शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

Social Media: अस्वस्थ काळाचे वर्तमान, सोशल मीडिया वाटतो तेवढा पोकळ नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 6:23 AM

Social Media: पुरुषसत्ताक व्यवस्थेत आता सांस्कृतिक राष्ट्रवादाची भर पडली आहे. घाणेरडं राजकारण सगळ्या पातळ्यांवर शिरतं आहे.

- डॉ. प्रज्ञा दया पवार(ख्यातनाम लेखिका, कवयित्री) 

या अस्वस्थ काळात ‘समग्राशी डोळा भिडवण्या’तून थकायला होतं?, राग येतो?, हताश वाटतं?  काळ खूप अवघड आहे... तसे तर, प्रत्येक काळाने अनेक प्रश्न उभे केलेत, आपला अंत पाहिलाय, कस लावलाय. कोरोना काळात प्रश्न झगझगीतपणे उभे ठाकले. या काळात सगळे व्यवहार थांबले, जगण्यालाच एका अर्थानं खीळ बसली. कालांतरानं आपण मार्ग शोधले पण, ही परिस्थिती इतकी अविश्वसनीय होती-आहे की, हताश होणं, थकणं स्वाभाविकच आहे. सतत सकारात्मक असणं जास्त थकवणारं आहे.  आपण साधी हाडामांसाची माणसं आहोत. या अवघड वेळांमध्ये आपण जिवलगांना गमावलं, कष्टकरी-वंचितांचं स्थलांतर बघितलं, आजारपणांच्या बदलत्या तऱ्हा पाहिल्या, औषधांबाबतीत फसवाफसवी पाहिली, राजकीय स्तरावरची अभूतपूर्व भाषणबाजीही पाहिली. तरी मला वाटतं, विवेकपूर्ण जगणं, ‘जगा, जगवा, जगू द्या’ म्हणत एकमेकांना शक्य तितकी साथ करणं हेही केलंय ना आपण?, शासन-प्रशासन बाजूला ठेवा, पण, साधीसाधी माणसं अवघड प्रसंगी एका ताकदीनं व शहाणीव घेऊन उभी राहिली म्हणून आपण सगळे आजघडीला नीट आहोत असं मला वाटतं.

तुमच्या काव्यसंग्रहाचंच नाव ‘दृश्यांचा ढोबळ समुद्र’. आज व्यापक पटलावर दिसणाऱ्या दृश्याबाबतीत काय म्हणाल? ज्या राज्यसंस्था व शासनसंस्थांनी नागरिकांच्या कल्याणासाठी उदारमतवादी असायला हवं, समन्वयवादी असायला हवं त्यांनी सर्वसामान्य माणसाची झगडण्याची क्षमता जणू हिसकावून घेतली आहे. टागोर व डॉ.आंबेडकरांची  ‘आयडिया ऑफ इंडिया’ होती त्याच्या बरोबर उलट वास्तव आपण आज अनुभवतो आहोत. खरा भारत बहुआयामी व बहुआवाजी आहे. आदिवासी, मुस्लीम, ख्रिश्चन, अल्पसंख्याक, तमाम स्त्री समूह, निष्पाप मुलं, वेगवेगळे रंग, खाद्यसंस्कृती, राहाणीच्या विविध संपन्न पद्धती, अगणित सभ्यता या सगळ्यांची एकत्र मोट बांधून चालणारा देश अशी आपली भारतपणाची संकल्पना होती. दुर्दैवानं या संकल्पनेपासून आपण कधी नव्हे इतके दूर आलेलो आहोत. ‘बाबरी ते दादरी’ अशा वाईट सुसंगतीचे बळी ठरत आहोत. एकारलेल्या, पडझड झालेल्या या ढोबळ दृश्यांमधून दिसतं की, सांस्कृतिक राष्ट्रवादाचा वरवंटा आपल्यावर फिरतो आहे. बहुसांस्कृतिक भारतातील प्रत्येक कमजोर घटक वर सांगितलेल्या क्रमानं भारतपण भरडतो आहे. ही सगळी दृश्यं आपल्या वाट्याला का येतात?, कुणी दिली ती?, अलीकडच्या पंचवीस वर्षांवर नजर टाकली तर, कळतं आता बलात्कारी बाईला जिवंत राहाण्याचा अधिकारही देत नाहीत. मारून टाकतात ! तोवर विकृत छळ करतात. ही हिंसा काही कुठल्या पोकळीतून एकाएकी निर्माण होत नाही. ही राज्यसंस्थांनी पुरस्कृत केलेली हिंसा आहे. पुरूषसत्ताक व्यवस्था होतीच, पण, आता त्यात सांस्कृतिक राष्ट्रवादाची भर पडली आहे. घाणेरडं राजकारण सगळ्या पातळ्यांवर शिरतं आहे. अन्याय करण्याचे परवाने घेऊन व्यवस्था शोषण करताहेत.

