घराबाहेर पडताना जातो असे म्हणू नये तर येतो असे म्हणावे. प्रतीकात्मक अर्थाने जाणे म्हणजे अंधार तर येणे म्हणजे प्रकाश. गेल्या वर्षी या सदरातून आपला निरोप घेताना येतो नमस्कार असे म्हटले होते, आणि खरोखरच आता पुन्हा एकदा त्या वाटेने आपल्यापर्यंत पोहोचण्याची संधी मिळत आहे.माणूस हा मुळात प्रकाशपूजक. त्याच्या जीवनात अंधाराला स्थान नाही. नकारात्मक विचार करणे तो टाळतो. निराशा, वैफल्य, पराभव यापेक्षा आशा, उमेद, नवनवी आव्हाने यांना सामोरे जाण्यात त्याला पुरु षार्थ वाटतो.माणसाचं वय कितीही झालं, तो कितीही दु:खी असला, आजारी असला तरी त्याला जगावंसं वाटतं. रात्री झोपताना तो दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयाचेच स्वप्न पाहात असतो. पुन्हा नवी पहाट होईल, फुले फुलतील, पक्षी किलबिलाट करतील, पुन्हा कडक चहाची तल्लफ येईल, पुन्हा एकदा नव्या जोमाने नवीन दिवसाला भिडावे लागेल असेच विचार त्याच्या मनात येत असतात.अजून येतो वास फुलांनाअजून माती लाल चमकते,खुरट्या बुंध्यावरी चढोनीअजून बकरी पाला खाते...ही मर्ढेकरांची प्रसिद्ध कविता. जीवनाच्या उत्सवाची पालवी माणसाच्या मनातील मोहाच्या बकरीला सतत साद घालत राहते आणि माणूसही मग त्या सादेला प्रतिसाद देत राहतो. जीवन जोवर आभरभरुन देत आहे तोवर आपण त्याचा आस्वाद घेतला पाहिजे, प्रत्येक क्षणाचा आनंद लुटला पाहिजे, पुन्हा नव्या कामासाठी स्वत: ला वाहून घेतले पाहिजे असे त्याला वाटत राहते. ही ओढच पुन्हा एकदा मला तुमच्यापर्यंत घेऊन आली आहे.खरे तर लेखकाचे जीवन खूप कष्टाचे. तीव्र स्वरूपाचे बौद्धिक आणि मानसिक ताण सांभाळत रोज त्याला कष्टांचा नवा कातळ फोडावा लागतो. ते खोदकाम नेटाने आणि चवीने वाचकांसमोर ठेवावे लागते. आणि इतके करूनही त्याचे कौतुक होईल, त्याला मान मरातब, पैसा मिळेलच याची खात्री नाही. या क्षेत्रातही स्पर्धा प्रचंड. व्ही. एस. नायपॉल यांनी म्हटले आहे की, लेखकाच्या कीर्तीचे आयुष्य किती तर फक्त एक तासाचे. नव्या तासाला नवा लेखक जुन्याच्या छातीवर पाय देऊन उभा राहिलेला असतो. आणि तरीही पुन्हा एकदा मी तुमच्या समोर आलो आहे. कारण लोकमताचा नम्र स्वीकार, तुमचा प्रतिसाद. लेख प्रसिद्ध झाला की दिल्लीपासून गल्लीपर्यंत फोन सुरु व्हायचे. इमेल, एसएमएस, पत्रे यायची. सूचना, सल्ले, नवे विषय, कार्यक्रमाची निमंत्रणे सुरू व्हायची. चाहत्यांनी केलेले कौतुक हा लेखकाचा प्राणवायू. तो मिळाला की जगायला आणखी काय हवे ?-प्रल्हाद जाधव
लोभ असावा ही विनंती
By admin | Published: July 01, 2016 4:55 AM