शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

इन्फोसिस हा माझा दुसरा प्रयत्न, पहिल्या कंपनीत अपयश आले; नारायणमूर्तींनी सांगितला पुण्याच्या रस्त्यांवरचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 7:53 AM

उत्तम कामगिरीतून आदर, आदरातून ओळख, त्यातून प्रतिष्ठा, शक्ती असाच प्रवास असतो. जे व्यावसायिक कंपनीबाबत खरे, तेच देशाबाबतही खरे आहे!

एन. आर. नारायणमूर्ती , चेअरमन एमिरटस, इन्फोसिस

पुणे या शहराला माझ्या आयुष्यात फार महत्त्वाचे स्थान आहे. या शहरात मी माझे तारुण्य जगलो. स्वप्ने पाहिली. पुढे जी माझी पत्नी झाली ती बुद्धिमान, हुशार तरुणी मला पुण्यातच भेटली. याच शहराच्या रस्त्यांवरून आम्ही स्वप्ने पाहत भटकलो. उद्योजक होण्याच्या माझ्या स्वप्नांना धुमारे फुटले तेही याच शहरात. कंपनी सुरू करण्याचा पहिला प्रयत्न असफल झाला, कारण माझी ‘बिझिनेस आयडिया’ बाजारात विकली जाण्यायोग्य नव्हती! पुढे मुंबईत असताना केलेला दुसरा  प्रयत्न - इन्फोसिस- मात्र कल्पनेपलीकडे यशस्वी झाला. 

आयुष्यात मी एक महत्त्वाचा धडा शिकलो : प्रत्येक कंपनीला समाजातल्या सर्व संबंधित घटकांचा आदर कमावता आला पाहिजे, हा तो धडा! प्रामाणिक राहून ग्राहकांचा विश्वास मिळवायचा, तर त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त काहीतरी  द्यावे लागते; आणि मग हळूहळू उद्योगाला बरकत येते. कंपनीने सामाजिक प्रतिष्ठा कमावली तर गुणवान कर्मचारी आपोआपच तुमच्याकडे येतात. गुंतवणूकदारांच्या मनात तुमच्याबद्दल आदर निर्माण झाला तर दीर्घकालीन गुंतवणूकदार मिळतात. अंतिमत: समाजात तुमच्या कंपनीने कमावलेल्या स्थानाचा उपयोग सरकार दरबारीही होतोच! सरकारी यंत्रणा तुमच्याशी आदराने वागते, तुम्ही भ्रष्टाचाराचे बळी ठरण्याच्या शक्यता अत्यंत कमी होतात. उत्तम कामगिरीतून आदर, आदरातून ओळख, ओळखीतून प्रतिष्ठा आणि त्यातून शक्ती असाच हा प्रवास असतो. असला पाहिजे.जे कंपनीबाबत, तेच देशाबाबतही खरे आहे.

आपला देश हळूहळू एक आर्थिक शक्ती म्हणून उदयास येत आहे. पण अंतिमत: भारत आर्थिकदृष्ट्या बलवान व्हावा, असे वाटत असेल तर प्रत्येक भारतीयाने प्रामाणिकपणे, शिस्त पाळून तत्परतेने अपार मेहनत करण्याला पर्याय नाही. माझी कंपनी आज १७ महापद्म डॉलर्सची आहे. पण तरीही मी अत्यंत विनम्रपणे वागतो, हे कसे? - असा प्रश्न लोक विचारतात. हा प्रश्न ऐकला की ब्रिटनचे माजी पंतप्रधान क्लिमंट ॲटली यांच्याबद्दल चर्चिल जे म्हणाले होते ते मला आठवते. ‘ॲटली अत्यंत विनम्र आहेत’ असे कुणीतरी त्यांना म्हटले तेव्हा चर्चिल पटकन म्हणाले, असलेच पाहिजे! त्याने विनम्र  असले पाहिजे  अशा पुष्कळच गोष्टी आहेत.’  

- खरे सांगतो. माझ्यापेक्षा हुशार असे पुष्कळ लोक आयुष्यात भेटले आहेत. मी धडपडत होतो त्याच काळात कित्येकांनी नव्या कंपन्या सुरू केल्या. ७ जुलै १९८१ रोजी इन्फोसिसची स्थापना झाली. पण तीच एकमेव टिकली, मोठी झाली.. मला व्यक्तिश: असे वाटते की, ही देवाची कृपा होय... कारण आम्हाला संधी मिळाली. लुई पाश्चरने असे म्हटले आहे की, देवाला त्याचे अस्तित्व दाखवायचे असते तेंव्हा तो तुम्हाला संधी देतो. योग्य वेळी योग्य ठिकाणी डोळे उघडे ठेवून मी संधी शोधली आणि देवदयेने यशस्वी झालो. अर्थात आम्ही सांघिकपणे खूपच मेहनत केली, नवनव्या कल्पना राबवल्या, त्यातून आज तुम्हाला दिसणारी इन्फोसिस कंपनी साकार झाली, हे खरे आहे. पण आमच्या यशात नशिबाचा वाटा मोठा आहे हेही खरेच! आम्हाला नशिबाने यश मिळाले म्हटल्यावर विनम्रता येणारच.

तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि त्याचबरोबर विशिष्ट जीवनमूल्यांवर निष्ठा असणाऱ्या तरुण-तरुणींना आम्ही इन्फोसिससाठी निवडले. या सगळ्यांनी मिळून कंपनीची सांघिक मूल्यनिष्ठा घडवली.  मी निवृत्त होईपर्यंत कंपनीचे घोषवाक्य ‘पॉवर्ड बाय इंटलेक्ट अँड ड्रिव्हन  बाय व्हॅल्यूज’ असे होते. मूल्यांवर विश्वास असलेले चांगल्या क्षमतेचे कर्मचारी हवे असतील तर व्यक्तीबद्दल आदर महत्त्वाचा मानला पाहिजे! आम्ही इन्फोसिसमध्ये असे वातावरण निर्माण केले की कार्यालयामध्ये येणे ही आनंददायी गोष्ट होईल. विस्तीर्ण लॉन्स, टेनिस कोर्ट, व्हॉलीबॉल कोर्ट, ग्रंथालय, उत्तम उपाहारगृह, बँक, एटीएम अशा सुविधा दिल्या. पण या छोट्या गोष्टी झाल्या. त्या अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या तेव्हाही देतच असत. आम्ही कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक पाऊल पुढे टाकले ते कंपनीचे समभाग स्वीकारण्याचा पर्याय देऊन! त्यांनी कंपनीला दिलेल्या योगदानाचे ते बक्षीस होते. देशात पहिल्यांदा आम्ही कामाच्या खुल्या मूल्यमापनाची पद्धत सुरू केली. त्यातून कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढला.

काही कंपन्यांमध्ये उच्चपदस्थ आपल्या पोळीवर तूप ओढून घेण्यात मग्न असतात. कंपनीच्या खर्चाने मौजमजा करतात. सुरक्षा रक्षकांना अधिकचा मोबदला न देता सुटीच्या दिवशी राबवायचे आणि त्याच कंपनीच्या सीईओला ५० कोटी पगाराच्या ५५ टक्के वाढ द्यायची हे कायदेशीर असले तरी अनैतिक आहे, असे मी मानतो. नफा वाढवून दाखवायचा, आपल्याच कंपनीचे समभाग वाढलेल्या दराने खरेदी करायचे अशा कॉर्पोरेट गव्हर्नन्समधील अनेक प्रथा बेकायदा नसतील पण, अनैतिक मात्र असतात. आम्ही त्यापासून दूर राहिलो. मी एक दशांश वेतन घेतले आणि सहकाऱ्यांना मात्र २० टक्के वाढ दिली. कंपनीचे तिमाही लेखापरीक्षण स्वतःहून जाहीर करण्याची पद्धत आम्ही सुरू केली. सेबीने नंतर ती सर्वांना बंधनकारक केली. यशस्वी उद्योजक होण्याचे काही थोडेच मापदंड आहेत. पण यशाची खात्री मात्र नसते, कारण परिश्रमांबरोबर देवाची कृपाही लागते, हे खरे! यापूर्वी कोणालाही न सुचलेली, बाजारपेठेत जिच्यासाठी ग्राहक तयार आहे, अशी कल्पना घेऊन तिला व्यवसायाचे रूप देणे  फार थोड्यांना जमते. बाजारपेठेचे खात्रीशीर, दर्जेदार संशोधन करणारी एकही कंपनी भारतामध्ये आज नाही, ही मोठी उणीव आहे. त्यामुळे विविध युनिकॉर्नच्या उद्गात्यांना कमअस्सल दर्जाची माहिती मिळून त्यांचे गणित बिघडते! - हे बदलले पाहिजे!! 

(सिंबायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीतर्फे आयोजित ‘फेस्टिवल ऑफ थिंकर्स’ या विशेष व्याख्यानमालेत व्यक्त केलेल्या मनोगताचा संक्षिप्त संपादित  अनुवाद)

टॅग्स :Infosysइन्फोसिस