सुधीर लंके निवासी संपादक, लोकमत, अहमदनगर
अयोध्येत पुढील महिन्यात श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल. यानिमित्त देशात गावोगाव व पाच लाख मंदिरांत रामजन्मभूमीची माती व अक्षता स्थापित केल्या जाणार आहेत. राम मंदिराकडे देशाची अस्मिता म्हणून पाहिले जातेय; पण गावोगाव जी मंदिरे आहेत त्यांची अवस्था काय आहे? महाराष्ट्राची कुलस्वामिनी व शिवरायांचे दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळजापूरच्या तुळजाभवानीचा गाभारा सुरक्षित नाही हे नुकतेच समोर आले, धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी गत जून-जुलै महिन्यात समितीमार्फत देवस्थानच्या तिजोरीत असणाऱ्या दागिन्यांची मोजदाद केली. त्या तिजोरीत हिरे आहेत; पण त्याची नोंद देवस्थानच्या दप्तरात नाही, खजिन्यातील काही कपाटांना कुलपे नाहीत. जुन्या नोंदी व नवीन मोजणीत तफावत आढळली. तुळजाभवानीचा मुकुटच गायब झाल्याचा आरोप होता; पण फेरतपासणीत तो सापडला म्हणे!
तुळजाभवानी मंदिरात १९९१ नंतर आठ कोटींहून अधिक रकमेचा घोटाळा झाल्याचा हिंदू जनजागरण समितीचा आरोप आहे. त्यामुळे या समितीने मंदिराकडे असलेले सोने वितळविण्यास विरोध केला आहे. न्यायालयानेही सोने वितळविण्यास स्थगिती दिली आहे. अगोदर भ्रष्टाचार किती झाला हे निश्चित करून दोषींवर कारवाई करा. नंतरच दागिन्यांबाबत निर्णय घ्या, असे समितीचे म्हणणे आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कोल्हापूरची अंबाबाई व जोतिबासह तीन हजार मंदिरांचे व्यवस्थापन पाहते. या समितीवरही अनियमिततेचे आरोप झाले, आता बाळूमामांच्या मेंढरांचा घोटाळा समोर आला. बाळूमामांचे कोल्हापूर जिल्ह्यात भूदरगड तालुक्यात आदमापूर येथे मंदिर आहे. या देवस्थानकडे ३० हजार मेंढ्या, बकऱ्या आहेत त्यांचे १८ कळप आहेत, ज्याला बग्गी म्हणतात, हे बग्गे बाळूमामाची मेंढरं म्हणून गावोगावी फिरतात. लोक त्यांना भरभरून दान देतात; पण देवस्थान या देणगीचा हिशेब ठेवत नसल्याचे धर्मादाय आयुक्तालयाच्या चौकशीत आढळले, येथे खासगी विश्वस्त मंडळ आहे; पण या देवस्थानवरही आता प्रशासक आला, गंमत पाहा, या प्रशासकाच्या पाच महिन्यांच्या कालावधीत (एप्रिल ते ऑगस्ट २०२३) देवस्थानला १३ कोटींचे उत्पन्न मिळाले. २००३ साली हा ट्रस्ट स्थापन झाला. पाच महिन्यांत तेरा कोटी, तर वीस वर्षांत किती पैसे आले असतील याचा अंदाज बांधा.
अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव या तालुक्याच्या ठिकाणी श्रीरामाचे मंदिर आहे. या मंदिराची देखभाल करण्यासाठी देवस्थानला ३१ एकरचा भूखंड इनाम मिळाला, विश्वस्तांनी हा भूखंड चक्क परमिट रूमसाठी दिला. त्या पैशावर श्रीरामाची दिवाबत्ती सुरू आहे. २०१८ साली विधिमंडळात हा प्रश्न गाजला.
परमिट रूम बंद केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला सांगितले; पण आजही हे राममंदिर मद्यपींच्या विळख्यात आहे. याच जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी मंदिराचा जीर्णोद्धार करताना मूर्तीखाली तब्बल दोन किलो सोने पुरल्याचेही उदाहरण घडले. हे पुरलेले सोने व त्यापोटी पंडिताला दिलेली देणगी हे सारेच संशयास्पद, हेही प्रकरण विधिमंडळात गाजले. या प्रकरणात तर जिल्हा न्यायाधीश आरोपी आहेत. कारण ते या देवस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. त्यांच्या उपस्थितीतच सोने पुरण्याचा ठराव झाला.
हिंदूच नव्हे, सर्वच धर्मातील प्रार्थना स्थळांभोवती संपत्तीचे वाद दिसतात. बीड जिल्ह्यात मुस्लीम दग्र्याच्या हजारो एकर जमिनी वैयक्तिकरीत्या हडप करण्याचा प्रयत्न झाला, याप्रकरणीही गुन्हे दाखल आहेत. वक्फ बोर्डाच्या जमिनींचा गैरवापर झाल्याची अनेक उदाहरणे आहेत, ख्रिश्चन मिशनरीज व चर्चच्या अनेक जमिनी बळकावल्या व बेकायदेशीरपणे विकल्या गेल्या आहेत, चर्चमध्ये जो पैसा जमा होतो त्यावरूनही वाद आहेत. कुठल्याही धर्माची प्रार्थनास्थळे ही सरकारच्या ताब्यात असो वा खासगी विश्वस्तांच्या, तेथे अनेक ठिकाणी भाविकांच्या पैशांची लूट सुरू आहे. अयोध्येत श्रीरामांची प्रतिष्ठापना होईल; पण माणसांमध्ये नैतिकता कधी स्थापित होईल हे महत्त्वाचे.