दरडी कोसळणे, डोंंगराचा कडा कोसळणे, जमिनीला भेगा पडणे या घटना भूगर्भातील हालचालीमुळे घडतात. पावसाळ्यात तर डोंगर कपारीत राहणारी कुटुंबे मृत्यूच्या छायेतच जगत असतात.यंदाचा भीषण दुष्काळाचा उन्हाळा सरला पावसाळा सुरु झाला. पण या दुष्काळातून महाराष्ट्र अजूनही बाहेर पडलेला नाही. मात्र विदर्भ मराठवाड्यात मान्सूनपूर्व तसेच मान्सूनच्या पावसाने चांगली हजेरी लावून दुष्काळग्रस्त भागाला थोडाफार दिलासा दिला आहे. गेल्या चार दिवसांपासून कोकणातही पावसाची संततधार सुरू आहे. या पावसापाठोपाठ डोंगर खचण्याची घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील देवली येथे बुधवारी घडली, त्यामुळे डोंगरावरील एका घराची भिंत कोसळली. जीवितहानी किंवा मोठे नुकसान नसले तरी या घटनेने पुणे जिल्ह्यातील माळीण दुर्घटनेची आठवण ताजी करुन देताना प्रशासनालाही खडबडून जागे केले आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण या गावावर ३० जुलै २०१४ रोजी अस्मानी कहर कोसळला होता. डोंगराचा कडा गावावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत १५१ जणांचा बळी गेला होता. त्या घटनेनंतर राज्यातील डोंगरमाथ्यावरील तसेच डोंगरालगत राहणाऱ्या कुटुंबांच्या सुरक्षेचा प्रश्न प्रकर्षाने उपस्थित झाला. तत्पूर्वीही डोंगर खचणे, त्याखाली घरे किंवा कुटुंबे गाडली जाणे अशा घटना घडतच होत्या. विशेषत: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्या घडल्या होत्या. बुधवारी ज्या तालुक्यातील डोंगर खचला त्याच तालुक्यातील काळसे गावात २००५मध्ये डोंगराचा कडा कोसळून घरावर एक कुटुंबच त्याखाली गाडले गेले होते. आजही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सात डोंगरकडे धोकादायक म्हणून प्रशासनाने घोषित केले आहेत. त्या ठिकाणी राहाणाऱ्या कुटुंबांना स्थलांतराच्या नोटीसा बजावल्या आहेत. देवली-वाघवडे हे गावही त्यामध्ये येते. तेथील ४० कुटुंबांना अशा नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. त्यातील सहा कुटुंबाना तातडीने बुधवारी हलविण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बडदहसोले आणि शिवणे बुद्रुक ही दोन गावेही अशीच डोंगरात राहतात. वडद हसोले येथे सहा वर्षापूर्वी डोंगर कोसळून एकाच कुटुंबातील आठ जण मृत्युमुखी पडले होते. शिवणे बुद्रुक येथेही रस्त्यात, जमिनीत भेगा पडणे, जमिनीतून आवाज येणे अशा घटना अधून मधून घडत असतात. दापोली तालुक्यातील हर्णे बंदराजवळील राजेवाडी येथे २०१० मध्येही डोगराचा कडा घरावर कोसळून एकाच कुटुंबातील पाच जण मृत्युमुखी पडले होते. सातारा जिल्ह्यातील पाटण, जावळी, सातारा तालुक्यातील सुमारे १५ हून अधिक गावे अशीच डोंगर कपारीत राहतात. त्यातील पांढरेपाणी हे गाव तर डोगराच्या शिळेखालीच राहात असल्याने नेहमी मृत्युच्या छायेत असते. वास्तविक दरडी कोसळणे, डोंंगराचा कडा कोसळणे, जमिनीला भेगा पडणे या घटना भूगर्भातील हालचालीमुळे घडतात. विशेषत: पावसाळ्यात अशा घटनांचे प्रमाण अधिक असते. अशा डोंगर कपारीत राहणारी कुटुंबेही नेहमीच मृत्युच्या छायेत जगत असतात. त्यात अशी एखादी दुर्घटना घडली की ती कुटुंबे उद्ध्वस्त होऊन जातात. दैवी कोप समजून दैवालाच दोष देत राहातात. यामुळे डोगरांवर किंवा डोंगरालगतच्या गावांना, विशेषत: प्रशासनाने जे डोंगर धोकादायक म्हणून निश्चित केले आहेत, तेथील कुटुंबाना पर्यायी जागा देऊन त्यांचे तातडीने पुनर्वसन करणे गरजेचे आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. अगदी माळीण गावाचेही अद्याप १०० टक्के पुनर्वसन झालेले नाही. नित्यनेमाने पावसाळा सुरू होण्यापूर्वी संबंधित कुटुंबाना नोटिसा बजावल्या जातात. सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले जाते आणि ते केले की आपली जबाबदारी संपल्याच्या आविर्भावात प्रशासन राहाते. एखादी दुर्घटना घडली की मगच ते खडबडून जागे होते. उपाय योजना, पुनर्वसन यावर चर्चा सुरु होते, घोषणा केल्या जातात. पण अंमलबावणीत घोडे अडते व ये रे माझ्या मागल्या सुरू राहाते. - वसंत भोसले
डोंगरातील वस्त्या मृत्यूच्या छायेत
By admin | Published: July 01, 2016 4:56 AM