मिलिंद कुलकर्णीकोरोनाचा प्रकोप वाढण्यासाठी अन्य कारणांसोबतच लग्न आणि अंत्ययात्रेला झालेली गर्दी हे प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत. काही ठिकाणी कारवाईदेखील झाली. अशा गर्दीची माहिती न देणाऱ्या पोलीस पाटलांना निलंबितदेखील करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय लेवा पाटीदार गुर्जर समाज आणि जळगाव जिल्हा सकल मराठा समाजाने पुढाकार घेऊन लग्नाला ५० तर अंत्ययात्रेला २० पेक्षा अधिक लोक न बोलावण्याच्या शासन निर्णयाचे काटेकोर पालन करण्याचे जाहीर आवाहन केले आहे. दोन्ही समाजातील धुरिणांनी स्वयंस्फूर्तीने केलेले आवाहन समाजाला दिशादर्शक आणि सामाजिक भान जपणारे आहे.कोरोना ही जागतिक महामारी आहे. संपूर्ण जग त्याच्याशी लढतेय. हात धुणे, मास्क वापरणे व शारीरिक अंतर राखणे हे उपाय करुन कोरोनापासून दूर राहण्याचे आटोकाट प्रयत्न सुरु आहेत. पाश्चात्य देशात मास्कविरोधात आंदोलने होत असताना आपल्याकडे लग्न व अंत्ययात्रेप्रसंगी गर्दी करु नये, या शासकीय दंडकाला सामाजिक बळ देण्याचे मोठे कार्य या दोन समाज संघटनांनी केले आहे.कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लस शोधण्यासाठी सुमारे १२५ संस्था प्रयत्नशील आहेत. काहींच्या मानवी चाचण्या सुरु झाल्या आहेत. आशादायक असे चित्र त्यातून दिसून येत असले तरी सद्यस्थितीत समूह संसर्गाची भीती भारतात व्यक्त होत आहे. त्या पार्श्वभूमीवर वैयक्तीक, सामाजिक पातळीवर जनजागृतीची मोठी आवश्यकता आहे. लोकांमध्ये निर्माण झालेली भीती दूर करण्याचीअ ावश्यकता आहे. त्यात अखिल भारतीय लेवा पाटीदार गुर्जर समाज व जळगाव जिल्हा सकल मराठा समाज या सामाजिक संघटनांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत जनमत तयार करण्यासाठी पावले उचलली आहेत. या दोन्ही संस्थांनी सामाजिक विकासात मोठे योगदान दिलेले आहे. गुर्जर समाजाचे अध्यक्ष दीपक पाटील यांचे वडील ज्येष्ठ नेते स्व.पी.के.अण्णा पाटील यांनी काळानुरुप बदलासाठी गुर्जर समाजाला तयार केले. संपर्क, संवाद आणि समन्वय अशी त्रिसूत्री वापरत त्यांनी अनेक कालबाह्य रुढी, परंपरा बदलण्यासाठी समाजाची मानसिकता तयार केली. त्याच प्रमाणे प्रा.डी.डी.बच्छाव यांनी शिक्षणक्षेत्रात कार्य करीत असताना भावी पिढीला सुशिक्षित करीत असताना सुसंस्कृत बनविले. उद्यमशीलतेचे धडे दिले. या दोन्ही नेत्यांच्या शब्दाला वजन आहे. मान आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या आवाहनानुसार दोन्ही समाज शासकीय नियमांचे काटेकोर पालन करतील, असा सार्थ विश्वास आहे.कोरोनाशी लढ्याला चार महिने पूर्ण होत आले. प्रशासकीय, वैद्यकीय व पोलीस यंत्रणा आता थकली आहे. त्यापैकी काहींना कोरोनाची बाधा झाली आहे. हीच वेळ आहे, समाजाने पुढे येण्याची. ती गरज ओळखून आता विविध ठिकाणी सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, व्यापारी प्रतिष्ठाने, व्यावसायिक समूह यांनी प्रशासनाला मदत करण्याचे काम सुरु केले आहे. आॅक्सिजन, व्हेंटिलेटरयुक्त खाटा उपलब्ध करुन देण्याचे काम, आरोग्य केंद्र, विलगीकरण कक्ष उभारण्याचे कार्य केले जात आहे. जळगाव शहरात जैन समाज, माहेश्वरी समाजाने विलगीकरण कक्ष उभारले आहेत. लहान कुटुंबामुळे विलगीकरणात राहण्यासाठी जागेची अडचण, शुश्रूषा करताना गैरसोय अशा बाबी लक्षात घेऊन वसतिगृह, मंगल कार्यालयात विलगीकरण कक्ष उभारण्यात आले. नाश्ता, भोजन, वैद्यकीय मदत अशी सुविधा त्याठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. कोरोनासारख्या कठीण काळात समाज संघटनांचा हा सकारात्मक पुढाकार निश्चितच स्वागतार्ह आणि दिशादर्शक असा आहे.सोन्याचा धूर निघणाºया देशात ग्रामस्वराज्य होते. स्वयंपूर्ण गाव होते. चलनासाठी पैशाची गरज नसे. धान्याने व्यवहार होत असत. हा काही फार जुना काळ नव्हे. पण समाजाची मानसिकता बदलली, शासकीय धोरणे बदलली. गाव-खेडी ओस पडली. शहरे फुगली. कोरोनापूर्व काळात शहरे बकाल झाली आणि गावे भकास झाली. कोरोनापश्चात लोक गावाकडे परतले. शेतीत रमले. कुटुंब, समाजाचे मोल जाणले. आपत्तीने आम्हाला ह्यजुने ते सोनेह्ण हा मोलाचा संदेश दिला. तो जपूया.
सामाजिक भान जपणारा निर्णय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 12:38 PM