- इंद्रजित सावंतप्रसिद्ध इतिहास संशोधक
‘या युगी सर्व पृथ्वीवर मेंच्छ बादशहा, मराठा पातशहा ऐवढा छत्रपती झाला ही गोष्ट काय सामान्य झाली नाही.’शिवछत्रपतींचे मराठी भाषेतील पहिले चरित्रलेखन करणाऱ्या कृष्णाजी अनंत सभासद यांनी शिवराज्याभिषेकाचे महत्त्व वरील शब्दांत अधोरेखित केले आहे. ज्यांनी शिवराज्याभिषेक स्वत: पाहिला व जो शिवपुत्र राजाराम महाराजांच्या दरबारातील एक मुत्सद्दी होता, त्या सभासदाचे हे मनोगत आहे. खरे तर त्यांनी जे शिवचरित्र लिहिले ते खासा राजाराम महाराजांच्या आज्ञेने. या चरित्राचा लेखनकाळ १६९६ असा सर्वमान्य आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला ६ जून १६७४ ला आणि सभासद यांनी बरोबर वीस-बावीस वर्षांनी शिवछत्रपतींचे चरित्र लिहिले. इतक्या वर्षांनंतर त्यांच्या मनात शिवराज्याभिषेकाचा ठसा कसा उमटला होता, हे वरील वाक्यातून आपणास समजून येते. तत्कालीन मराठी माणूस शिवराज्याभिषेकाकडे कोणत्या नजरेने पाहत होता, हेही वरील उद्गारांवरून समजते. खासा शिवाजी महाराजांच्या नजरेत या राज्याभिषेकाचे महत्त्व किती होते, ते पाहणे उद्बोधक ठरेल. शिवाजी महाराजांनी या राज्याभिषेकावेळी अनेक नव्या गोष्टींचा अंगीकार केला.
राज्याभिषेकाअगोदर महाराजांच्या सदरेवरून ‘अजरख्तखाने राजेश्री सिवाजीराजे क्षमदौलतहू बजानिब कारकुनानी’ या फार्र्सी शब्दाच्या प्रभावाखालील मायन्याने आज्ञापत्रे सुटत होती. तत्कालीन मराठी भाषेवर फार्सीचा प्रभाव इतका गाढ होता की, मराठी भाषा लुप्त होते की काय अशी भीती होती. राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी या भाषेचा प्रभाव काढून टाकण्यासाठी फार्सी-मराठी अशा शब्दकोशाची निर्मिती करून घेतली. तो ‘राज्यव्यवहार कोश’ म्हणून प्रसिद्ध आहे. याच राज्याभिषेकाच्या दिवसापासून महाराजांनी तत्कालीन दख्खनेस म्हणजेच आजच्या महाराष्ट्रात व शिवकालीन कर्नाटकाच्या काही भागांत हजारो वर्षे चालत आलेल्या शालिवाहन शकालाही हद्दपार केले. महाराजांनी राज्याभिषेकाच्या दिवसापासून एक शकाची निर्मिती केली. या शकाचे नाव त्यांनी ‘श्री राज्याभिषेक शक’ असे ठेवले. (या राज्याभिषेक शकाला आपण ‘शिवशक’ म्हणतो.) अशा युगप्रवर्तक सुधारणा केल्यानंतर महाराजांच्या राजदरबारातून सुटणाºया पत्रांवर ‘स्वस्तीश्री राज्याभिषेक शक १ आनंदनाम संत्वसरे शनिवासरे श्री राजा शिवछत्रपती यांनी आज्ञा केली ऐसीजे’ असे येऊ लागले. राज्याभिषेकाअगोदरची व नंतरची अशी खासा महाराजांची शेकडो पत्रे उपलब्ध आहेत. या पत्रांवरूनच महाराजांनी आपले नाव राजश्री शिवाजीराजे भोसले हे बदलून श्री राजा शिवछत्रपती असे केले होते, हेही समजून येते. महाराजांनी आपल्या नावापुढे ‘छत्रपती’ म्हणजेच ‘छत्र धारण करणारा, छत्राचा अधिपती’ अशी बिरुदावलीही लावून घेतली होती.
