गेल्या दोन महिन्यांत सहा चित्ते गेले, पुढे काय ? 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 08:55 AM2023-05-30T08:55:07+5:302023-05-30T08:56:15+5:30

भारतात नामशेष झालेला चित्ता इथल्या माळरानांवर पुन्हा दौडू लागावा या उद्देशाने चित्ता प्रकल्पाची सुरुवात झाली.

Six cheetahs passed away in the last two months what next kuno national park madhya pradesh | गेल्या दोन महिन्यांत सहा चित्ते गेले, पुढे काय ? 

गेल्या दोन महिन्यांत सहा चित्ते गेले, पुढे काय ? 

googlenewsNext

आरती कुलकर्णी,
मुक्त पत्रकार 

आफ्रिकेतून भारतात, कुनो नॅशनल पार्कमध्ये आणलेल्या चित्त्यांच्या बछड्यांचा मृत्यू ओढवला. ‘ज्वाला’ या चित्तिणीच्या चार बछड्यांपैकी तीन बछडे दगावले. एका बछड्यावर उपचार सुरू आहेत. याआधीही कुनो नॅशनल पार्कमध्ये तीन प्रौढ चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांत आपण सहा चित्त्यांना गमावून बसलो आहोत. भारतात नामशेष झालेला चित्ता इथल्या माळरानांवर पुन्हा दौडू लागावा या उद्देशाने चित्ता प्रकल्पाची सुरुवात झाली. यासाठी नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून एकूण 20 चित्ते मध्य प्रदेशातल्या कुनोमध्ये आणण्यात आले. 

भारतातले चित्ते आशियाई होते. आता इराणमध्ये फक्त 12 आशियाई चित्ते उरले आहेत. त्यामुळे भारताला आफ्रिकन चित्ते आणावे लागले. भारतीय माळरानांमध्ये आफ्रिकन चित्ता ही परदेशी प्रजाती आणणं चुकीचं आहे. हे चित्ते इथे तग धरणार नाहीत, असं वन्यजीव तज्ज्ञ केंद्र सरकारला सांगत होते. मात्र तरीही हे आव्हान स्वीकारून ‘प्रोजेक्ट चित्ता’ प्रत्यक्षात आला. 

कुनो नॅशनल पार्क हे गुजरातच्या गीरमधल्या सिंहांचं स्थलांतर करण्यासाठी सज्ज करण्यात आलं होतं. पण गुजरातने हे सिंह मध्य प्रदेशात हलवायला विरोध केला. त्यामुळे तो प्रकल्प मागे पडला आणि सिंहांऐवजी चित्ते आणण्यात आले. भारतात आफ्रिकन चित्ते आणण्याच्या प्रकल्पाला सुप्रीम कोर्टाने आधी स्थगिती दिली होती. पण नंतर कोर्टाचा ग्रीन सिग्नल मिळाल्यामुळे हा प्रकल्प सुरू झाला. आता चित्त्यांचे धक्कादायक मृत्यू झाल्यानंतर या प्रकल्पाचा फेरआढावा घ्यावा, असं आवाहन वन्यजीव तज्ज्ञ वाल्मिक थापर यांनी केलं आहे. मध्य भारतातलं वाढतं तापमान चित्त्यांसाठी जीवघेणं ठरेल, अशी भीती त्यांना वाटते. या चित्त्यांसाठी कुनोमधला अधिवास पुरेसा नाही. त्यांना लागणारं क्षेत्र आणि शिकार या बाबी पाहिल्या तर काही चित्त्यांना दुसरीकडे हलवावंच लागणार आहे. 

राजस्थानमधलं मुकुंद्रा अभयारण्य यासाठी चांगला पर्याय आहे. तिथे कुंपण घातलेली क्षेत्रं आहेत. त्यामुळे चित्त्यांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण मिळेल. नौरादेही आणि गांधीसागर ही मध्य प्रदेशातली अभयारण्यं चित्त्यांसाठी चांगला अधिवास बनू शकतात. पण चित्त्यांचं कुठेही स्थलांतर केलं तरी वाढतं तापमान आणि पुरेशी शिकार नसणं ही आव्हानं आहेतच, असं वाल्मिक थापर म्हणतात.

