सोलापूर टू दिल्ली..  व्हाया मुंबई !

By सचिन जवळकोटे | Published: August 1, 2021 06:19 AM2021-08-01T06:19:41+5:302021-08-01T06:21:13+5:30

लगाव बत्ती...

Solapur to Delhi .. via Mumbai! | सोलापूर टू दिल्ली..  व्हाया मुंबई !

सोलापूर टू दिल्ली..  व्हाया मुंबई !

Next

- सचिन जवळकोटे

आठ आमदार अन्‌ दोन खासदारांनी रचलेला ‘कमळ’वाल्यांचा बालेकिल्ला रोज ‘बारामतीकरां’ना सलतोय. हातातून गेलेलं राज्य पुन्हा मिळविण्यासाठी ‘काका-दादा’ पुरते कामाला लागलेत. याचवेळी सलग दोन पराभवांचा सूड घेण्यासाठी ‘सोलापूरकर पिता-पुत्री’ही अत्यंत शांतपणे एकेक पाऊल टाकत निघालेत.  एकीकडं पालिकांचा गड हासील करायचाय, तर दुसरीकडं झेडपी-पंचायतींचा प्रांतही काबीज करायचाय.. कारण भविष्यातल्या ‘सोलापूरलोकसभा’ इलेक्शनमध्ये ‘ताईं’ना ‘विजयी पंजा’ उमटवायचाय..

ताईं’चे ग्रामीण दौरे चर्चेत...!

‘सुशीलकुमारां’नी आयुष्यात दोन वेळा पराभवाची ‘ब्रेकिंग न्यूज’ ऐकलेली. पहिली अनपेक्षित होती, तर दुसरी धक्कादायक. मात्र, यानंतर लगेचच झालेल्या आमदारकीला निवडणुकीत नाकावर टिच्चून ‘प्रणितीताईं’नी सर्वांना ‘बिग न्यूज’ दिलेली. लोकसभेच्या या दोन निकालानंतर ‘पित्या’च्या  शब्दाला दिल्ली-मुंबईत किती किंमत राहिली, हे त्यांनाच माहीत.. मात्र, शहरातल्या राजकारणात ‘ताईं’चा दबदबा कायमच राहिलेला. खरं तर, दोन वर्षांपूर्वीच लोकसभेच्या व्होटिंग मशीनवर त्यांचं नाव झळकणार होतं. मात्र, तो ‘योग’ आता पुढच्या इलेक्शनला जुळून आला तर नक्कीच ‘योगायोग’ नसेल.
त्यादृष्टीनं ‘हात’वाल्यांची पावलं पडू लागलीत. गेल्या महापुरात ‘सीएम’च्या अक्कलकोट दौऱ्यात ‘ताई’ आवर्जून उपस्थित होत्या. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीतही त्यांनी पंढरपूर-मंगळवेढा गाजविला. आता लवकरच ‘दक्षिण’मध्येही मोठा मेळावा घेण्याची तयारी सुरू झालेली.
इतकी वर्षे शहरातल्या ‘मध्य’ची बाँड्रीही न ओलांडणाऱ्या ‘ताई’ आता ‘उत्तर’च्या कारभारावरही बोलू लागल्या. तोडलेली अन्‌ तुटलेली माणसं पुन्हा जोडण्यावर भर दिला जाऊ लागला. ‘खरटमल’भाऊ पुन्हा एकदा ‘जनवात्सल्य’ची पायरी चढू लागले. ‘उत्तर’मध्ये ‘प्रकाशअण्णां’सारखे सहकारी गरजेचे, हे लक्षात आल्यानंतर त्यांना काम करायला म्हणे थोडंफार स्वातंत्र्य दिलं गेलेलं. थोडक्यात, मुंबईतून दिल्लीला जायचं असेल तर स्वत:ला बदलवून घेतल्याशिवाय पर्याय नाही, हे लक्षात आलेलं.. लगाव बत्ती..

