सांगली जिल्ह्यातील औदुंबरच्या साहित्य संमेलनाने यंदा अमृतमहोत्सव साजरा केला. त्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्टÑ संकटात असताना साहित्यिक गप्प आहेत, असा सवाल करत साहित्यिकांना तर सुनावलेच, पण मराठी माणसाच्या भल्यासाठी जातीपातीच्या राजकीय भिंती पाडण्याचा सल्लाही दिला.सांगली जिल्ह्यातील औदुंबर कृष्णा नदीच्या डोहासाठी जसे प्रसिद्ध आहे, तसे सदानंद मंडळाच्या साहित्य संमेलनासाठीही सर्वदूर परिचित आहे.औदुंबरला कृष्णेचा खोल डोह आहे. बहुतांश राजकीय मंडळींचे पक्षांतर्गत मतभेद याच डोहात बुडवले जातात! येथील कृष्णाकाठावरील दत्तमंदिरात निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ फोडून मतभेद बुडविल्याच्या घोषणा नित्यनियमाने केल्या जातात. औदुंबर ज्या गावाचा भाग आहे, त्या अंकलखोपला यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील या दोन दिग्गजांचे मनोमीलन झाले होते. अगदी तसेच मनोमीलन येथील साहित्य संमेलनातही तमाम सारस्वतांचे होते. कारण कोणताही वादविवाद न झडता या संमेलनाच्या अध्यक्षांची निवड एकमताने होते.हिरवेगार मळे असणाºया, प्रसन्नतेचा अनुभव देणाºया या भागात सृजनाचा मळा फुलवण्यासाठी म. भा. भोसले (गुरुजी), ग. न. जोशी, किशोर सामंत, प्रभाकर सामंत, ह. न. जोशी तथा कवी सुधांशू यांनी १९३९ मध्ये साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली. सदानंद सामंत या मित्राच्या स्मृती जपण्यासाठी त्याच्या नावाने सदानंद साहित्य मंडळ स्थापन करून त्या माध्यमातून दरवर्षी संक्रांतीला संमेलन घेण्याची प्रथा सुरू केली. ‘दत्त दिगंबर दैवत माझे’ यासारखी भक्तिगीते लिहिणाºया कवी सुधांशूंनी ती कसोशीने जपली. अलीकडे मौज प्रकाशनशी संबंधित मातब्बर लेखक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांनी ती आणखी समृद्ध केली.महामहोपाध्याय द. वा. पोतदार यांनी या संमेलनाचे पहिले अध्यक्षपद भूषविले. वि. स. खांडेकर, अनंत काणेकर, दुर्गा भागवत, नारायण सुर्वे, गो. नी. दांडेकर, पु. ल. देशपांडे, विजय तेंडुलकर, नामदेव ढसाळ, ना. धों. महानोर, शांता शेळके, अरुण साधू, अनिल अवचट, विजया राजाध्यक्ष, न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर अशा भिन्न-भिन्न प्रकृतीच्या मान्यवरांनी येथे साहित्यविचार मांडले.यंदा या साहित्यसेवेचा अमृतमहोत्सव. त्यामुळे तीन दिवस अक्षरफुलांचा जागर झाला. विशेष म्हणजे यंदा संमेलनाध्यक्षांची निवड न करता समारोपासाठी अध्यक्ष म्हणून महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना निमंत्रित करण्यात आले. ठाकरे यांनी विचारमंचावर येण्यापूर्वीच ‘मी एकदा सुरुवात केली, तर मंचावर कोण आहे, हे न पाहता बोलणार’, असे स्पष्ट करत थेट साहित्यिकांनाच धडे दिले. आज महाराष्टÑ संकटात असताना साहित्यिक गप्प आहेत. महाराष्टÑासह मुंबईवर कब्जा करण्याचा प्रयत्न सुरू असून, साहित्यिक लिहीत का नाहीत? कोठे गेले भूमिका घेणारे साहित्यिक? महाराष्टÑात जे घडत आहे, त्यावर का बोलत नाहीत?, असा रोकडा सवाल त्यांनी केला. केवळ साहित्य संमेलने भरवून उपयोग नाही, तर लोकांच्या हाती साहित्य दिले पाहिजे, इतिहासातून धडेही घेतले पाहिजेत, लोकांना समजावून सांगितले पाहिजे, असे बजावत मराठी भाषेच्या अभिजात दर्जाचा मुद्दा त्यांनी पुन्हा छेडला. मराठी माणूस टिकला तरच मराठी भाषा टिकेल, हे सांगायला ते विसरले नाहीत.मराठी अस्मितेचा प्रश्न असताना राजकीय पक्ष आणि जातीपातीच्या भिंती पाडल्या पाहिजेत, असा सामाजिक हुंकार त्यांच्या भाषणातून उमटला.- श्रीनिवास नागे
साहित्यसेवेच्या अमृतमहोत्सवात सामाजिक धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 3:10 AM