मिलिंद कुलकर्णीएनएचएआय (नॅशनल हायवे अॅथारिटी आॅफ इंडिया) च्या नवी दिल्लीतील इमारत बांधकामाच्या उदघाटनाप्रसंगी केद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलेला संताप ही जनमानसाची भावना होती. प्रशासनातील कामचुकार, निष्क्रिय अधिकाऱ्यांमुळे कामे खोळबंत असल्याची सार्वत्रिक भावना आहे. त्याचा अनुभव स्वत: गडकरी यांनी घेतला. इमारत पूर्ण झाली, याबद्दल अभिनंदन करताना ९ वर्षे विलंब झाल्याने संकोच वाटत असल्याचे त्यांनी परखडपणे सांगितले. ज्या अधिकाऱ्यांनी निर्णय, अंमलबजावणीत विलंब लावला, त्यांची छायाचित्रे या इमारतीत लावायला हवेत, असे उद्वेगाने ते म्हणाले.
एनएचएआयच्या इमारतीप्रमाणे या विभागाने खान्देशातील महामार्ग चौपदरीकरणाचा कामात घोळ घालून ठेवला आहे. दहा वर्षांपासून कामे सुरु आहेत, पण कोणताही एक महामार्ग पूर्ण झालेला नाही. राष्टÑीय महामार्ग क्र.६ मध्ये तर अडथळ्यांची मालिका कायम आहे. नवापूर (जि.नंदुरबार) ते चिखली (मुक्ताईनगर) या दरम्यानच्या २९० कि.मी. महामार्ग चौपदरीकरणासाठी १० वर्षांपासून कामे सुरु आहेत. पण कधी ठेकेदार काम सोडून देतो, कधी संथगतीने काम चालते, पण राष्टÑीय महामार्ग विभाग त्यावर तोडगा काढू शकत नाही.
नवापूर ते फागणे या नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील १४० कि.मी. अंतराच्या महामार्ग चौपदरीकरणाचे भिजत घोंगडे कायम आहे. नवापुरात भूसंपादनाचा प्रश्न अनिर्णित आहे. धुळे, कुसुंबा, नेर, शेवाळी, सरवण, चिंचपाडा या सहा ठिकाणी बायपास प्रस्तावित आहे. मोहाडी, चिंचपाडा, नवापूर येथे रेल्वे उड्डाणपूल आहे. १३ ठिकाणी बोगदे बांधले जात आहेत. पण हे काम अतीशय संथ गतीने सुरु आहे. अशीच स्थिती फागणे ते तरसोद या रस्त्याची आहे. ८७ कि.मी.चा हा रस्ता आणि तरसोद ते चिखली हा ६३ कि.मी.च्या रस्त्याचे एकत्रित काम एल अँड टी कंपनीने घेतले होते. कॅम्प आॅफीस सुरु झाले होते. पण राजकीय हस्तक्षेपामुळे या कंपनीने काम सोडून दिले. त्यानंतर या कामाची विभागणी करुन दोन स्वतंत्र कंपन्यांना देण्यात आले. तरसोद ते चिखली या दरम्यानचे काम वेगात सुरु असताना फागणे ते तरसोद दरम्यानचे काम संथगतीने सुरु आहे.
अशीच स्थिती जळगाव ते औरंगाबाद या महामार्गाची आहे. महामार्ग विभाग आणि ठेकेदाराच्या समन्वयाअभावी हे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडलेले आहे. जळगावकरांना १५० कि.मी.अंतरावर असलेल्या औरंगाबादला जाण्यासाठी अडीच- तीन तास पुरेसे होते. चौपदरीकरणाच्या घोळामुळे ४ -५ तास लागत आहे. तरीही रस्ता इतका खराब आहे की, जळगावकरांनी या नेरी, पहूरमार्गे जाण्याचे बंद करुन चाळीसगाव, कन्नड मार्गे औरंगाबादला जाऊ लागले. वेळ आणि इंधनाचा अपव्यय केवळ आणि केवळ महामार्ग विभाग आणि ठेकेदारांच्या घोळामुळे होत आहे.
जळगाव शहरातील समांतर रस्त्याचा विषय महापालिका, राज्य शासन आणि महामार्ग विभाग यांच्या टोलवाटोलवीत अनेक वर्षे रखडला. २०१४ मध्ये पहिल्यांदा भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर गडकरी यांनी १६०० कोटी रुपयांच्या महामार्ग चौपदरीकरण कामाचे भूमीपूजन केले होते. त्यात जळगाव शहरातून जाणाºया महमार्गाच्या चौपदरीकरणाचा समावेश होता. मूळ प्रस्तावात जळगाव ते तरसोद असा वळण रस्ता असल्याने शहरातील रस्त्याची जबाबदारी कुणाची, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. महामार्गावरील अवजड वाहतूक, शहरवासीयांची वर्दळ वाढल्याने अपघातांचे प्रमाण वाढले. किमान समांतर रस्ते तयार करावे, ही मागणी थेट न्यायालयापर्यंत गेली. अखेर महामार्ग विभागाने हे काम हाती घेतले. पण त्याचीही गती संथ आहे. कामे सदोष आहेत. प्रभात कॉलनी येथील बोगद्याविषयी अभियंत्यांनी लक्ष घातल्यानंतर या विभागाला जाग आली. शिवकॉलनीत बोगद्याचा प्रस्ताव नाही, उड्डाणपुलाचा समावेश नाही. त्यामुळे घोळ कायम आहे.
बºहाणपूर ते अंकलेश्वर या महामार्गाच्या चौपदरीकरणाला अद्याप सुरुवात झालेली नाही. खान्देशातील शिरपूर, चोपडा, यावल, रावेर या तालुक्यांमधून जाणारा महत्त्वपूर्ण मार्ग आहे. भूसंपादन बºयापैकी झाले आहे. पण त्या कामाला अद्याप सुरुवात नाही.केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इमारतीच्या बांधकामाला दिरंगाई करणाºया अधिकाºयांची छायाचित्रे लावण्याचे उपहासात्मक विधान केले. त्याप्रमाणे या महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण झाले की, कुणाचे पुतळे उभारायचे त्याची यादी आतापासून तयार करायला हवी. नाही का ?