सुप्रसिद्ध समाजसेवक व थोर मानवतावादी बाबा आमटे यांचे सन २०१४ हे जन्मशताब्दी वर्ष होय. त्यांनी स्थापलेल्या अनेक प्रकल्पांपैकी एक महत्त्वाचा म्हणजे ‘सोमनाथ प्रकल्प’ होय. या प्रकल्पाचा इतिहास, प्रकल्पाविषयी ही सविस्तर माहिती .बाबा आमटे यांच्याशी माझा संबंध जून १९६५ पासून मार्च १९९० पर्यंत म्हणजे २५ वर्षे होता. महाविद्यालयात शिकताना आनंदवनात मी त्यांचे घरीच राहायचो. नंतरची २० वर्षे त्यांच्या घराशेजारीच काही कार्यकर्त्यांसोबत, सहकुटुंब राहायचो. कॉलेजला प्राध्यापक म्हणून नोकरीस होतो. तरी पुष्कळसा वेळ आनंदवनात व इतर प्रकल्पांचे काही काम, पत्रव्यवहार बघायचो. त्यामुळे त्यांची मुले डॉ. विकास व प्रकाश आमटे, त्यांचे वर्गमित्र नारायणराव हक्के यांच्यासोबतच राहून मी वाढलो व घडलो.बाबा प्रचंड धाडसी, जिद्दी व विविध सामाजिक प्रयोग कृतीत उतरवणारे होते. सुरुवातीस १९४९ मध्ये कुष्ठरोगीबांधवांच्या उपचार प्रशिक्षण व पुनर्वसनाकरिता वरोरा येथील काही मित्रांसोबत ‘महारोगी सेवा समिती वरोरा’ ही संस्था स्थापून १९५१ मध्ये आनंदवन सुरू केले. अपंग कुष्ठरोगीबांधवांना त्यांचे दु:ख विसरून ‘श्रमही श्रीराम हमारा’ म्हणून त्यांचा आत्मविश्वास वाढवून त्यांना स्वाभिमानी व स्वावलंबी बनविले. नंतर ६-७ वर्षांनी नागपूरजवळ अशोकवन प्रकल्प सुरू केला. २-३ वर्षांनी आनंदवनात विज्ञान, कला, वाणिज्य व कृषी महाविद्यालय सुरू केले. अंध विद्यालय, संधिनिकेतन प्रकल्प, त्यात विविध प्रकारचे प्रशिक्षण अपंगांकरिता सुरू केलेत. आज ‘आनंदवन-अपंगांचे एक आदर्श गाव’ म्हणून जगात प्रसिद्ध झाले आहे.युवकांना कृषी, कृषी औद्योगिक (मशिन दुरुस्ती, गो-पालन, सुधारित कृषी तंत्रज्ञान, पाणी व्यवस्थापन इत्यादी) क्षेत्रात त्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण (प्रॅक्टिकल ट्रेनिंग) द्यावे, प्रशिक्षित भूमिसेना तयार करावी, त्यांनी त्यांच्या गावात परतल्यावर त्या अनुभवाचा वापर करून इतरांना शिकवावे, या हेतूने ‘श्रमिक कार्यकर्ता विद्यापीठ’ (वर्कर्स युनिव्हर्सिटी) स्थापन करण्यासाठी शासनाकडे योजना सादर केली. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने संस्थेला, झुडपी जंगल असलेली दोन हजार एकर जमीन, चंद्रपूर जिल्ह्यातील मूल-मारोडा गावाजवळील सोमनाथ येथे दिली व मार्च १९६७ मध्ये हा प्रकल्प सुरू झाला. बाबांसोबत त्यांचे ज्येष्ठ सहकारी शंकरदादा जुमडे व किसन पाल, नाना भुसारी इत्यादी अपंग बंधू होते. त्यांनी जंगलातच बांबूच्या तट्ट्याच्या झोपड्या उभारल्यात, विहीर खोदली, जंगल तोडून जाळून जमीन शेतीयोग्य करणे सुरू झाले. उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये विकास, प्रकाश आमटे, बच्चाराम, अवी पटवर्धन वगैरे आम्ही तिथेच असू.