येऊ लागल्या आहेत. काही खेळाडू न्यायालयात जाण्याच्याही तयारीत आहेत. मुळात कोट्यवधी रुपये खर्च करून होत असलेल्या या सोहळ्याचा मूळ उद्देश राज्यात क्रीडा संस्कृती रुजावी, आॅलिम्पिकपासून इतर आंतरराष्टÑीय स्पर्धांमध्ये आपल्या खेळाडूंनी पदके मिळवावीत, हा असतो. पुरस्काराच्या निमित्ताने वेळेत कौतुकाची थाप पाठीवर पडल्यावर खेळाडू आणखी जोमाने कामाला लागू शकतात. परंतु, अनेकदा खेळाडूचा सूर हरविल्यावर त्याला पुरस्कार मिळाल्याची घोषणा होते. त्यातही खेळाडूला मिळतात केवळ एक लाख रुपये. त्यापेक्षा पुरस्कारप्राप्त खेळाडूंना प्रशिक्षणाच्या आणि अन्य सुविधा दिल्या, तर त्याचा जास्त उपयोग होऊ शकतो. यंदाच्या वर्षी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा होणार आहे. पुरस्कारांची केवळ खिरापत न वाटता त्यातून खेळाडूंना कामगिरी उंचावण्यासाठी नवी उमेद मिळावी, या दृष्टीने बदल करण्याची गरज आहे. तर, राज्यातील क्रीडा संस्कृती बहरून आॅलिम्पिकमध्येही आपले खेळाडू चमकतील.
शिवछत्रपती पुरस्कारांनी मिळावी उमेद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 3:05 AM