किरण अग्रवाल
विज्ञानाने प्रगती साधली की अधोगती, हा तसा वादविषय; पण या प्रगतीची काही साधने ही समस्यांची कारणे ठरून गेल्याचे नाकारता येऊ नये. या समस्या म्हणजे काळाने दिलेली देणगीच म्हणता याव्यात. मोबाइलचे वेड, ही अशीच सर्वांना भेडसावणारी समस्या. विशेषत: तरुण पिढी मोठ्या प्रमाणात या वेडाने ग्रस्त असून, त्याचा इलाज कसा करावा किंवा यासंबंधीच्या नादातून मुलांना कसे परावृत्त करावे, हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे. उपयोगी असूनही समस्या म्हणून मोबाइलकडे पाहिले जाऊ लागले आहे ते त्यामुळेच.
‘अति तिथे माती’ अशी एक म्हण आहे. कोणत्याही गोष्टीचा अगर कसल्याही बाबतीत अतिरेक केला गेला तर त्यातून समस्येला निमंत्रण मिळून गेल्याखेरीज राहत नाही. मोबाइलचे तसेच झाले आहे. संपर्क व संवादाचे सुलभ साधन म्हणून आजच्या काळात मोबाइल ही गरजेची वस्तू बनली आहे हे खरे; परंतु या मोबाइलच्या नादात तरुण मुले इतकी वा अशी काही स्वत:लाच हरवून बसली आहे की, त्यांना इतर कशाचे भानच राहताना दिसत नाही. मोबाइलच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप, फेसबुक, टिष्ट्वटर, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडिया हाताळायला मिळत असल्याने ही पिढी ‘सोशल’ झाल्याचा युक्तिवाद केला जातो, पण मोबाइलमध्येच डोके व मनही गुंतवून बसलेली ही पिढी खरेच सोशल झाली आहे की, त्यांच्यातले एकाकी एकारलेपण वाढीस लागते आहे याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. मोबाइलमुळे जणू जग हातात आले आहे त्यांच्या, त्यामुळे ते त्या जगातच स्वत:ला गुंतवून घेतात. परिणामी नातेसंबंधातील नैसर्गिक संवाद अगर कुटुंबातील सर्वव्यापी सहभागीता घटत चालली आहे. अलीकडेच ‘मदर्स डे’ आपण साजरा केला, या घराघरांतील मदर्सची मुलांमुळे होणाऱ्या दमछाकची चिकित्सा करायची झाल्यास किमान काही वाक्ये प्रत्येक घरात ‘कॉमन’ आढळून येतील ती म्हणजे, ‘मोबाइल नंतर बघ, अगोदर जेवून घे’ किंवा ‘मोबाइलमधून डोकं काढ आणि झोप आता...!’ कारण प्रत्येकच घरातील आयांना आपल्या मुलांच्या दिनक्रमात मोबाइलचा अडथळा निदर्शनास पडू लागला आहे.
महत्त्वाचे म्हणजे, मोबाइलवर निरनिराळे ‘अॅप’ आल्याने विविध बिलांचा भरणा सोयीचा झाला हे जितके आनंददायी, तितकेच मोबाइलवरून ऑर्डर देऊन केली जाणारी खरेदी वेदनादायी ठरत असल्याची अनेकांची भावना आहे. यात असे करण्यातून कधीकधी होणारी फसवणूक वगैरे भाग वेगळा, परंतु सहकुटुंब चिल्ल्यापिल्ल्यांचे बोट धरून त्यांना सांभाळत बाजारातील गल्ल्या धुंडाळण्याची तसेच सोबतच्या सर्वांच्याच आवडी-निवडी जोखत जिन्नस खरेदीतली मजाच हरविल्याचे नाकारता येऊ नये. कुठल्याही खरेदीतला सामूहिकपणाचा व पर्यायाने सर्वमान्यतेचा धागा यामुळे तुटू पाहतो आहे, तर मोबाइलवर कपडे अगर वस्तू मागवून व ती न पटल्यास परतवून देण्याचा कोरडेपणा आकारास आला आहे. बदलत्या काळानुसार व व्यक्तींच्या व्यस्ततेस अनुलक्षून अशा ऑनलाइन शॉपिंगचे समर्थन करणारे करतीलही व ते गैरही ठरविता येऊ नये; पण घरबसल्या उपलब्ध झालेल्या या सुविधेमुळे किमान खरेदीच्या बहाण्याने अनेकांचे कुटुंब कबिल्यासह बाहेर पडणे कमी झाले हेदेखील दुर्लक्षिता येऊ नये. अर्थात, सदरची बाब जे अनुभवत आहेत, तेच यासंबंधातील बोच जाणू शकतील.
पण, याही संदर्भातला खरा मुद्दा वेगळाच असून, तोच मोबाइल वेडाची किंवा त्याच्या अतिवापराची समस्या अधोरेखित करणारा आहे. अमेरिकेतील प्रख्यात अशा फेअरफिल्ड विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या एका संशोधनानुसार मोबाइलचा अतिवापर करणाºया व्यक्ती अनावश्यक खरेदी करीत असल्याची बाब समोर आली आहे. म्हणजे, मोबाइलचे वेड खरेदीतला खर्च वाढविण्यासही कारणीभूत ठरत आहे. तसेही, आपल्याकडे सवलतींना भुलून खरेदी करणारा वर्ग मोठा आहे. त्यात हे नवे संशोधन पुढे आले आहे. याकरिता मोबाइलचा कमी आणि जास्त वापर करणा-या अशा दोन्ही गटांतील लोकांचा व मोबाइल वापराचा त्यांच्यावर होणाºया परिणामांचा अभ्यास करण्यात आला. यात मोबाइलचा अतिवापर करणारे अनावश्यक खरेदी करतात असे तर आढळून आलेच, शिवाय मोबाइलवर गाणी ऐकत ऐकत शॉपिंग करणारे लोक आवश्यकता नसलेल्या वस्तूंचीही खरेदी करतात, असेही आढळून आले म्हणे. तात्पर्य असे की, मोबाइल जेवढा उपयोगी; अथवा सुविधेचा, तेवढाच तो समस्यांना निमंत्रण देणाराही ठरू पाहतोय. तेव्हा, त्याचा अति आणि अनावश्यकरीत्या केला जाणारा वापर टाळलेलाच बरा!