- किरण अग्रवाल
सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला असून विशेषतः तरुण पिढी त्याच्या आहारी गेल्याचे चित्र आहे. या माध्यमाचा केवळ वापरच वाढला असे नाही, तर तो अनिर्बंधही होत चालल्याचे व त्यातून अनेक समस्या निर्माण होऊ लागल्याचेही दिसून येते. त्यामुळेच त्याच्या हाताळणीबाबत आचारसंहिता लागू होणे गरजेचे बनले आहे. ती स्वयंस्फूर्तीने पाळली जात नसल्याने, शासकीय यंत्रणांकडूनच त्याबाबतची पावले उचलली जावयास हवी. कोण कुठला एक ‘हिंदुस्थानी भाऊ’ उठतो आणि त्याच्या चिथावणीतून राज्यात जागोजागी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचे पाहता यासंबंधीची गरज प्रकर्षाने अधोरेखित होऊन गेली आहे.
मोबाईल क्रांतीत संपर्कापेक्षा संदेशांचे आदान-प्रदान मोठ्या प्रमाणात होत असून, सोशल मीडियाचा वापर अनिर्बंधपणे होऊ लागला आहे. अर्थात इंटरनेट कनेक्टिव्हिटीशी संबंधित हे तंत्र असल्याने या क्षेत्रातील कंपन्यांसाठी व्यावसायिकदृष्ट्या हा वाढता वापर लाभदायीच आहे हा भाग वेगळा, परंतु हे होताना समाजस्वास्थ्य बिघडवण्यास कारणीभूत ठरणाऱ्या ज्या बाबी या माध्यमांवर किंवा त्या माध्यमातून घडून येतात, त्यामुळे चिंता व्यक्त होणे स्वाभाविक ठरून गेले आहे. या माध्यमांमुळे कनेक्टिव्हिटी वाढून जग जवळ आले, हे चांगलेच झाले म्हणायचे; पण नफ्यासोबत नुकसान वा फायद्यासोबत तोटा असतो तसे सोशल मीडियाबाबत झाले आहे. यातही गंभीर बाब अशी की, सुटलेला बाण परत घेणे अवघड होऊन बसते तसे या मीडियाचे असते. त्यामुळे यातून होणारे नुकसान केवळ व्यक्तिगत अगर आर्थिकच नसते, तर ते एकूणच समाजाला व देशालाही हानी पोहोचवणारे ठरू शकते. म्हणूनच याबाबत स्वयंस्फूर्त आचारसंहिता किंवा मर्यादा पाळल्या जाणार नसतील तर सरकारी पातळीवरून त्यासाठी काही सीमारेषा आखण्याची अपेक्षा गैर ठरू नये.
सोशल मीडियावरून केल्या जाणाऱ्या प्रचाराला निवडणूक काळात निवडणूक आयोगाकडून अलीकडे आचारसंहितेची मर्यादा घालून दिली जाऊ लागली आहे, पण एरव्ही या माध्यमांच्या हाताळणीबाबत कसलीही रोकटोक नाही. कुणीही उठतो आणि कशाही प्रकारे व्यक्त होतो. त्यामुळे एखाद्याच्या अविचारी, अविवेकी चिथावणीतून समाजस्वास्थ्य बिघडण्याचा प्रसंग ओढवण्याची शक्यता निर्माण होते. कोरोनामुळे सुमारे दोन वर्षे ऑनलाईन शिक्षण दिले गेले असताना परीक्षा ऑफलाईन का, असा प्रश्न कुण्या ‘हिंदुस्थानी भाऊ’ने उपस्थित केल्यावर राज्यातील विविध शहरांमधील रस्त्यांवर शेकडो विद्यार्थ्यांनी उतरून प्रचलित पद्धतीच्या परीक्षांना विरोध दर्शविल्याचे अलीकडीलच उदाहरण यासंदर्भात पुरेसे बोलके असून ते कायदा सुव्यवस्थेला धक्का देणारेही ठरले. या भाऊच्या संबंधित विधानामागे व अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणातील विद्यार्थ्यांच्या जमावामागे आणखी कुणाचा हात आहे की काय हा संशोधनाचा विषय आहे, पण सोशल मीडियावरील एखाद्याच्या भडकावूपणातून तरुण पिढीचे कसे भरकटलेपण प्रत्ययास येऊ शकते व अशांतता निर्माण होऊ शकते हे यातून पुढे येऊन गेले.
बरे, सोशल मीडियाच्या दुरुपयोगाचे हे एवढे एकच उदाहरण नाही. इन्स्टाग्राम वरून ‘थेरगाव क्वीन’ नावाच्या एका अकाऊंटद्वारे अश्लील भाषेत धमकीचे व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या दोन तरुणींसह तिघांविरुद्ध पुण्यातील वाकड पोलीस स्टेशनमध्ये अलीकडेच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुला-मुलींची नीती भ्रष्ट होण्यास व मानसिक स्थिती बिघडविण्यास कारणीभूत ठरल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. इतकेच कशाला, सोशल मीडियावरील अनिर्बंध व्हायरलगिरीतून बदनामीकारक बाबीही खातरजमा न करता इकडून तिकडे फॉरवर्ड केल्या जातात, तसेच दुःखद प्रसंगी भावना दुखावणारे किंवा संवेदनांचा बाजार मांडणारे प्रकारही काही महाभागांकडून घडून येतात. सिंधूताई सपकाळ यांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवाला सचिन तेंडुलकरने खांदा दिल्याची व्हायरल पोस्ट अशातलीच. मिसेस मुख्यमंत्री आरटीओच्या रांगेत उभ्या असल्याची एक पोस्टही अशीच चुकीची होती. इतरही अनेक उदाहरणे देता येण्यासारखी आहेत. मतलब इतकाच की, सोशल मीडियावरील या संदर्भातील अनिर्बंधतेला लगाम घालणे गरजेचे होऊन बसले आहे.