रायगडावर महाराजांनी स्वत:स पवित्र जलाने अभिषेक करून घेतला. यास धार्मिक विधी एवढेच महत्त्व नव्हते; तर तो दिवस मराठ्यांच्या राज्याचे सर्वार्थांनी सार्वभौमत्व घोषित करण्याचा होता. हा राज्याभिषेक म्हणजे सार्वभौमत्वाचे प्रतीक असणारी शकनिर्मिती, स्वत:ची नाणी पाडणे, स्वत:ला राजा व ‘छत्रपती’ अशी बिरुदावली लावणे, अशा अनेक गोष्टी त्याचा एक भाग होत्या, हे शिवाजी महाराजांच्या कृतीतून दिसून येते. या दिवशी महाराजांनी स्वत:वर छत्र धारण केले. ही कृती तत्कालीन विश्वात सार्वभौमत्वाचे, स्वातंत्र्याचे प्रतीक होती. हे शिवछत्रपतींच्या एका पत्रावरून समजून येते. हे पत्र महाराजांनी मालोजी घोरपडे या आदिलशाही सरदारास लिहिले आहे. हे पत्र महाराजांचे राजकारण समजण्यासाठी उपयुक्त आहे. हे पत्र महाराजांनी राज्याभिषेकानंतर दक्षिण दिग्विजयाची मोहीम काढली होती, त्यावेळचे आहे. पत्रात महाराजांनी गोवळकोंड्याच्या कुतुबशहाशी झालेल्या भेटींचा वृत्तान्त सांगितला आहे. त्यात ते लिहितात- ‘त्यावरून आम्ही येऊन हजरत कुतुबशहाची भेट घेतली. भेटिचे समई पादशाही आदब आहे की शिरभोई धरावी, तसलीम करावी, परंतु आम्ही आपणावरी छत्र धरिले असे ही गोष्ट कुतुुबशहास मान्य होऊन शिरभोई धरणे व तसलीम करणे हे माफ केले. पादशहा तिकडून आले, आम्ही इकडून गेलो. पादशहानी बहुतच इज्जती होऊन गळ्यांत गळा लावून भेटले. आम्हांस हाती धरून नेऊन पवळी बैसविले.’ या पत्रात महाराज आम्ही आपणावरील छत्र धरिले असे म्हणतात. या एकाच वाक्यात ते छत्र धरणे या साध्या वाटणाºया कृतीतून प्रकटणारे सार्वभौमत्व सांगत असतात. राज्याभिषेकावेळी महाराजांनी ‘आपणावरी छत्र धरिले’ याचाच अर्थ महाराज त्या दिवसापासून स्वतंत्र, सार्वभौम राजा झाले होते व हे सार्वभौमत्व महाराजांनी कसे जपले होते आणि कुतुबशहासारख्या तत्कालीन हिंदुस्थानातील अधिपतीनेही शिवछत्रपतींचे हे स्वातंत्र्य व सार्वभौम होणे मान्य केले होते, हे वरील पत्रातून समजून येते.
शिवकाळात राज्याभिषेक होत नव्हते असे नाही. राजस्थानातील अनेक राजपूत राज्याभिषेक करवून घेत. जसवंतसिंग, मिर्झाराजे जयसिंग या औरंगजेबाच्या अंकित सरदारांनी राज्याभिषेक करून घेतल्याचे उल्लेख आहेत; पण राज्याभिषेक करून घेऊनही खºया अर्थाने हे राजे-महाराजे गुलामच होते; पण शिवाजी महाराजांनी ६ जून १६७४ ला जो राज्याभिषेक करून घेतला व स्वत: ‘छत्रपती’ ही बिरुदावली लावली, स्वत:वर छत्र धारण केले, राज्याभिषेक शकाची निर्मिती केली हे खºया अर्थाने स्वातंत्र्य सार्वभौमत्व घोषित करण्याची कृती होती हे शिवछत्रपतींच्या वरील पत्रातील आशयातून समजून येते. आज आपण शिवराज्याभिषेक दिन साजरा करताना शिवछत्रपतींच्या कृतीतून स्वातंत्र्याची प्रेरणा घ्यायची की नुसते प्रतीकात्मक अभिषेक सोहळे साजरे करायचे याचा विचार केला पाहिजे.