जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशातील युवकांना कौशल्य विकास करण्यासाठी ‘स्कील’, ‘रि-स्कील’ आणि ‘अप-स्कील’ हे तीन मंत्र दिले आहेत. नवनवीन कौशल्ये आत्मसात करण्यासोबतच स्वत:तील कौशल्यांचा सातत्याने विकास करत राहणे, हा या त्रिसूत्रीचा अर्थ आहे. आपले भविष्य अजमाविण्यास निघालेल्या प्रत्येक तरुण-तरुणीने हे सूत्र आत्मसात करणे, ही काळाची गरज आहे. कोरोना महामारीच्या या बिकट काळात तर आहेच; पण एरवीही रोजगाराच्या जीवघेण्या स्पर्धेत स्वत:ला टिकवून ठेवण्यासाठी तूर्तास तरी याला दुसरा पर्याय नाही असे वाटते.
आज परिस्थिती वेगाने बदलतेय. कार्यसंस्कृतीसोबतच कामाच्या पद्धतीतही आमूलाग्र बदल आपल्याला बघायला मिळतोय. अशात स्वत:ला प्रासंगिक ठेवण्याचे मोठे आव्हान प्रत्येकापुढे आहेच; पण ते न झेपणारेही नाही. स्वत:ला कौशल्यसज्ज ठेवून स्वत:च्या क्षमतेचा, बुद्धीचा योग्य वापर करून ते सहज साध्य करता येऊ शकते. कौशल्य ही एक अशी शक्ती आहे, जी आपल्याकडून कुणी हिरावून घेऊ शकत नाही. तिचा पुरेपूर वापर करता आला, तर यशोशिखर दूर नाही हा पंतप्रधानांनी व्यक्त केलेला विश्वासही काही असाध्य नाही.परंतु आपल्या देशातील बहुतांश तरुण-तरुणींच्या बाबतीत नेमकी हीच समस्या आहे. कुणी मान्य करो वा ना करो, कौशल्यात आपण मागे पडतो.
दरवर्षी देशात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या तरुणांची मोठी फौज तयार होते; पण त्यांच्याकडे रोजगारक्षम कौशल्याचा अभाव असतो. जगातील एका नामवंत कंपनीने मध्यंतरी एक व्यापक सर्वेक्षण केले होते. त्यात रोजगार देणाऱ्या कंपन्यांना गुणवत्तेचा मोठा तुटवडा जाणवत असल्याचे वास्तव समोर आले. जगभरातील प्रमुख ४२ हजार कंपन्यांना यात सहभागी करून घेण्यात आले होते. त्यापैकी ४७ टक्के कंपन्यांना रिक्त जागा भरणे कठीण झाले असल्याचे त्यात नमूद होते. भारतातील कंपन्यांना ही अडचण जाणवते. याचाच अर्थ असा की, एकीकडे रोजगाराच्या संधी आणि तरुणांना त्यांच्या क्षमतेनुसार नोकरी मिळत नसल्याची तक्रार होत असताना कंपन्यांकडून मात्र गरजेनुसार गुणवंत उमेदवार मिळत नसल्याचा दावा केला जात आहे.
आजही जगभरातील अनेक क्षेत्रांमध्ये लाखो कौशल्यप्राप्त मनुष्यबळाची गरज आहे. पंतप्रधानांनी विशेषत: आरोग्य क्षेत्राचा उल्लेख त्यांच्या भाषणात केला. या क्षेत्रात रोजगाराच्या संधी अलीकडच्या काळात वाढल्या आहेत. दुसरे असे की कुठलेही कौशल्य हे केवळ नोकरीसाठीच कामात येते असेही नाही. स्वयंरोजगारातही ते उपयुक्त ठरते; पण त्या दिशेने सातत्याने प्रयत्न करायला हवेत. अर्थात भारतासारख्या देशात रोजगार वाढ हा नेहमीच एक गंभीर प्रश्न राहिला आहे.
नीती आयोगानेही याबाबत वेळोवेळी चिंता व्यक्त करताना केवळ बेरोजगारीच नव्हे, तर रोजगार उपलब्धतेचा तुटवडा ही बिकट समस्या असल्याचे मान्य केले आहे. कोरोना महामारीमुळे लॉकडाऊनच्या काळात तर परिस्थिती आणखीनच बिघडली आहे. या काळात बेरोजगारीचा दर २७ टक्क्यांवर पोहोचला आहे. तत्पूर्वी हे प्रमाण ७ टक्क्यांवर होते. केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षांत रोजगारवाढीसाठी मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्कील इंडिया, स्टार्ट अप यांसारख्या योजना आणल्या खºया; पण त्याचा किती लोकांनी लाभ घेतला किंवा मिळाला कुणास ठावूक.
कौशल्य भारत मोहीम राबविण्यात येत आहे; पण मुळात किती लोकांना याची कल्पना आहे याबद्दल शंका आहे. या मुद्द्यावर शासनविरोधात कायम ओरड सुरू असते. त्यानिमित्ताने आकड्यांचा खेळही मांडला जातो. तरुणांच्या या देशात त्यांच्या विकासाकडेच दुर्लक्ष केले जाते. त्यांच्यातील कौशल्य विकसित करून त्यांना पाहिजे तशा संधी उपलब्ध करून दिल्या जात नाहीत, असा आरोप केला जातो. तो नाकारताही येत नाही. कुठल्याही देशाच्या विकासाच्या दृष्टीने तेथील तरुणांना उच्च दर्जाचे शिक्षण, आरोग्य आणि अधिकारांच्या संरक्षणासोबतच रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे अत्याधिक महत्त्वाचे आहे; परंतु आपल्यातील शक्ती, क्षमता ओळखण्यासाठी, त्यांचा योग्य वापर करण्यासाठी प्रत्येक वेळी सरकार अथवा इतर कुणावर विसंबून राहणेही कितपत योग्य आहे.
खूपदा असे बघण्यात येते की, तरुणांमध्ये कुठे काय सुरू आहे यासंदर्भात जागरूकताच नसते. ते केवळ हातात मोठी डिग्री घेऊन नोकरीच्या संधीची प्रतीक्षा करीत असतात; पण हा दृष्टिकोन आता बदलावा लागेल. केवळ रोजगार नाही अशी ओरड करून चालणार नाही. स्वत:ला ओळखावे लागेल. या कामी शिक्षण संस्थांनीही पुढाकार घेणे गरजेचे आहे. शिक्षण संस्था म्हणजे काही निव्वळ बेरोजगारांची निर्मिती करणारे कारखाने नव्हेत. केवळ पुस्तकीज्ञान आजच्या जगात कामाचे नाही. एखाद्या पदव्युत्तर तरुणाला साधे
व्यक्तिगत माहितीचे विवरण जर योग्य पद्धतीने लिहिता येत नसेल, तर त्या शिक्षणाचा फायदा काय?
तरुणांमधील कौशल्यक्षमता विकसित करून त्यांना पाहिजे तशा योग्य संधी उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी आहेच; पण रोजगारासाठी आपल्यालाही स्वत:ला काळानुरूप गरजेनुसार कौशल्यसज्ज व्हावे लागेल, याची जाणीव रोजगाराच्या शोधात असणाऱ्यांना ठेवावी लागणार आहे.