धुम्रपान केल्याने हमखास कर्करोग होतो, या आजवर साऱ्यांनी प्रमाण मानलेल्या विधानावर जेव्हां थेट सर्वोच्च न्यायालयाने अगदी अलीकडेच शंका उपस्थित केली आणि त्याच्याही बरेच अगोदर संसदेच्या एका समितीने या संदर्भातील परंपरागत धारणेला छेद देणारी शिफारस केली होती तेव्हांच तंबाकू सेवनाबाबतच्या विद्यमान धोरणात बदल केले जातील असे पुरेसे संकेत मिळूनच गेले होते. तंबाकू सेवनामुळे मौखिक आरोग्य धोक्यात येते आणि त्याशिवाय फुफ्फुसाचा कर्करोग होतो असे आरोग्यशास्त्राचे आजवरचे निरीक्षण असले तरी सेवन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीलाच तो होतो किंवा जिला तो होतो, ती प्रत्येक व्यक्ती तंबाकूसेवन करणारीच असते असे निर्विवादपणे आजवर सिद्ध झालेले नाही. तरीही उपचारापेक्षा प्रतिबंध केव्हांही श्रेयस्कर या भूमिकेतून तंबाकू सेवनास आळा बसावा म्हणून जागतिक आरोग्य संघटनेच्या (हू) निर्देशानुसार जगातील बहुसंख्य लोक जनजागृतीच्या माध्यमातून तंबाकू सेवनाच्या विरोधात प्रचार करीत असतात. या प्रचाराचाच एक भाग म्हणून तंबाकू आणि सिगारेटच्या वेष्टनांची ८५टक्के जागा व्यापून टाकेल अशा ठळकपणे वैधानिक इशारा छापण्याचा निर्णय ‘हू’ने जारी केला होता. भारत त्याची काटेकोर अंमलबजावणी करीत नाही म्हणून नाराजीदेखील व्यक्त केली होती. त्यावर केन्द्रीय आरोग्य खात्याच्या अंतर्गत एक संसदीय समिती गठीत करण्यात आली. तंबाकू हे मूलत: एक कृषी उत्पादन आहे व त्यावर जशी अनेकांची उपजिविका अवलंबून आहे त्याचप्रमाणे तंबाकूपासून तयार होणाऱ्या उत्पादनांच्या निर्मिती उद्योगावरदेखील अनेकांची रोजीरोटी अवलंबून आहे. लोकानी तंबाकू सेवन किंवा धुम्रपान यापासून परावृत्त होणे किंवा त्यांना परावृत्त केले जाणे या साऱ्यांच्या मुळावर येऊ शकते. परंतु त्याहून अधिक महत्वाचे म्हणजे तंबाकू आणि तिच्यापासून तयार केले जाणारे अंमली पदार्थ हा सरकारच्या उत्पन्नाचा एक मोठा भाग असतो. त्यामुळे कोणतेही सरकार हे उत्पन्न सोडू इच्छित नाही. त्यातच राजस्थान उच्च न्यायालयाचा एक निवाडा जाहीर झाल्याने आता येत्या एक तारखेपासून वेष्टनांवरील ८५ नव्हे तर केवळ ५० टक्के जागा व्यापणारा वैधानिक इशारा छापला जाईल असे देशाच्या आरोग्य मंत्र्यांनीच जाहीर केले आहे. जे अगोदरपासूनच या व्यसनाच्या विळख्यात अडकले आहेत त्यांच्यापेक्षा तरुण पिढीने या घातक व्यसनाकडे आकृष्ट होऊ नये यासाठी वेष्टनांवर ठळक वैधानिक इशारा छापण्याचा आग्रह धरला जातो. सर्व भाषांमधील चित्रपटांमध्ये धुम्रपानाची दृष्ये येतात तेव्हांही हा इशारा दाखविला जातो. आता कदाचित त्याबाबतही काही बदल होऊ शकतात.
धुम्रपान हानीत घट?
By admin | Published: March 17, 2016 3:57 AM