‘नानां’चा हुकूम, ‘माणसं बदला’
‘हात’वाल्या ‘पटोले नानां’नी राज्याचा कारभार स्वीकारताच पहिलं फर्मान सोडलं, ‘खुर्चीवरची माणसं बदला’ मग काय.. हवसे-गवसे लागले पळायला. ‘हसापुरें’ना पहाटेच्या साखरझोपेत तर सोडाच, दुपारच्या वामकुक्षीतही ‘जिल्हाध्यक्षांचीच खुर्ची’ दिसू लागली. हे ‘सुरेश’ म्हणजे भल्या-भल्यांना पडलेलं कोडं. जणू सोलापूरचे ‘प्रशांत किशोर’च. कधी कमळाच्या वासानं ते ‘सिद्धारामअण्णां’ची बुद्धी विचलित करतील, तर कधी ‘आवताडें’चं ‘समाधान’ करण्यासाठी ‘रणजितदादा’ अन्‌ ‘प्रशांतपंतां’सोबत मध्यस्थीही करतील. परपक्षातल्या नेत्यांच्या ‘जुळवाजुळवी’त ते भलतेच माहीर; परंतु स्वत:च्या पक्षात काही जिल्हाध्यक्षपदाची गणितं त्यांना जुळविताच न आलेली. जसं साऱ्यांना सत्तेवर बसविणाऱ्या  ‘प्रशांत किशोर’ना मात्र चांगली खुर्ची कधीच न मिळालेली.
‘खिंडीत सापडलेल्या आपल्या पार्टीला बाहेर काढण्यासाठी एखादा कट्टर मावळाच लागेल’ असं स्पष्टपणे ‘जनवात्सल्य’वर सांगितलं जाताच ‘हसापुरे’ हिरमुसले. मात्र, लगेच त्यांनी त्यावरही तोडगा शोधला. ‘अध्यक्षपद नाही तर नाही, मग एखादं महामंडळ तरी द्या’ या त्यांच्या विनंतीला ‘सुशीलकुमारां’नी ‘बघूऽऽ नक्की करूऽऽ’ असा म्हणे शब्द दिला. आता त्यांच्या ‘बघूऽऽ करूऽऽ’चा परफेक्ट अर्थ आयुष्यभर सतरंज्या उचलणाऱ्या कार्यकर्त्यांनाही ठावूक झालाय, हा भाग वेगळा. त्यामुळं ‘सिद्धारामअण्णां’नीही म्हणे ‘दुधनी’तून थेट ‘खर्गे’नंतर ‘एचकें’शी कन्नडमध्ये पर्सनल चॅटिंग सुरू केलंय.
जाता-जाता : आता हा मावळा कोण याची उत्सुकता अनेकांना लागलेली. ‘अकलूज’चे ‘धवलदादा’ की ‘माढ्या’चे ‘संदीप सर’ याचं उत्तर लवकरच मिळेल. कारण ‘मोहितेंसाठी शिंदे’ तर ‘साठेंसाठी पटोले’ तयारीला लागलेले. लगाव बत्ती..

