ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी ज्या शिलेदारांनी आपले जीवन वेचले, त्यात अकलूजच्या स्वर्गीय शंकरराव नारायणराव मोहिते-पाटील यांचा उल्लेख आवर्जून केला जातो. स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्रामध्ये क्रांती लढ्याचा जो अग्निकुंड पेटला होता त्या अग्निकुंडात अनेकांनी आहुती दिली. दक्षिण महाराष्ट्रातल्या क्रांतीवीरांच्या त्या लढ्यात क्रांतीवीरांच्या खांद्याला खांदा लावून त्यांचे बळ वाढविण्याचे काम सोलापूर जिल्ह्यात अकलूज परिसरात शंकररावांनी केले. आपली आजी कबईने प्रेमाने थापलेल्या भाकरींचा वरवा त्यांनी आपल्या भागात आलेल्या भूमिगत क्रांतीवीरांसाठी त्या काळी नेमाने घातला. क्रांतीसिंह नाना पाटील यांनी इंग्रज सरकारच्या विरोधात चालवलेल्या ‘पत्री सरकार’ (प्रति सरकार) लढ्यातही ते आघाडीवर राहिले. चळवळीने दिलेला लढवय्या बाणा जतन करीत स्वातंत्र्यानंतर विकासाची ओढ लागलेल्या जनतेला दिशा देण्याचे काम मोठे आव्हानात्मक होते. त्यात भर पडली ती संयुक्त महाराष्ट्र चळवळीची! महाराष्ट्र ढवळून काढणाऱ्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीने बाळसे धरल्यानंतर शंकररावांसारख्या राज्यातील ग्रामीण नेत्यांपुढे चळवळ आणि विकास यांचा मेळ घालणे खूप जिकीरीचे होते. स्वत: वस्तीवर राहून शेतात राबणाऱ्या कुटुंबात वाढलेल्या त्यांच्यासारख्या हाडाच्या बळीराजाला तोही मेळ घालणे कठीण गेले नाही. कारण लोकांचा विश्वास आणि प्रेम हेच त्यांचे बलस्थान होते. त्याच कारणाने शंकररावांनी त्याही काळात आलेल्या प्रत्येक परिस्थितीवर मात करीत ‘लोकांचा सच्चा आमदार’ बनण्याचे सामर्थ्य दाखविले होते. लोकांशी असणारा संपर्क, त्यांच्या अडीअडचणीत साथ देण्याची वृत्ती आणि प्रेम यामुळे त्याकाळी लोकांनी ‘आमदार’ ही उपाधी बहाल केली होती. १९५२ साली पहिल्यांदा मुंबई राज्यात आमदार झालेल्या शंकररावांनी पुढे १९६० ते १९७२ या कालावधीत नवमहाराष्ट्रातही लोकांनी दिलेली ‘आमदार’ ही उपाधी विधानसभेतही गाजत ठेवली. खरे तर ते मूळचे माने घराण्यातले. १९३९ साली लक्ष्मीबाई मोहिते यांनी त्यांना दत्तक घेतले. पुढे अकलूजची पाटीलकी त्यांच्याकडे आली आणि ते शंकरराव मोहिते-पाटील या नावानेच ओळखले जाऊ लागले. गावाच्या विकासाचे मुख्यद्वार हे गावची सोसायटी असते हे ते जाणून होते. त्यांनी सोसायटी सभासदापासूनच आपल्या कामाची सुरुवात केली. अकलूजच्या सरपंचपदापासून राज्याच्या राजकारणातील लोकप्रिय ‘सहकारमहर्षी’ या सन्मान पदापर्यंत ते स्वत:च्या कर्तबगारीने पोहोचले. शेतकऱ्यांचे कुटुंब शहाणे करायचे असेल तर त्याच्या कुटुंबातील मुले शिकली पाहिजेत हे तत्त्व त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातच अंगिकारले होते. शिक्षणाच्या प्रसारासाठी १९४६ साली त्यांनी अकलूज येथे शिक्षण प्रसारक मंडळाची सुरुवात केली. शिक्षणाच्या सोयी ग्रामीण भागात नाहीत, या अडचणीवर मात करण्यासाठी त्या भागातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह असणे आवश्यक होते. सुरुवातीच्या काळात २५ मुलांची सोय होईल असे झोपडीवजा वसतीगृह त्यांनी सुरू केले. त्या कुडाच्या वसतीगृहाचा विस्तार झपाट्याने झाला म्हणून १९४८ साली त्यांनी ‘विजय विद्यार्थी वसतीगृहाची’ स्थापना करून शैक्षणिक चळवळीला व्यापक बनविले. शेतकऱ्यांच्या मालाची विक्री हा प्रश्न त्याही वेळी होताच. शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी १९५१ साली कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना केली. चळवळीचे पिंड असणाऱ्या शंकररावांनी १९५२ साली स्वतंत्र पक्षाचे उमेदवार म्हणून विधानसभेची निवडणूक पहिल्यांदा लढवली आणि जिंकलीही ! १९५७ साली ते शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारीवर आमदार झाले. पुढच्या राजकीय प्रवासात त्यांनी काँग्रेस पक्षाचे कास धरली.