- राजेश शेगोकारशेतीसंदर्भातील सरकारी धोरणांच्या अपयशाचा परिपाक म्हणजे शेतकरी आत्महत्या! खर्च अन् उत्पन्न यामधील तफावतीमुळे शेतीकडे वळण्यास युवक इच्छुक नाहीत. त्याचा फायदा राजकीय पक्ष घेत आहेत. भावनिक मुद्दे समोर करून ते युवकांची ऊर्जा भलत्या कामांसाठी वापरत आहेत. त्यामुळे युवकांसाठी पुढाकार घेत, शेतकरी संघटना आता युवा परिषदेचे आयोजन करीत आहे.बियाणं खाण्यासाठी नसतं, त्यामुळे ते जपा, खराब करू नका, असे शरद जोशी नेहमी म्हणत. त्यांना अभिप्रेत असलेलं बियाणं म्हणजे विद्यार्थी! युवकांना शिकू द्या, त्यांच्यावर श्रमप्रतिष्ठेचे संस्कार करा; पण त्यांना आंदोलनात उतरविण्याची घाई करू नका, अशी त्यांची शिकवण असे. त्यामुळेच त्यांनी संघटनेत विद्यार्थी आघाडीच्या निर्मितीला विरोध केला. कालांतराने युवकांची आघाडी तयार केली खरी; मात्र युवाशक्तीचा वापर केवळ आंदोलनांसाठीच करणे नेहमीच टाळले. अनेक राजकीय पक्ष व संघटना मात्र युवाशक्तीची दिशाभूल करून, त्यांचा वापर आपला राजकीय कार्यक्रम रेटण्यासाठी करतात. हे लक्षात घेऊन आता शेतकरी संघटनेने अर्थभान असलेला युवक घडविण्यासाठी युवा शक्तीला साद घातली आहे.शेतकरी संघटनेच्या इतिहासात प्रथमच, येत्या २२ एप्रिल रोजी अकोला जिल्ह्यातील अकोट येथे युवा परिषद होत आहे. देशात १८ ते ३५ वयोगटातील युवकांची संख्या लक्षणीय आहे. या वयोगटातील युवकांसमोर शेतीच्या प्रश्नांचे मंथन होऊ घातले आहे. कधी काळी कनिष्ठ समजल्या गेलेली नोकरी आज एकदम पहिल्या रांगेत श्रेष्ठत्व घेऊन बसली आहे. त्यामुळेच युवकांचे लोंढेच्या लोढें नोकरीच्या मागे लागत आहेत. त्या तुलनेत नोकऱ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यातही सरकारने आता नोकर कपातीचे धोरण स्वीकारल्याने, नोकरी मिळविण्यासाठीची स्पर्धा जीवघेणी ठरत आहे. एकीकडे नोकºयांची अशी स्थिती असताना, दुसरीकडे उद्योजकतेचे धोरणही आवाक्यात नाही. उद्योगासाठी लागणारे भांडवल, परिमटराज असे मोठे प्रश्न ग्रामीण भागातील युवकांसमोर उभे आहेत. त्यामुळे नोकरी नाही, धंदा उभारता येत नाही अन् या दोन गोष्टींच्या मागे लागल्यामुळे शेतीत काम करण्याची मानसिकता संपलेली! परिणामी, शेती करणाºया युवकांची संख्या झपाट्याने घटली आहे. त्यातच सरकारी धोरणांच्या अपयशामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या. खर्च अन् उत्पन्न याचा कुठेही मेळ लागत नसल्याने शेती कसण्यासाठी युवक इच्छुक नाहीत. प्रचलित धोरणांमध्ये युवकांसाठी भविष्य दिसत नसून, आधुनिक शेतीची मानसिकता रुजविण्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी युवकांशी संवाद साधणे अगत्याचे आहे. भावनिक मुद्यांवर चेतवल्या जाणाºया चुकीच्या आंदोलनांपासून युवकांना वाचवण्यासाठी युवा परिषद एक अभ्यासवर्गच ठरू शकेल. शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी विदर्भाच्या अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमधील युवकांसोबत संवाद साधत, त्यांना त्यांच्या अन् शेतीच्या पुढे उभ्या असलेल्या प्रश्नांची जाण करून दिली. केवळ भावनेच्या भरात विचार न करता, शेतीचे अर्थकारण समजून घ्या, अर्थवादी व्हा, हा शेतकरी संघटनेचा आग्रह आहे. या देशात सर्वाधिक रोजगार निर्माण करण्याची क्षमता शेतीत आहे. त्यामुळे श्रम प्रतिष्ठा व श्रम मूल्य याचे संस्कार युवकांमध्ये रुजविण्याची वेळ आली आहे. मर्यादा असलेल्या नोकºया वा उद्योगांच्या मागे लागून उमेदीची वर्षे वाया घालविण्यापेक्षा शेतीचे अर्थकारण समजून घेत, नव्या युगाची शेती केली, तर शेती अन् शेतकरीही वाचेल, अशी मांडणी करून नव्या पिढीला साद घालण्याचा शेतकरी संघटनेचा प्रयत्न आहे. अलीकडे युवकांना शेती साक्षर करण्याची प्रक्रियाच थांबली होती. युवा परिषदेच्या निमित्ताने त्या प्रक्रियेस आश्वासक सुरुवात होत आहे.
शेतकरी संघटनेची युवकांना साद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 2:58 AM