‘हात’वाल्यांच्या दोन्ही ‘प्रकाश’नी शहर अन्‌ जिल्ह्यात किती प्रकाश टाकला हे केवळ  त्या दोघांनाच माहीत.  ‘आपल्याला कसब्याच्या बाहेरच पडू दिलं नाही’ अशी कुजबुज खुद्द ‘वालें’च्या जवळच्या कार्यकर्त्यांमध्ये. ‘ताईं’च्या या अनाकलनीय धोरणाचा फायदा घेण्यासाठीच ‘रसाळे-कामत’सारखी मंडळी रोज शहराध्यक्षपदाचं स्वप्न पाहू लागलेली. या ‘सुनील मामां’ना तर म्हणे ‘सुशीलकुमारां’नी स्पष्टपणे सांगितलेलं, ‘अध्यक्ष झाल्यावर दर महिन्याला पेट्या-दीडपेट्या खर्च करावे लागतात. तुम्हाला कसं जमणार ?’  तेव्हा ‘रसाळें’नी मोठ्या आवेशात उत्तर दिलं, ‘साहेब.. माझा खर्च खरटमल करणार !’
आता खुद्द ‘सुधीरभाऊ’च या पदासाठी इच्छुक ही आतली नवी बातमी. त्यामुळं बिच्चाऱ्या ‘सुनीलमामां’नी आता या रेसमधून बाहेर पडून रोज दत्ताचा फोटो व्हॉट्‌सअपवर पाठविण्याच्या पुण्यकार्यात स्वत:ला गुंतवून घेतलंय. ‘राजन’ मात्र पुरते चिवट. आपल्यामागे किती जनाधार याचा जास्त विचार न करता रोज ‘पोस्टवर पोस्ट’ फॉरवर्ड करण्याच्या ‘बॅटिंग’मध्येच रमलेले.
 ‘महेशअण्णा-तौफिकभाईं’ना फाइट द्यायची असेल, तर ‘चेतनभाऊं’सारखा रांगडा गडीच यंदाच्या इलेक्शनमध्ये सेनापती बनू शकतो, असाही विचार सध्या नेत्यांच्या मनात. कारण ‘महेशअण्णां’चे सारे वीक पॉइंट ‘भाऊं’ना पुरते ठावूक. राजकारणात म्हणच आहे ना, खानदानी दुश्मन परवडला; पण घरातला दुश्मन घातक. एकवेळ ‘सुशीलकुमारां’ची सावली गायब होईल; परंतु ‘चेतनभाऊ’ कधी सोलापुरात त्यांच्यापासून दूर होणार नाहीत. एवढी जबरदस्त निष्ठा. अशीच निष्ठा त्यांनी यापूर्वी ‘कोठे’ घराण्यासोबतही जपलेली, हा भाग वेगळा.. लगाव बत्ती..

‘बाजार समिती’त होणार मोठी उलथापालथ..

जिल्ह्यातली सारी मोठी पदं सध्या ‘कमळ’वाल्यांच्या ताब्यात. त्यामुळं चिडलेल्या ‘अजितदादां’नी पहिला घाव घातलाय ‘सोलापूर बाजार समिती’वरच.. कारण आगामी झेडपी-पंचायत इलेक्शनमध्ये नेत्यांना ‘रसद’ पुरवू शकणारं   हे मोठं कोठार. त्यामुळंच ‘काका वडाळाकर’ अन्‌ ‘सिद्धाराम दुधनीकर’ थेट गेले ‘विजयकुमारां’च्या वाड्यावर. ‘तुमची मुदत संपली, आता आम्ही नवा चेअरमन निवडणार,’ असं स्पष्टपणे सांगितलंय  या  ‘काका-अण्णां’नी.
गेल्या वर्षभरात ‘वाटप’ व्यवस्थित न झाल्यानं दुखावलेली बरीच मंडळी सत्ताधाऱ्यांपासून दूर सरकलीत, याचीही दोघांनी जाणीव करून दिली. कदाचित पुढच्या आठवड्यात घडतील मोठ्या घडामोडी. त्यातच ‘वडाळ्या’च्या ‘जितेंद्र’ना अध्यक्षपदाचा ‘तोहफा’ द्या, असं फर्मान  म्हणे ‘बारामती’हून सुटल्याची कुजबुज. या साऱ्या धांदलीत ‘कुमठ्याचे दिलीपराव’ मात्र पुरते अलर्ट झालेत. नेहमीप्रमाणं डोळे बारीक करून प्रत्येक हालचालीवर ते लक्ष ठेवून बसलेत.. कारण ‘विजयकुमारां’नी पायउतार होणं ही जेवढी त्यांच्यासाठी सुखावह गोष्ट, तेवढीच ‘साठे-म्हेत्रे’ परस्पर एकत्र येणं, ही चिंताजनक बाब. कुणाला काय तर कुणाला काय.. लगाव बत्ती..

Web Title: Solapur to Delhi .. via Mumbai!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.