आफ्रिकेमधले चित्ते इंपाला, स्प्रिंगबक, गॅझल्स अशा प्राण्यांची शिकार करतात. भारतातल्या अभयारण्यांमध्ये काळवीटं, चिंकारा आणि चितळं आहेत. हे आफ्रिकन चित्त्यांचं भक्ष्य नाही. त्यामुळे   चित्त्यांसाठी पुरेशी शिकार मिळणार नाही, असंही त्यांना वाटतं.  
दक्षिण आफ्रिकेचे वन्यजीव तज्ज्ञ व्हिन्सेंट व्हॅन डेर मेर्व यांच्या मते, चित्त्यांच्या बछड्याचे मृत्यू ही दुर्दैवी बाब आहे पण चित्त्यांमध्ये पहिल्यांदा जन्माला घातलेले बछडे मरण्याच्या घटना घडतच असतात.

हे चित्ते मोकळ्या जंगलात त्यांच्या हद्दी तयार करतील तेव्हाही त्यांचा कुनो नॅशनल पार्कमधले बिबटे आणि वाघांशी सामना होईल. अशा लढतींमध्ये प्रौढ चित्त्यांचा मृत्यू ओढवू शकतो. त्यामुळे या चित्त्यांना मोकळ्या पण कुंपण घातलेल्या जागेतच ठेवायला हवं, असं त्यांचंही मत आहे.  असं असलं तरी चित्त्यांना कुंपण घातलेल्या जागेत ठेवल्याने त्यांच्यावर ताण येऊ शकतो, अशी भीती एका तज्ज्ञांनी व्यक्त केली. अशा बंदिस्त जागेतच ‘साशा’चा मूत्रपिंडाच्या आजाराने मृत्यू झाला. ‘उदय’चा मृत्यू हृदयविकाराने झाला आणि ‘दक्षा’ ही मादी नर चित्त्यांशी मिलनाच्या वेळी झालेल्या जखमांमुळे मृत्युमुखी पडली. 

सध्या कुनो नॅशनल पार्कमध्ये सात चित्ते मोकळ्या जंगलात सोडले आहेत. त्यांना रेडिओ काॅलर लावल्याने त्यांचा माग काढता येतो. त्यामुळेच कुनोमधून झाशीच्या दिशेने गेलेल्या एका चित्त्याला बेशुद्ध करून पकडून आणता आलं. तज्ज्ञांच्या मते, भारताने वन्यजीव संवर्धनाचे अनेक प्रकल्प यशस्वी केले आहेत पण सध्या आपण वन्यजीव विरुद्ध माणूस अशा संघर्षावर उपाय काढण्यासाठी झगडतो आहोत. वन्यजीवांचे गायीगुरांवरचे हल्लेही वाढले आहेत. अशा परिस्थितीत आफ्रिकन चित्त्यांना भारतातल्या माळरानांवर सोडून आपण आणखी एका संघर्षाला आमंत्रण देतो आहोत. 

गीरमधले आशियाई सिंह भारतातल्या फक्त एकाच अधिवासात एकवटले आहेत. याचा तिथल्या वन्यजीव व्यवस्थापनावर ताण पडतो आहे. शिवाय या सिंहांवर साथीचा रोग ओढवला तर एकाच वेळी सिंहांची संख्या कमी होण्याचा धोका आहे. म्हणूनच आफ्रिकन चित्त्यांच्या स्थलांतराऐवजी भारतातल्या सिंहांच्या स्थलांतर प्रकल्पाला प्राधान्य द्यायला हवं होतं, असं डाॅ. रवी चेल्लम यांच्यासारख्या वन्यजीव तज्ज्ञांना वाटतं.  

चित्त्यांच्या प्रकल्पासोबतच राजस्थानमध्ये माळढोकांच्या कृत्रिम प्रजननाचा प्रकल्प सुरू झाला आहे. या दोन्ही प्रकल्पांबद्दल  वेगवेगळी मतं असली तरी यामुळे भारतातल्या काहिशा दुर्लिक्षत अशा माळरानांच्या व्यवस्थापनाकडे आपलं लक्ष गेलं ही बाब नक्कीच सकारात्मक आहे. त्यामुळे हे प्रकल्पच अपयशी ठरले असा निष्कर्ष काढणं चुकीचं ठरेल. वन्यजीव संवर्धनाच्या प्रकल्पांसाठी खूप काळ द्यावा लागतो, हे तज्ज्ञांचं मतही आपण लक्षात घ्यायला हवं. चित्ता प्रकल्पाच्या या कसोटीच्या काळात आपण सध्या तरी एवढंच करू शकतो.

Web Title: Six cheetahs passed away in the last two months what next kuno national park madhya pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.