अर्थमंत्री अरुण जेटली हे लोकसभा निवडणुकीत पडलेले पुढारी आहेत. मोदींची लाट देशात असताना आणि तिच्या जोडीला पंजाबातला शिरोमणी अकाली दल हा प्रबळ प्रादेशिक पक्ष उभा असताना जेटलींना अमृतसर मतदारसंघात काँग्रेसच्या कॅ. अमरिंदरसिंग यांच्याकडून पराभूत व्हावे लागले. तेवढ्यावरही मोदींनी आपल्या अधिकारात त्यांना मंत्रिमंडळात घेतले व राज्यसभेवर आणले. आपल्याला नसलेला जनाधार विसरून त्यांच्यासारखी वजनदार माणसे जेव्हा असभ्य विधाने करतात तेव्हा देशातील राजकारणाच्या मध्यवर्ती अवस्थेविषयीचीच चिंता वाटू लागते. प्राची किंवा निरंजना, गिरीराज सिंह किंवा रामशंकर कथेरिया आणि साक्षी महाराज किंवा अनंतकुमार ही माणसे तसे बोलताना पाहण्याची व ते लक्षात न घेण्याची देशाला आता सवय झाली आहे. अरुण जेटलींचे मात्र तसे नाही. ते कायदेपंडित आहेत. वाजपेयींच्या मंत्रिमंडळात (वाजपेयींच्या इच्छेविरुद्ध) त्यांनी काम केले आहे आणि राजकारणाचा त्यांना असलेला अनुभवही मोठा आहे. तरीही परवा राहुल गांधींनी मोदींवर केलेल्या टीकेवर त्यांनी जी मल्लीनाथी केली ती त्यांच्या व त्यांच्या पक्षाच्या सध्याच्या असहिष्णू व तुच्छतावादी वृत्तीवर प्रकाश टाकणारी आहे. ‘बड्या भांडवलदारांनी दडविलेला काळा पैसा पांढरा करण्याची जी संधी मोदींच्या सरकारने त्यांना दिली तिचा ‘फेअर अॅन्ड लव्हली’ असा उपरोधिक उल्लेख राहुल गांधींनी केला. त्याला सरळ उत्तर न देता जेटली म्हणाले, राहुल गांधी प्रौढ वयात आले आहेत पण त्यांना या वयातही यावी तशी समज आल्याचे मला दिसत नाही. राहुल गांधींनी अमेठीमधून सलग दोनदा लोकसभेची निवडणूक जिंकली आहे. काँग्रेसचे ते राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या वीस महिन्यात नरेंद्र मोदींची देशातील लोकप्रियता ५७ टक्क्यावरून उतरून ४० टक्क्यांवर आली असताना राहुल गांधींची लोकप्रियता आठ टक्क्यंवरून वाढून २२ टक्क्यावर गेल्याचे सर्वेक्षणात आढळले आहे. मोदी आणि राहुल या दोघांच्या मध्ये उभा राहू शकेल असा दुसरा नेता देशातील कोणत्याही पक्षात आता नाही. राहुल गांधींना लाभलेल्या लोकप्रियतेच्या तुलनेत मोदींच्या मंत्रिमंडळातीलच नव्हे तर पक्षातीलही दुसरा नेता येऊ शकणारा नाही. अशा मागे राहणाऱ्या पुढाऱ्यात अर्थातच अरुण जेटलींचाही समावेश आहे. तरीही त्यांनी राहुल गांधींची ‘समज’ संसदेत काढून आपल्या प्रौढपणाचा व पराभूत पुढारकीचा बडेजाव मिरविला असेल तर तो त्यांच्याविषयीची अनुकंपा वाटायला लावणारा प्रकार आहे. (मात्र जेटलींविषयीची अनुकंपा जराही मनात येऊ न देता प्रत्यक्ष नरेंद्र मोदींनी राहुलविषयी जे विपरित वक्तव्य नंतर केले ते पाहता आपल्या राजकारणाने पातळी राखायची नाहीच असे ठरविले असावे असेच वाटायला लावले. त्यांनी राहुल यांना ‘वय होऊनही समज न आलेला’ असे त्यांचे नाव टाळून लोकसभेत म्हणून टाकले.) राजकारणात संवादाची जागा वादाने घेणे आणि त्या वादाने तीव्र स्वरूप धारण करणे हे समजण्याजोगे असले तरी संवादांनी अवमानास्पद पातळीवर उतरणे हे न समजणारे आहे. राहुल गांधींनी लोकसभेत मोदींच्या सरकारला ‘सूट-बूटवाली सरकार’ हे विशेषण चिकटविल्यापासूनच त्यांच्यावर उधळली जाणारी भाजपावाल्यांची शिव्यांची लाखोली वाढत गेली आहे. ते अजून अपक्व आहेत, त्यांना राजकारणाचा अनुभव नाही, घराण्याच्या मोठेपणामुळे त्यांना नेतृत्व लाभले आहे इथपासून सुरू झालेली टीका त्यांना ‘नाजायज औलाद’ म्हणण्याच्या खालच्या पातळीवर उतरलेली देशाने पाहिली आहे. पं. मोतीलाल नेहरू, पं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी असा थोर वारसा व त्याचा संचित संस्कार लाभलेल्या राहुल गांधींवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यापर्यंत भाजपाच्या लोकांची मजल गेली आहे. तिला उत्तर देताना ‘देशभक्ती माझ्या रक्तात आहे. ती तुम्ही मला शिकविण्याची गरज नाही’ हे राहुल गांधींनी काढलेले उद्गार अरुण जेटलींसह त्यांच्या पक्षाला बरेच काही सांगू शकणारे आहे. ‘अवतार’ (इन्कार्नैशन) या नावाच्या सध्या गाजत असलेल्या आपल्या पुस्तकाविषयी त्याचे लेखक व इतिहास संशोधक सुनील खिलनानी म्हणतात ‘खरी देशभक्ती खोट्या आत्मस्तुतीत नसून परखड आत्मपरीक्षणात आहे’. राहुल गांधींच्या दोन पूर्वजांनी देशासाठी केलेले बलिदान अरुण जेटलींनी नुसते आठवून पाहिले तरी त्यांना असे आत्मपरीक्षण करण्याची प्रेरणा मिळू शकेल. त्याचवेळी राहुल किंवा सोनिया गांधी यांच्याविषयी बोलताना वा त्यांच्यावर टीका करताना केवढा विवेक बाळगायचा हेही त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना समजू शकेल. दुर्दैवाने राजकारण ही शिकण्याची शाळा राहिली नसून इतरांना शिकविण्याची व ऐकविण्याची बाब आता बनली आहे. त्यामुळे जेटली वा मोदींकडून तसल्या आत्मपरिक्षणाची अपेक्षा बाळगणे हीच आता चूक ठरावी अशी गोष्ट झाली आहे.
वयस्कांनीही समज राखू नये काय ?
By admin | Published: March 08, 2016 9:04 PM