वयाची पन्नाशी उलटल्यावर रक्तदाब, मधुमेह यासारखे आजार जडण्याची भीती असते. त्यामुळे डोके शांत ठेवून पथ्यपाणी पाळून राहावे, असा सल्ला डॉक्टर देतात. अर्थात माणसाला जे लागू आहे ते राजकीय पक्षाला जसेच्या तसे लागू होत नाही. मात्र ५२ वा वर्धापन दिन साजरा करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलेली भाषणे पाहिल्यावर शिवसैनिकांमध्ये जोश निर्माण करण्याकरिता ही भाषा योग्य असली तरी वस्तुस्थिती बरीच भिन्न आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात ते बोलणार असतील तर उद्धव व राज ठाकरे भाषण करीत नसत. आदित्य यांनी वडिलांचे भाषण होण्यापूर्वीच स्वबळाचा शंख फुंकून टाकला, हा शिवसेनेतील लक्षणीय बदल आहे. अर्थात आदित्य जेव्हा स्वबळाचा नारा देत होते तेव्हा समोर बसलेल्या मंत्री व आमदारांनी टाळ्या पिटल्या नाहीत. कारण स्वबळावर सत्ता प्राप्त करण्यापासून शिवसेना कित्येक कोस दूर आहे, याची जाणीव त्यांना आहे. उद्धव यांनीही स्वबळाचा नारा देत पुत्राची री ओढली. मात्र सध्या भाजपासोबत असलेली सत्ता बिलकूल सोडणार नाही हे जाहीर केले. सत्तेतून बाहेर पडा शिकवणारे हे कोण टिकोजीराव, असा त्यांचा विरोधकांबाबत सूर होता. महाराष्ट्रात भाजपा हा आपला मोठा भाऊ झाला आहे हे स्वीकारण्यास शिवसेनेचे मन तयार नाही. मुंबईत विधानसभा निवडणुकीत भाजपाला शिवसेनेपेक्षा अधिक यश मिळाले, याची सल कायम आहे. सत्ता सोडली तर शिवसेना फुटण्याची भीती आणि सत्तेत राहिलो तर बदनाम व अपमानित होण्याची अपरिहार्यता, अशा कात्रीत सापडलेल्या उद्धव यांनी आपल्याच सरकारविरोधात उच्चरवात टीका करण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक मग ती कल्याण-डोंबिवली महापालिकेची असो की पालघरची लोकसभा पोटनिवडणूक भाजपा-शिवसेना या सत्ताधारी पक्षांनी एकमेकांची उणीदुणी काढायची आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसह अन्य पक्षांना चर्चेतून हद्दपार करायचे, अशी ही रणनीती आहे. स्वबळावर यश दिसले तर एकमेकांच्या उरावर बसायचे आणि विरोधकांची एकजूट दिसताच परस्परांच्या गळ्यात गळे घालायचे, असे हे संधिसाधू राजकारण शिवसेना-भाजपा करीत आहे. मात्र यापूर्वी युतीचे सरकार सत्तेवर असताना एकमेकांची धुणी धुतल्यामुळे नाराज मतदार मतदान केंद्रावर गेला नाही आणि त्यामुळे अवघ्या पाच वर्षांत युती सरकार अरबी समुद्रात बुडाल्याचा इतिहास आहे. त्यामुळे शिवसेनेला लवकरात लवकर ही कोंडी फोडावी लागेल व चिंतामुक्त व्हावे लागेल. मात्र खरा महत्त्वाचा मुद्दा प्रा. मनोहर जोशी यांनी उपस्थित केला. अन्य राज्यांत प्रादेशिक पक्ष सत्तेवर आले पण महाराष्ट्रात शिवसेनेला स्वबळावर सत्ता का मिळाली नाही, हा त्यांचा रास्त सवाल आहे. मुस्लीम लीगचा द्वेष करायचा आणि बनातवालांशी हातमिळवणी करायची, काँग्रेसविरोध खुंटीला अडकवून आणीबाणीला समर्थन द्यायचे, अशा चुकांमुळे शिवसेना संपूर्ण सत्ता हाती घेऊ शकली नाही, हेच जोशींच्या प्रश्नाचे उत्तर आहे. आताही भाजपाबाबत शिवसेनेची भूमिका संदिग्ध आहे. भावनेचे राजकारण करणाऱ्या पक्षांचे मतदार पक्ष नेतृत्वाने अचानक यू टर्न घेतला तर गोंधळतात, निराश होतात हे सांगायला खरे तर जोशीबुवांची गरज नाही.
शिवसेनेचे चिंतन आणि चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 1:17 AM