अमेरिका व इंग्लंड या दोन्ही देशांचे नागरिक असलेले प्राध्यापक अँगस डिटन यांना जाहीर झालेले अर्थशास्त्राचे नोबेल म्हणजे एका शंकेखोर आशावाद्याचा उचित सन्मान म्हणावा लागेल. उपभोग, गरिबी आणि कल्याण या विषयातील संशोधनाबद्दल त्यांचा गौरव केला गेला आहे. ‘उपभोगाच्या वैयक्तिक आवडीनिवडी समजून व उमजून घेतल्यानंतरच गरिबी निर्मूलनासाठी आवश्यक आर्थिक धोरण तयार केले जाऊ शकते’, असे मत नोबेल पुरस्कार देणाऱ्या रॉयल स्वीडिश अॅकॅडमी आॅफ सायन्सेसने व्यक्त केले आहे. दुसरे महायुद्ध संपुष्टात येण्याच्या बेतात जन्मलेले प्रा. डिटन काटेकोरपणासाठी प्रसिद्ध आहेत. जग अत्यंत गुंतागुंतीचे ठिकाण आहे व त्यामुळे सोप्या उपपत्ती मांडणे अत्यंत धोकादायक आहे, असे ते मानतात. त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दी दरम्यान शंकेखोर अशीच त्यांची प्रतिमा निर्माण झाली; पण शंकेखोर असूनही ते निराशावादी नाहीत, तर आशावादी आहेत. एखाद्या वस्तूची मागणी किंमत आणि उत्पन्नासोबत कशी बदलत जाते, याचा आढावा घेण्यासाठी, प्रा. डिटन यांनी जॉन म्युबार यांच्या साथीने विकसित केलेली प्रणाली पुढे इतर अर्थतज्ज्ञांनीही स्वीकारली. तब्बल ३५ वर्षांच्या कारकिर्दीतील बहुतांश काळ त्यांनी गरीब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशांच्या गरिबीमागची कारणे हुडकण्यात घालविला. विकसनशील देशांमध्ये घरोघरी जाऊन केलेल्या सर्वेक्षणांचा परिणामकारक वापर कसा केला जाऊ शकतो, यासंदर्भात प्रा. डिटन यांनी केलेले संशोधन अनमोल आहे. प्रा. डिटन यांच्या संशोधनापूर्वी बहुतांश अर्थतज्ज्ञ अशा सर्वेक्षणांना अविश्वसनीय मानत असत. प्रा. डिटन यांनी १९८० व १९९० च्या दशकात, गरिबीचे प्रमाण व कल्याणकारी योजनांचे यशापयश मोजण्यासाठी, तसेच धोरणांच्या आढाव्यासाठी, सकल अंतर्गत उत्पादनावर विसंबण्याऐवजी, घरोघरी जाऊन केलेल्या सर्वेक्षणांचा वापर करण्यात नैपुण्य प्राप्त केले. प्रचंड अभ्यास करून विकसित केलेल्या आर्थिक उपपत्ती व अंकशास्त्रीय प्रणालीसोबत सर्वेक्षणांची सुयोग्य सांगड घालून, गरीब कुटुंबांचे जीवनमान व कुपोषणामागची कारणे आणि लैंगिक भेदभावाचे प्रमाण कसे निश्चित केले जाऊ शकते, हे प्रा. डिटन यांनी दाखवून दिले. गत काही वर्षांत अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक प्रामुख्याने मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये प्रगाढ विश्वास असलेल्या अर्थतज्ज्ञांनाच दिले गेले. अलीकडील काळात भांडवलशाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या अर्थतज्ज्ञांनाही तो सन्मान मिळाला. प्रा. डिटन यांचे वैशिष्ट्य असे की मुक्त आणि नियंत्रित या दोन्ही अर्थव्यवस्थांचे समर्थक प्रा. डिटन यांच्या संशोधनाचा दाखला देऊ शकतात. अर्थशास्त्र या विषयाप्रतीच्या त्यांच्या बांधिलकीबाबत मात्र दोन्ही गटातील कुणीही शंका उपस्थित करू शकत नाही!
शंकेखोर आशावादी
By admin | Published: October 14, 2015 10:23 PM