पण, व्यवस्था माणसंच रचतात ना?, की माणसांना व्यवस्था रचते? माणूस व व्यवस्था हे नातं द्वंद्वात्मक आहे. एकास एक नाही. माणूस त्याच्या भवतीच्या विक्राळ व्यवस्थेचा एक छोटासा भाग असतो हे, जरी खरं असलं, तरी अशा छोट्याछोट्या माणसांचं संघटन बनतं. अशीच छोटी छोटी माणसं, रस्त्यावर एकत्र येतात, आंदोलनात, मोर्चात एकत्र येतात, ती व्यवस्था बदलण्याची ताकद तिचा लहानसा भाग असणाऱ्या माणसांमध्येच आहे. व्यवस्थेतला अमानुषपणा भेदण्याची ताकद माणसांतच असते.

व्यवस्था रचण्यासाठी माणसांमधले संबंध साजरे हवेत. निर्भयता हवी...?मानवी संबंधातील विरूपतेचा प्रश्न  सनातन  आहे.  पुरूषसत्ताक व्यवस्था, नवभांडवली व्यवस्था, जमातवाद, जातवाद आणि भांडवलवाद यांची एक अभद्र युती तयार झालेली आहे. त्यातून जगभर धार्मिक उन्माद वाढत आहेत. यातून आलेला एक अपरिमित मुजोरपणा भारतात व जगातल्या वेगवेगळ्या देशांतही दिसतो. त्यामुळं सामान्य माणसाचं जगणं कधी नव्हे इतकं बिकट झालेलं आहे. माणसाला सुरक्षिततेचं अभय नाही. लहान मुलं बाहेर गेली की, धड परतून येतील का, याची भीती वाटते. घराबाहेर पडल्यावर आपला संबंध असो, नसो भयाची तलवार टांगती राहाते. जगण्याच्या पातळीवर असंख्य जीवघेणे प्रश्न पाठ सोडत नाहीत. लहानमोठ्या गटात प्रभाव गाजवणाऱ्या प्रवृत्ती बोलू देत नाहीत. खरं तर, ही सगळी माणसातलीच अंतर्गत लढाई आहे. समस्या पण माणूस आहे, पण, तोडगा काढणाराही माणूस आहे.

आभासी जगण्यात गुंतून पडलेली माणसं कसला या परिस्थितीबद्दल विद्रोह करणार!, नकाराची शक्ती कुठून येणार? मी समाजमाध्यमं वापरते आणि त्याकडे नकारात्मक पद्धतीने बघता येणार नाही असं माझा अनुभव सांगतो. सशक्त व मुक्त संवादासाठी पर्यायी माध्यमांचा जो शोध घेतला गेला त्यातून सोशल मीडिया अस्तित्वात आला. त्यांच्या येण्यामुळे माध्यमांचं विकेंद्रीकरण झालं, तो लोकशाहीचा एक बाज म्हणून मी बघते. स्त्रियांच्या हक्कांसंदर्भातली पिंजरा तोड आंदोलन, मी टू, गुलाबी चड्डी, ब्रा पासून बुब्जपर्यंत, राईट टू पी अशी आंदोलनं समाजमाध्यमावर उभी राहिली. त्यातून बळ घेऊन त्या निरनिराळे प्रश्न विचारत व्यवस्थेला धडका देत राहिल्या. ताजं उदाहरण शेतकरी आंदोलनाचं. मुख्य प्रवाही मीडियानं या आंदोलनावर बहिष्कार घातला होता, तिथल्या खऱ्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचत नव्हत्या. ज्या पोहोचायच्या त्या नकारात्मक होत्या. मी तिथं पोहोचले, चळवळीच्या अग्रस्थानी असणाऱ्या माणसांशी बोलले तेव्हा मूलभूत म्हणणं अधिक कळू शकलं. मात्र, समाजमाध्यमांचा उपयोग करूनच त्यांनी संपूर्ण जगाशी संवाद साधला. या आभासी जगात मुखवटे घालून ओचकारणारे ट्रोलर्स आहेत, असणार. ते घायाळ करणार, ताकद खच्ची करणार. मात्र लढा बिकट, गुंतागुंतीचा व जिकिरीचा असतो तेव्हा माणसं एकमेकांसाठी आभासी जगात बोलायला सुरूवात करून प्रत्यक्ष जमिनीवर उभं राहाण्याची जिद्द कमावतात. चित्र बदलू शकतं हे सगळ्यांना दिसलंच आहे.मुलाखत : सोनाली नवांगुळ

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाIndiaभारतPoliticsराजकारणInternationalआंतरराष्ट्रीय