- कौमुदी गोडबोलेमाणसाच्या जीवनात अनेक घटना घडत असतात. घटनांचा परिणाम जीवनावर होतो. एखादी घटना जीवनाला कलाटणी देणारी ठरते. त्यामुळे जीवनाची दिशा बदलून जाते. अयोग्य दिशेकडून सुयोग्य दिशेला वाटचाल प्रारंभ होते. नास्तिक माणूस आस्तिक होतो. भगवंतावर पूर्ण श्रद्धा ठेवून सेवा करू लागतो. असा उत्तम बदल झाला की समाजातून विविध प्रतिक्रिया उमटतात. भगवंतांची सेवा निष्ठावंत भावानं करण्यात आनंदाची अमूल्य प्राप्ती होते. तो संप्रदायाच्या प्रथेप्रमाणे, परंपरेप्रमाणे कार्य करू लागतो. शिस्त, कौशल्य आणि सेवाभाव याचा सुरेख मेळ त्याच्या कार्यामध्ये दिसून येतो.माणूस अशा महत्त्वपूर्ण बदलामुळे समाजाला घडवण्यास सामोरा येतो. कर्तृत्व भावामुळे दु:ख भोगणारा आपले कर्तृत्व भगवंताला देऊ लागतो. कर्तेपण स्वत:कडे न घेता भगवंताकडे दिलं की कोणताच त्रास होत नाही. यश, अपयशाची काळजी उरत नाही. म्हणजे कर्म करत रहायची पण फळाची अभिलाषा बाळगायची नाही. अशा सेवाभावामुळे तो सदैव समाधानात राहतो. संत तुकाराम महाराजांच्या गाथेमधील ‘‘ठेविले अनंते तैसेची राहावे। चित्ती असू द्यावे समाधान!’’ या अभंगाचा आशय जीवनात अनुभवता येतो. स्तुती- निंदा, मान अपमान याचा सहज स्वीकार करण्याच्या मनोभूमिकेमुळे मन हिंदकळत नाही.समाधान मनात पूर्णपणानं झिरपत गेलं की त्याचा झरा कधीच आटत नाही. सामाजिक, नैसर्गिक, शारीरिक, आर्थिक संकटं आली तर खचून न जाता सदैव सेवेत राहतो. भगवंत संतांची परीक्षा घेतो मग इतरांचं काय? त्याच्या परीक्षेचा पेपर अज्ञात असतो. जे प्रश्न समोर येतील त्याची उत्तरं लिहीत जायची. उत्तरं अचूक देण्याचा प्रयत्न करायचा. पास- नापासाचा विचार करायचा नाही. किती टक्के गुण मिळतील माहीत नाही. परीक्षा देणं, पेपर सोडवणं माणसाच्या हातात असतं. निकाल भगवंताच्या हातात असतो.निष्काम भावानं कर्म करणारा परमात्म्याला, भगवंताला प्रिय असतो. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला सर्वश्रेष्ठ ‘निष्काम कर्म योग’ सांगितला. जो फळाची अभिलाषा न बाळगता कर्म करतो ना त्याची कर्म मलाच येऊन मिळतात, असं श्रीकृष्ण म्हणतात. असा भक्त सर्वश्रेष्ठ ठरतो. त्याची जन्ममृत्यूच्या फेºयामधून सुटका होऊ शकते. वासनांचा क्षय होऊन कर्म करून, फळाची इच्छा न करता जीवन जगणारा भगवान श्रीकृष्णाशी एकरूप होऊन जातो. सामान्य माणूस निष्ठावंत आणि निष्काम भावामुळे असामान्य कार्य करू शकतो. ती ताकद त्याच्या या श्रेष्ठतम् भावात सामावलेली असते.जीवनाला कलाटणी देणारा प्रसंग येणं आणि त्याला सकारात्मक ऊर्जेनं सामोरं जाणारा माणूस असामान्य होऊन जातो. सामान्य माणसाकडून असामान्यांपर्यंतचा प्रवास लक्षावधी ठरतो. तो अशक्य असणारं कार्य शक्य करून टाकतो. अशा माणसांच्या जीवनाचा अभ्यास करून प्रतिकूलतेला अनुकूल करणारी व्यक्ती ‘आदर्श’ ठरते.
समाधानाचा झरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 12:32 AM