जुळ्या मुलांचं साऱ्यांनाच आकर्षण असतं. निदान पाहणाऱ्यांना तरी. त्यातही हे जुळे जर सेम टू सेम, डिट्टो एकसारखे असतील तर अनेकांची फसगत होते. त्यामुळेच जुळे भाऊ किंवा बहिणी यावर आधारित अनेक चित्रपट आले. त्यातले बरेचसे हिटही झाले. जुळी मुलं का जन्माला येतात यासंदर्भात अतिशय बारकाईनं आणि आतापर्यंतचा जगातला पहिलाच अभ्यास नुकताच प्रसिद्ध झाला आहे. ‘ह्युमन रीप्रॉडक्शन जर्नल’मध्ये हा अहवाल नुकताच प्रकाशित झाला आहे. (Sita and Gita - Why did twins grow up in the world?)
संशोधकांनी यासाठी २०१० ते २०१५ या काळातील सुमारे १३५ देशांमधल्या जुळ्या मुलांचा अतिशय बारकाईनं अभ्यास केला. हा डेटा मिळवणं आणि त्याचा अभ्यास करणं हे अतिशय किचकट काम होतं. पण, संशोधकांनी ते जिद्दीनं पार पाडलं. त्यातून काही अनोखे निष्कर्ष समोर आले आहेत.
संशोधकांच्या मते दरवर्षी जगात तब्बल १६ लाख जुळी मुलं जन्म घेत आहेत. गेल्या ५० वर्षांतला हा सर्वाधिक मोठा आकडा आणि सरासरी आहे. उत्तर अमेरिकेत जुळी मुलं जन्माला येण्याचं प्रमाण तब्बल ७१ टक्क्यांनी वाढलं आहे. त्याचबरोबर युरोपियन देश आणि आशिया खंडातही जुळ्या मुलांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. प्रजननासाठी मदत करणाऱ्या ‘आयव्हीएफ’ (इन व्हिट्रो फर्टिलायझेशन), ‘एआरटी’ आणि इतरही रीप्रॉडक्शन तंत्रज्ञानामुळे जुळी मुलं जन्माला येण्याचं प्रमाण वाढत आहे, असा संशोधकांचा निष्कर्ष आहे. १९७० ते १९८०च्या दशकापासून जुळी मुलं जन्माला येण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं. ३० वर्षांपूर्वी दर एक हजार प्रसूतींमागे नऊ जुळी मुलं जन्माला येत होती, त्याचं प्रमाण वाढत वाढत आता दरहजारी बारा जुळ्यांपर्यंत गेलं आहे.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे सहप्रमुख प्रो. ख्रिस्तियन माँडेन यांच्या नेतृत्वात हा अभ्यास झाला. ते म्हणतात, जुळी मुलं जन्माला येण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी अमेरिका, उत्तर अमेरिका, युरोप या सधन आणि संपन्न ठिकाणी नव्या संशोधन प्रणालीचा वापर सुरू झाला आहे. यापूर्वी विसाव्या शतकाच्या मध्यात जुळी मुलं जन्माला येण्याचं प्रमाण जास्त होतं, त्यानंतर आताचं हे प्रमाण सर्वाधिक आहे. माँडेन यांच्या रिसर्च टीमनं तुलनात्मक अभ्यास करताना जगात बऱ्याच ठिकाणी जुळी मुलं जन्माला येण्याचं प्रमाण सातत्यानं वाढत असल्याचा निष्कर्ष काढला. आशिया खंडातही जुळी मुलं जन्माला येण्याचं प्रमाण तीस टक्क्यांनी वाढलं आहे. जेवढ्या देशांचा त्यांनी अभ्यास केला, त्यातील केवळ सात देशांमध्ये जुळी मुलं जन्माला येण्याचं प्रमाण कमी म्हणजे साधारण १० टक्क्यांच्या आसपास होतं.
जुळ्यांमध्येही दोन प्रकार असतात. आयडेंटिकल म्हणजे सेम टू सेम असणारे आणि नॉन आयडेंटिकल, म्हणजे जुळी असूनही एकसारखी न दिसणारी. एकाच अंड्यातून जन्माला येणाऱ्या एकसारख्या दिसणाऱ्या जुळ्या मुलांच्या जन्मदरात जगभरात फारसा फरक झालेला नाही. त्यांचं प्रमाण हजार प्रसूतींमागे चार जुळी मुलं असं सर्वसाधारणपणे स्थिर आहे. वेगवेगळ्या अंड्यांतून जन्माला येणारी, असमान दिसणारी जुळी मुलं जन्माला येण्याचं प्रमाण मात्र त्या तुलनेत खूपच जास्त आहे. आफ्रिकेमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे. आफ्रिकन वंश आणि इतर वंश यांच्यात असणाऱ्या वांशिक भेदामुळे हे घडून आलं आहे.
माँटेन यांचं म्हणणं आहे, एकसारखी दिसणारी जुळी मुलं जन्माला येण्याचं प्रमाण जपानमध्ये सर्वाधिक दिसतं तर असमान दिसणारी जुळी मुलं आफ्रिकेत जास्त प्रमाणात दिसतात. याचं कारण मुख्यत: आनुवंशिकता आणि आधुनिक तंत्रज्ञान हे आहे. याशिवाय इतरही अनेक कारणांमुळे जुळी मुलं जन्माला येतात.
संपूर्ण जगभरातच आता मूल जन्माला घालण्याचं महिलांचं वय वाढत आहे. पूर्वी फार लहान वयातच मुलं जन्माला यायची; पण, आता शिक्षणाचं वाढतं प्रमाण आणि जागरूकता यामुळे जगभरातील महिला तुलनेनं उशिरा मूल जन्माला घालतात. मोठ्या प्रमाणावर होणारा गर्भनिरोधकांचा वापर आणि कमी प्रजनन दर इत्यादी गोष्टींचाही परिणाम जुळी मुलं जन्माला येण्यावर होतो आहे.
१९७० नंतर प्रजननासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात आधार घेतला जाऊ लागला आणि जुळी मुलं जन्माला येण्याचं प्रमाण वाढलं, असं माँटेन आणि त्याच्या रिसर्च टीमचं निरीक्षण आहे. जगात पहिल्यांदाच झालेला हा अभ्यास, लोकसंख्या, आनुवंशिकता, मुलांचं आरोग्य आणि इतरही अनेक गोष्टींवर प्रकाश टाकणारा आहे.
जग सोडण्यातही जुळ्यांचं प्रमाण मोठंया रिसर्च रिपोर्टचे सहलेखक जरोएन स्मिथ यांचं म्हणणं आहे, गरीब आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांतील लोकांसाठी जुळ्या मुलांचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. विशेषत: सब सहारन आफ्रिकेमध्ये जुळी मुलं जन्माला तर येतात; पण, त्यांच्यातला एक जोडीदार जन्माच्या पहिल्या वर्षातच दुसऱ्याला सोडून जाण्याचं प्रमाण फार मोठं आहे. या अभ्यासानुसार जन्मानंतर पहिल्या वर्षातच हे जग सोडून जाणाऱ्या मुलांचं प्रमाण तिथं मोठं आहे. गर्भधारणेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आधी श्रीमंत देशांत झाला. त्यानंतर हळूहळू १९८०च्या दशकात त्याचा प्रसार आशिया खंड, लॅटिन अमेरिका आणि त्यानंतर २०००च्या दशकात दक्षिण आशिया आणि आफ्रिका येथे झाला.