सानेगुरुजी यांच्या आंतरभारती या कल्पनेवर आधारित ‘श्रमसंस्कार छावणी’ दर वर्षी उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये दि. १५ ते २५ मे अशा दहा दिवसांची, वय १४ वर्षांवरील युवक-युवतींसाठी १९६८ पासून होत आहे. सुरुवातीची १०-१२ वर्षे शिबिरार्थी म्हणून व नंतरची १०-१२ वर्षे या शिबिराचा संयोजक व्यवस्थापक म्हणून कार्य करता आले, याचा आनंद आहे. अगदी सुरुवातीच्या काळातील शिबिरांसाठी बाबांचे मित्र पुण्याचे यदुनाथ थत्ते, चंद्रकांत शहा, शामराव पटवर्धन, मोहन धारिया, धुळ्याचे प्रा. मु. ब. शहा, निफाडचे परिट गुरुजी, दिल्लीचे सुब्बाराव, नांदेडचे नरहर कुरुंदकर, मुंबईचे न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, सदानंद वर्दे, वणीचे प्राचार्य राम शेवाळकर इत्यादी अनेक थोर मंडळी शिबिरार्थ्यांना मार्गदर्शन करीत. एकदा तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजसुद्धा आले होते!शिबिराची सुरुवात मामा क्षीरसागर यांच्या व ‘उठी उठी गोपाळा’ या गीताने होई. चहा घेऊन सर्व जण सकाळी ५ वाजता हातात फावडी, घमेली घेऊन श्रमकार्याला निघत. शेकडो मुला-मुलींचा उत्साह पाहून ते एखाद्या युद्धावर निघाल्यासारखे वाटायचे! विश्रांतीनंतर दुपारी ३ वाजता बौद्धिक कार्यक्रम सुरू होई. त्यात थोर व्यक्तींची भाषणे, परिसंवाद, शिबिरार्थ्यांची गटचर्चा होई. याप्रसंगी बाबा हे सर्वांचे आकर्षण असायचे.सायंकाळी चहा झाल्यावर हरिभाऊ बारपुते खेळ घेत. रात्री भोजन झाल्यावर शिबिरार्थ्यांचा विविध मनोरंजनाचा कार्यक्रम होई. कडक उन्हाळ्याच्या दिवसातसुद्धा हे दहा दिवस कसे संपले, हे कळत नव्हते! बाबांनी १९७३ मध्ये आदिवासी भागात सुरू केलेल्या लोकबिरादरी प्रकल्पातील जगन, गोविंद हे माजी शिबिरार्थीच होत.मुंबईचे मधुभाई पंडित पुष्कळ वर्षे या प्रकल्पावर बाबांचे सहकारी म्हणून राहायचे. शालेय विद्यार्थ्यांकरिता दिवाळीच्या सुट्यांमध्ये ‘पाथेय छावण्या’ त्यांनी इथे घेतल्यात. चंद्रपूरच्या वनराजीक महाविद्यालयाच्या प्राचार्य केळकरांनी विविध वृक्षरोपणांची प्रशिक्षण शिबिरे घेतलीत.१९८४ मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या त्यांच्याच अंगरक्षकाने केली. पंजाब, आसाम, दक्षिण भारत येथे अशांतता, हिंसाचार, अतिरेक सुरू होता, प्रांतवाद, भाषावाद वाढला होता हे पाहून बाबा अस्वस्थ झाले होते. तरुण पिढीवर त्यांचा विश्वास होता. देशाची विस्कटलेली घडी तरुणच व्यवस्थित करू शकतील, राष्ट्रीय एकात्मतेसाठी राष्ट्रविकासासाठी त्यांचीच भूमिका महत्त्वाची आहे, असे त्यांना वाटे. त्यासाठी एक देशव्यापी सायकल युवा यात्रा ‘भारत जोडो’ काढायचे ठरले. १९८५ मध्ये कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत व नंतर पूर्वेकडील अरुणाचलमधील इटानगर ते गुजरातेतील ओखापर्यंत अशा दोन ‘भारत जोडो अभियान-सायकल यात्रा’ काढण्यात आल्यात. त्यांचे नियोजन याच श्रमसंस्कार छावणीत झाले.१९९० मध्ये बाबा ‘नर्मदा बचाव’ आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मध्य प्रदेशातील ‘कासराव’ येथे गेलेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे १९९७ मध्ये परत आलेत. पण, त्यांचे राहणे सहसा आनंदवनातच असे. तेव्हापासून डॉ. विकास आमटे यांनी या प्रकल्पाची धुरा यशस्वीरीत्या सांभाळली आहे. बाबांच्या निधनानंतरसुद्धा हे कार्य व्यवस्थित सुरू आहे.२०१४ हे बाबांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्त या महामानवाला साष्टांग दंडवत!प्रा. विनायक तराळेबाबा आमटे यांचे सहकारी
सोमनाथ प्रकल्प : एक श्रमिक विद्यापीठ
By admin | Published: December 30, 2014 11:16 PM