शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

आजचा अग्रलेख: एक बँक बुडते तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2023 8:29 AM

जगातील १६ व्या क्रमांकाची बँक असलेल्या सिलिकॉन व्हॅली बँकेची संपत्ती २१० अब्ज अमेरिकी डॉलरपेक्षा जास्त आहे.

अलीकडच्या दशकात परवलीचा शब्द ठरलेल्या स्टार्ट अप उद्योगांना सुलभ वित्तपुरवठा करणारी आणि त्यामुळेच जगभरातील अशा उद्योजकांची डार्लिंग असलेली अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक गेल्या शुक्रवारी बुडाली आणि जगभरात कल्लोळ झाला. त्यानंतर सोमवारी जगभरातल्या भांडवली बाजारांना या  घटनेचा दणदणीत फटका बसला. हा फटका केवळ बँक बंद झाली या वृत्ताचा आहे. नेमके काय झाले आहे आणि याची व्याप्ती किती आहे, याची माहिती येत्या काही दिवसांत हळूहळू उजेडात येईल; आणि मग विविध बाजारांना याचे फटके अन् चटके जाणवत राहतील. 

जगातील १६ व्या क्रमांकाची बँक असलेल्या सिलिकॉन व्हॅली बँकेची संपत्ती २१० अब्ज अमेरिकी डॉलरपेक्षा जास्त आहे. अमेरिकेतील अनेक प्रांतात बँकेच्या शाखा आहेत. ही बँक प्रामुख्याने तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या, आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या यांना वित्तपुरवठा करते. बँकेच्या एकूण व्यवसायापैकी तब्बल ४४ टक्के वित्तपुरवठा हा या दोन क्षेत्रांकडे एकवटलेला आहे. अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेल्या यूएस फेडरल रिझर्व्हने गेल्या काही दिवसांत सातत्याने व्याजदरात वाढ केल्यामुळे या क्षेत्रांवर त्याचा परिणाम झाला. त्याचा फटका बँकेच्या व्यवसायावर होत गेला. बँकेने ज्या कंपन्यांना कर्ज दिले, त्या कंपन्यांनी कर्जाची परतफेड करणे थांबवले.  २०२१ पर्यंत बँकेकडे १८९ अब्ज अमेरिकी डॉलरच्या ठेवी होत्या. या पैशांच्या विनियोगासाठी बँकेने लाखो डॉलरचे रोखे खरेदी केले. मात्र, रोख्यांवर मिळणाऱ्या व्याजाचे दर घसरत गेल्यामुळे  बँकेच्या पदरात तोटा येण्यास सुरुवात झाली. आमदनी कमी आणि खर्च जास्त, अशा विचित्र कात्रीत बँक सापडत गेली.  बँकेची आर्थिक तब्येत दोलायमान झाल्याची कुणकुण गुंतवणूकदारांना लागताच त्यांनी बँकेतून ठेवी काढण्यास सुरुवात केली. बँकांतून मोठ्या रकमा काढण्यास सुरुवात झाल्याची बातमी पसरली की साहजिकच लोक आपल्या संचित जतनासाठी रांगा लावतात. बँकिंग क्षेत्रात या प्रकाराला ‘बँकेला रन लागला’ असे म्हणतात. हा रन इतक्या वेगाने आणि झपाट्याने लागला की बँकेला स्वतःची मालमत्ता विकण्याची वेळ आली. घसरणीचे हे गुरुत्वाकर्षण अखेर बँकेला खड्ड्यात घेऊन गेले आणि सरता शुक्रवार बँकेला कुलूप लावून गेला. 

या प्रकरणामुळे २००८ साली लेहमन ब्रदर्स बुडून आलेल्या मंदीची लोकांना आठवण व्हायला लागली आहे. सिलिकॉन व्हॅली बँक थेट उद्योगांना कर्ज देत असल्यामुळे हे उद्योग अडचणीत आले, तर अनेक देशांतील अनेक कंपन्या  अडचणीत येतील. एक बँक बुडाली एवढीच या प्रकरणाची व्याप्ती नाही, तर नव्या उद्योगांना विशेषतः स्टार्ट अप्सना या बँकेकडून सुलभपणे होणाऱ्या वित्तपुरवठ्यालाच खीळ बसली आहे. यामुळे अनेक प्रकल्प खोळंबतील. त्यांना प्रकल्पपूर्तीसाठी नवे दरवाजे ठोठवावे लागतील. यातून वित्ताची किंमत महागेल. परिणामी, प्रकल्प महागतील. प्रकल्पातून येणारे उत्पादन महागेल आणि उत्पादन महागले की त्याची किंमतदेखील ग्राहकांना भरावी लागेल. अशी ही दुष्ट साखळी! भारतातील अनेक स्टार्ट अप कंपन्यांनीदेखील या बँकेकडून भांडवल घेतले आहे. त्यामुळे दुष्टचक्राच्या वादळात भारतीय कंपन्याही भरडल्या गेल्या तर आश्चर्य वाटायला नको. 

एक बँक बुडते तेव्हा काय होते? कोणत्याही देशाच्या बँकिंगची रचना ही  अर्थव्यवस्थेचा कणा असते. त्यामुळेच खुद्द सरकारदेखील बँकिंग व्यवसायात हस्तक्षेप न करता, कायद्यान्वये शिखर बँकेची स्थापना करते. ही शिखर बँक देशातील सर्व प्रकारच्या बँकांचे नियंत्रण व नियमन करते. वित्त बुडणे म्हणजे अर्थव्यवस्था कोसळणे इतके साधे गणित असल्यामुळे बँकांनादेखील वित्त व्यवसाय करताना अनेक नियम व कठोर निकषांचे पालन करावे लागते.  अशा पद्धतीचे नियमन व निकष जगात सर्वत्र आहेत. मग, तरीही बँक का बुडते? तर स्पर्धात्मक वातावरणामध्ये व्यवसायवृद्धी करण्यासाठी नियमांतील पळवाटांतून वित्त व्यवस्थापनाची नवीन समीकरणे मांडण्याचा बँका प्रयत्न करतात. मात्र, हे करताना बाजारात होणाऱ्या सर्वच घडामोडी त्यांच्यावर प्रभाव टाकत असतात. सिलिकॉन व्हॅली बँक बुडण्यामागे बँकेतील अंतर्गत घडामोडी जितक्या जबाबदार आहेत तितकाच हातभार बँक बुडण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या घडामोडींचादेखील लागला आहे. विचित्र चक्रव्यूहात फसलेल्या बँक व्यवस्थापनाला बाहेर पडण्याचा मार्गच न गवसल्यामुळे अभिमन्यूचा मृत्यू अटळ झाला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रAmericaअमेरिका