धर्मात दानाला अतिशय महत्त्व आहे. दान केल्यास पुण्य मिळते, या भावनेने दान करणाऱ्यांची संख्या कमी नाही. गुप्तदान करणा-यांचीही वानवा नाही. तिरुपती बालाजीपासून तर आपल्या शिर्डीच्या साईबाबापर्यंतची श्रीमंत मंदिरे याची मूर्तिमंत उदाहरणे आहेत. परंतु दान केवळ देव आणि मंदिरांपुरतेच मर्यादित असावे का? देव शोधायचा असेल तर माणसात शोधा, असे सा-याच महापुरुषांनी सांगितले आहे, मग रक्ताच्या एका थेंबासाठी माणूस मृत्युशय्येवर असताना त्याला रक्त का मिळत नाही? रक्त उपलब्ध नसल्याने जीवास मुकणा-यांची संख्या मोठी आहे. २५ ते ३० लाख लोकखंख्येच्या नागपुरात एक टक्का लोकही रक्तदान करीत नसल्याचा धक्कादायक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. संपूर्ण देशाचे हेच चित्र आहे, असे का व्हावे? या देशात देवावर नितांत विश्वास असणारे आणि दान करणाºयांची संख्या कमी नसतानाही ही परिस्थिती का निर्माण व्हावी. रक्तदान हेच श्रेष्ठदान असे मोठ्या अभिमानाने म्हटले जाते. परंतु ते वास्तवात का उतरत नाही. आपण कुठे कमी पडतोय? एखाद्या रुग्णाला त्याची जितकी गरज आहे, तितकीच देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढत असलेल्या सैनिकांनाही रक्ताची गरज भासते. देशभक्तीच्या भावनेने आपले मोबाईलचे व्हॉट्सअॅप, फेसबुकसह सोशल मीडियावरील संदेश ठासून भरलेले दिसून येतात, मग रक्तदान करण्याची इच्छा निर्माण का होत नाही. रक्ताला जात-धर्म नाही म्हणून तर नव्हे ना? रक्तालाही कदाचित जात-धर्म असता तर जाती-धर्मनिहाय रक्तदान शिबिरे झाली असती. परंतु या परिस्थितीतही अनेकजण मोठ्या उत्स्फूर्तपणे रक्तदानासाठी पुढाकार घेतात. मात्र शासकीय व सेवाभावी ब्लड बँक सोडल्या तर अनेक रक्तपेढ्यांनी रक्ताचा धंदा उघडला आहे, त्यामुळेही अशा स्वेच्छेने रक्तदान करणाºयांच्याही उत्साहावर पाणी फेरले जात आहे. असो रक्ताचा रंग एकच आहे आणि त्याची सर्वांनाच गरज आहे. त्यामुळे स्वेच्छेने रक्तदान करण्यासाठी शासनाला याबाबत जनजागृती करण्याची गरज आहे. ती केलीही जात आहे. परंतु त्याची व्याप्ती वाढवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. समाजातील जातीय, धार्मिक आणि सामाजिक संघटनांच्या नेत्यांचे समाज ऐकतो. अशा लोकांनीही स्वत: पुढाकार घेऊन आणि शासनानेही अशा लोकांच्या सहकार्याने रक्तदानासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. रक्तदान हेच श्रेष्ठदान आहे, ही बाब प्रत्येकाच्या मनपटलावर कोरली जाईल, तेव्हाच खºया अर्थाने रक्तदानाची चळवळ ही लोकचळवळ होईल.
ही लोकचळवळ व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:48 AM