ज्या भागात सहकाराचे जाळे गतीने विणले जाईल त्या भागातील शेतकरी त्याच गतीने आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल हे सूत्र त्यांनी जाणले होते. शिक्षण, शेतमालाला योग्य बाजारपेठ आणि सहकारी सोसायट्या हे क्षेत्र त्यांनी खुले करण्याची प्रक्रिया त्या काळी गतिमान केली. हे सर्व होत असताना शेतकऱ्यांना खात्रीचा पैसा देणाऱ्या सहकारी साखर कारखानदारीची गरज होती. १९५० च्या दशकात त्यांनी अकलूज परिसरात सहकारी साखर कारखाना उभा करण्याचे स्वप्न पाहिले. ते साकार करण्यासाठी ऊसाचे क्षेत्र वाढविण्यासाठी विहीर बागायती असलेल्या सोलापूर जिल्ह्यात त्यांनी विहिरींची संख्या वाढवून ऊसाचे क्षेत्र वाढविण्याचा प्रयत्न केला. त्यात ऊस क्षेत्र विकासात राज्यात पहिले येण्याचा मानही मिळविला. तरीही साखर कारखाना उभारणी हा विषय त्या काळात अनेक अडथळ्यांची शर्यत बनला होता. त्या शर्यतीत लोकांच्या पाठिंब्याने ते लीलया यशस्वी झाले. दुष्काळी भागातील माळरानावर शेतात राबणाऱ्या बळीराजाकडून कारखान्यासाठी भाग भांडवल जमा करणे मोठे कठीण होते. सहकारी साखर कारखाना परवान्यासाठी त्यावेळी एकरकमी तीन लाख रुपये भाग भांडवल जमा केल्यास परवाना देण्याचा शब्द त्यावेळचे केंद्रीय कृषी राज्यमंत्री पंजाबराव देशमुख यांनी शंकररावांना दिला आणि शंकररावांनी रात्रीचा दिवस करून भाग भांडवल उभे केले. १९६१ मध्ये कारखान्याचे भूमिपूजन झाले. १९६३ मध्ये ते चेअरमन असलेल्या त्याच यशवंत सहकारी साखर कारखान्यात पहिला गळित हंगाम झाला. समाजकारण करीत असताना प्रशासकीय शिस्ती बरोबरच नीटनेटकेपणा आणि सौंदर्यदृष्टीही असली की नंदनवन फुलते याची प्रचिती शंकरराव मोहिते-पाटील यांच्या जीवन प्रवासाकडे पाहिल्यानंतर येते. जे उभे करायचे ते सर्वोत्कृष्टच हा ध्यास त्यांनी उभ्या केलेल्या प्रत्येक संस्थेच्या प्रगतीत आणि वास्तूमध्ये देखील दिसायचा. १९५९ साली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्वागतासाठी साकार केलेला २५० खिल्लारी बैलांचा रथ असो वा महाराष्ट्राच्या इतिहासात गाजलेले त्यांचे चिरंजीव विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या विवाहानिमित्त दिलेले ‘लक्ष भोजन’ असो, प्रत्येक ठिकाणी शंकररावांची सौंदर्यदृष्टी आणि त्यांच्यात दडलेला ‘हाडाचा मॅनेजमेंट गुरू’ दिसतो. त्याच परंपरेचे पाईक होण्याचे काम माजी उपमुख्यमंत्री व विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, दिवंगत सहकार राज्यमंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील या चिरंजीवांनी व नातू राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले प्रदेश युवक अध्यक्ष रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी राज्याच्या राजकारणात केले आहे. त्यांच्या राजसिंह, जयसिंह, मदनसिंह आणि स्वर्गीय उदयसिंह या मुलांनीही कृषी, शिक्षण आणि ग्रामोद्योगात खूप मोठे काम उभे केले आहे. तसेच धवलसिंह (स्व.प्रतापसिंहांचे चिरंजीव) व धैर्यशील ही नातवंडे राजकारणात कार्यरत आहेत.-राजा माने(संपादक, लोकमत, सोलापूर)
‘सोशल मॅनेजमेन्ट गुरु’ शंकरराव मोहिते-पाटील!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2017 1:07 AM