भारतीय संस्कृतीमध्ये ‘मौन’ ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण साधना मानली गेली आहे. मौन या शब्दापासूनच ‘मुनि’ शब्द तयार झालेला आहे. ज्याने मौन साध्य केले, तो मुनि झाला. ज्यांनी मौनाला प्राप्त केले, त्यांना परमानंद प्राप्त झाला, असे जाणकारांचे मानणे आहे. मौन आपल्या मनाची अशी अवस्था आहे, जेव्हा आपले मन पूर्णत: शांत होते व सर्व विचार-प्रवाह क्षीण झालेले असतात. विचार-प्रवाह थांबल्याबरोबर साधकाला आपल्या मूळ स्वरूपाची माहिती होते व त्याला परमानंदाची प्राप्ती होते. मन जेवढे गतिमान राहील, तेवढीच अस्वस्थता आणखी वाढते. शेवटी मन जेव्हा शांत होते, तेव्हाच व्यक्तीला चांगले वाटते. जेव्हा विचाराचा प्रवाह अनियंत्रित होतो, त्यावेळी अस्वस्थता थांबविण्यासाठी चिकित्सक औषधांचा उपयोग करतात. निद्रावस्थेत मानवाला विश्रांती मिळते, कारण त्यावेळी त्याचे मन पूर्णत: शांत असते. मनाची विशेषता ही आहे की ते सतत गतिमान असते. आपण त्याला जेवढे दाबण्याचा प्रयत्न करतो तेवढे ते अनियंत्रित होते. एका क्षणातच आपल्या मनात हजारो विचार येतात. मनात उठणाऱ्या या विचारांचे जेव्हा आपण आकलन करतो, तेव्हा असे वाटते की हे सर्व विचार भूतकाळाशी संबंधित आहेत किंवा भविष्यकाळाशी. भूतकाळ किंवा भविष्यकाळाच्या विचाराने काळजी किंवा तणाव उत्पन्न होतो. भूतकाळ समाप्त झाला व भविष्यकाळ अद्याप यायचा आहे. शेवटी हे दोन्ही आपल्या हातात नाही. अर्थातच भूतकाळात घडून गेलेल्या घटनांना आपण काहीही करू शकत नाही, त्याचप्रमाणे भविष्यात होणाऱ्या घटनासुद्धा आपल्या आवाक्यात नसतात. म्हणूनच आपण कुठलेही क्रियात्मक काम वतर्मानकाळात करू शकतो. आपण जसे आपले मन भूतकाळ व भविष्यकाळापासून दूर करून वर्तमान काळावर केंद्रित करतो, तसे मौन धारण करतो. गरज नसताना बोलल्याने ऊर्जेचा नाश होतो आणि याच कारणामुळे आपल्याकडे मौनव्रताचे महत्त्व विशद केले आहे. सप्ताहातून एक दिवस मौन पाळले तर आपले मन अंतर्मुख होते व मौन साध्य करणे सोपे जाते. याशिवाय अन्नाचा खूप मोठा प्रभाव आपल्या मनावर होत असतो. अर्थातच मौनासाठी अन्न खूप उपयुक्त ठरते, जे शरीराला ऊर्जा तर देतेच; परंतु उत्तेजना निर्माण करत नाहीत. ‘ध्यान’ आपल्या मनाला शांत करून मौन प्राप्त करण्याचा सर्वोत्तम विधी आहे. आपण कुठल्याही विधीनुसार मौन साध्य करू शकतो. ध्यान सर्वप्रथम आपल्या मनाला शांत करते. जेव्हा शरीर शांत व शिथिल होते, तेव्हा श्वासाची गतीही मंद होते. श्वासाची गती मंद झाल्यामुळे आपले विचार-प्रवाहसुद्धा थांबतात. या अवस्थेतच मौन प्राप्त होते व साधक सोऽहम् बनतो. -डॉ. भूषणकुमार उपाध्याय
मौन
By admin | Published: April 03, 2017 11:56 PM