देशाला हजारो कोटींनी लुबाडून विजय मल्ल्या इंग्लंडला पळाला. तो ज्यातून पळाला ते विमान जेट एअरवेजचे म्हणजे सरकारच्या विशेष मर्जीत असलेल्या नरेश गोयलचे होते. मल्ल्या खासदार या नात्याने मिळणाºया सन्मानासह पहिल्या वर्गाच्या तिकिटानिशी सोबत ३६ बॅगा घेऊन गेला. ही विमान कंपनी त्याविषयीची पूर्वसूचना सरकारला वेळेपर्यंत देऊ शकली असती. या कंपनीचेही हात व पाय तसे सरकारी साखळ्यात अडकले आहे आणि मल्ल्या हा स्वत:ही एका विमान कंपनीचा मालक राहिला आहे. साºयांच्या डोळ्यादेखत, सरकारला वाकुल्या दाखवत आणि हातात खासदारकीचा परवाना नाचवत मल्ल्या पळाला. तो अजून आला नाही आणि आता येणार नाही. तसेच ललित मोदीही पळाला. पळताना त्यानेही देशाला हजारो कोटींनी बुडविले होते. त्याच्यामागेही चौकशांचा ससेमिरा लागला होता. पत्नीच्या प्रकृतीचे कारण सांगून त्याने सरकारचा आशीर्वाद आपल्या पलायनाला मिळविण्याचा प्रयत्न केला. आताचा नीरव हा दुसरा मोदी पुन्हा एकवार २० हजार कोटींनी बँकांना बुडवून पळाला. पळण्यापूर्वी तो डावोस येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोबत असलेला २३ जानेवारीच्या वृत्तपत्रात झळकला. जानेवारीच्या मध्यालाच त्याचा घोटाळा लक्षात आलेल्या मुंबईतील पंजाब नॅशनल बँकेच्या ब्रॅडी शाखेने त्याच्याविषयीची माहिती आपल्या मुख्यालयाला दिली होती. २५ जानेवारीला बँकेच्या मुख्यालयाने त्याची दखल घेऊन सर्व संबंधित यंत्रणांना सावध केले. २९ जानेवारीला बँकेने सीबीआयकडे आपली तक्रार नोंदविली. त्याचवेळी तिने रिझर्व्ह बँकेलाही त्याची माहिती दिली. संशयित इसमांना निलंबित करायलाही बँकेने तेव्हाच सुरुवात केली. ३१ जानेवारीला याविषयीचा गुन्हा पोलिसात नोंदविला गेला. ५ फेब्रुवारीला बँकेने हा घोटाळा जाहीर केला. मात्र तो करताना यात फक्त २८० कोटी रुपये अडकले असल्याचे बँकेने सांगितले. १३ फेब्रुवारीपर्यंत बँकेने या प्रकरणाचा स्वत:च जमेल तेवढा शोध घेतला आणि १४ फेब्रुवारीला हा घोटाळा ११ हजार ४०० कोटींचा असल्याचे सेबी व आर्थिक अन्वेषण विभागाला कळविले. बँकेतील संशयित अधिकाºयांनी नीरव मोदीला दिलेली दीर्घ मुदतीची कर्जे अल्पमुदतीची म्हणून दाखविली होती. हा सारा काळ नीरव मोदी सरकारी कार्यक्रमात हजेरी लावताना दिसला. तो बँकेतही जात होता. आता तो पळून गेल्यानंतर ‘आम्ही त्याला परत आणू’ असे सरकारकडून छाती पिटून जनतेला सांगितले जात आहे. असे छाती पिटण्याचे कार्यक्रम सरकारने विजय मल्ल्याच्या वेळी केले. ललित मोदीच्या पलायनानंतर केले आणि आता त्या कार्यक्रमाची त्याला सवयच जडली असावी असे वाटायला लावणारे त्याचे वागणे आहे. सगळ्या आरोपांवर त्याचे आणखीही एक ठरलेले उत्तर आहे. ‘या साºयाला पूर्वीचे सरकार जबाबदार आहे’ हे. नीरव मोदीचा गैरव्यवहार २०११ मध्ये सुरू झाला हे खरे आहे. मात्र त्याने महाघोटाळ्याचे स्वरूप नरेंद्र मोदींच्या कारकिर्दीत २०१७-१८ मध्ये घेतले ते आता सीबीआयने पोलिसात नोंदविलेल्या आपल्या तक्रारीत म्हटले आहे. याचवेळी रिझर्व्ह बँकेने देशात आर्थिक घोटाळे वाढत असल्याचे आपल्या ताज्या अहवालात सांगून टाकले आहे. ‘न खाऊंगा, न खाने दुंगा’ अशी गर्जना करीत सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदींच्या सरकारात मोदी नावाच्या दोन महादरोडेखोरांनी देशाची तिजोरी लुटली आहे. त्यावर मोदी गप्प आहेत आणि ते गप्प म्हणून बाकीचेही तोंडात मूग गिळून बसले आहेत. नाही म्हणायला आता उद्योगपती बनलेला रामदेवबाबा हा पतंजली शिष्य व्यायामपटूच तेवढा पुढे झाला आहे. संघाला बोलता येत नाही कारण ती सांस्कृतिक संघटना आहे. भाजपला तोंड उघडता येत नाही कारण सारा घोटाळा त्याच पक्षाच्या घशात अडकणारा आहे आणि त्यांनी नावे ठेवायची ती तरी कुणाला? ज्यांच्या भरवश्यावर तो पक्ष आणि त्याचे बोलघेवडे प्रवक्ते व खासदार निवडून आले त्या नरेंद्र मोदींना? तसला कृतघ्नपणा ते करणार नाहीत. एखादेवेळी देशाची तिजोरी लुटली गेली तरी चालेल, मल्ल्या गेला आणि दोन मोदी पळाले तरी चालतील. या मोदींना मात्र त्याचा बोल कुणी लावणार नाही. कारण ‘ते’ आहेत म्हणूनच हेही सत्तेवर आहेत.
‘ते’ आहेत म्हणून तर ‘हे’ आहेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 4:08 AM