संपादकीय : काँग्रेसमध्ये पुनश्च सोनिया गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 05:51 AM2019-08-12T05:51:09+5:302019-08-12T05:55:38+5:30

सोनिया गांधी या व्यक्ती नसून संस्था आहेत. गेल्या शंभर वर्षांच्या राष्ट्रीय परंपरेच्या त्या प्रतिनिधी आहेत. मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची पुण्याई व कार्य त्यांच्या पाठीशी आहे.

Sonia Gandhi again in Congress | संपादकीय : काँग्रेसमध्ये पुनश्च सोनिया गांधी

संपादकीय : काँग्रेसमध्ये पुनश्च सोनिया गांधी

Next

काँग्रेस पक्ष जेव्हा संकटात येतो तेव्हा त्याला सोनिया गांधींच्या उत्तुंग नेतृत्वाची आठवण होते. १९९० च्या दशकात त्या पक्षाच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली आणि पुढे पी.व्ही. नरसिंहरावांचे सरकार १९९९ मध्ये पराभूत झाले, त्या वेळी त्या पक्षातील ज्येष्ठ नेत्याने सोनिया गांधींना आपले नेतृत्व करण्याची गळ घातली. त्यांची विनंती मान्य करून त्या पक्षाध्यक्ष झाल्या व अवघ्या पाच वर्षांत, २००४ मध्ये त्यांनी पक्षाला केंद्रात सत्तेवर आणले. त्या वेळी लोकसभेतील बहुमताने त्यांना दिलेले पंतप्रधानपद जेव्हा त्यांनी नाकारले तेव्हा त्यांच्या त्यागाचा महिमा देशाने व जगाने गायला. आता पुन्हा काँग्रेस पक्षाने त्यांना आपले ‘हंगामी अध्यक्षपद’ दिले आहे.

राहुल गांधींनी २०१९ च्या निवडणुकीतील पराभवाचे प्रायश्चित्त म्हणून पक्षाध्यक्षपद सोडले आणि त्यांच्या राजीनाम्यानंतर पक्षाला सर्वांना मान्य होईल असा नेता एक महिन्यात निवडता आला नाही. ज्यांची नावे पुढे आली त्यांना ना त्यांच्या राज्यात मान्यता होती ना त्यांना त्यांचा मतदारसंघ सांभाळता आला होता. या स्थितीत पक्षाने पुन्हा एकवार सोनिया गांधींना पक्षाचे नेतृत्व करण्याची विनंती केली व त्यांनी ते अवघड उत्तरदायित्व आता स्वीकारले आहे. पक्ष विस्कळीत आहे. त्याची केंद्रातील व अनेक राज्यांतील सत्ता गेली आहे. पक्षात वाद आणि भांडणे आहेत. मतभेदांनीही त्याला त्रस्त केले आहे. ही स्थिती एका मातृहृदयी नेतृत्वानेच सामोरे होऊन त्याला सांभाळण्याची व एकत्र राखण्याची गरज सांगणारी आहे. सोनिया गांधींचे नेतृत्व व व्यक्तिमत्त्व निर्विवाद व निष्कलंक आहे. त्यांच्यावर कोणताही आरोप भाजपला करता आला नाही. त्यांना पक्षाएवढाच पक्षाबाहेरही मान आहे. शिवाय त्या देशाएवढ्याच विदेशातही परिचित व मान्यवर आहेत.


भांडणाऱ्या, निराश झालेल्या व भांबावलेल्या संघटनेला जशा नेतृत्वाची गरज असते तसे देण्याची क्षमता त्यांच्यात आहे. झालेच तर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांएवढ्याच त्या नव्या व कनिष्ठांनाही कमालीच्या आदरस्थानी आहेत. वय आणि पराभव यामुळे येणारी निराशा त्यांनाही आली असणार, परंतु याही स्थितीत पक्षाची गरज ओळखून व पक्षातील इतरांच्या मर्यादा लक्षात घेऊन त्यांनी हे काम स्वीकारले आहे. त्यांना सर्व राज्यांत जशी मान्यता आहे तशा सर्वच पक्षांतील नेत्यांना त्या आदर्शस्थानी वाटत आल्या आहेत. प्रसंगी आपल्याकडे लहानपण घेऊनही त्या पक्ष व सरकार यांची जबाबदारी पूर्ण करणा-या आहेत हा देशाचा अनुभव आहे. इतर पक्षातील व विशेषत: मित्रपक्षातील ज्येष्ठ नेत्यांना राहुल गांधींचे नेतृत्व आवडणारे असले तरी त्यांचे वय त्यांना द्यावयाच्या मान्यतेआड येणारे आहे असे मनातून वाटत आले. शरद पवार, फारूख अब्दुल्ला, लालूप्रसाद, चंद्राबाबू किंवा अगदी नितीशकुमार व नवीन पटनायक यांच्यापर्यंतच्या व ममता बॅनर्जींसारख्या आक्रमक नेत्यांचीही तीच अडचण होती. सोनिया गांधींच्या आगमनामुळे हा अडसर दूर होईल व त्यांच्यात पुन्हा एकवार चांगला संवाद सुरू होईल ही अपेक्षा आहे. सोनिया गांधी या व्यक्ती नसून संस्था आहेत. गेल्या शंभर वर्षांच्या राष्ट्रीय परंपरेच्या त्या प्रतिनिधी आहेत. मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची पुण्याई व कार्य त्यांच्या पाठीशी आहे. त्यांनी ज्यांना पंतप्रधानपदावर आणले त्या डॉ. मनमोहन सिंगांची दहा वर्षांची कारकिर्दही त्यांचे स्थान उंचावणारी आहे.

पक्षाध्यक्ष, संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष, एका महान परंपरेच्या प्रतिनिधी व पंतप्रधानपद नाकारणाºया नेत्या एवढा जबरदस्त वारसा पाठीशी असूनही त्या नम्र राहिल्या आहेत. विदेशात जन्म घेऊनही त्या कोणत्याही राष्ट्रीय महिलेएवढ्या राष्ट्रीय राहिल्या. त्यांचे नवे नेतृत्व काँग्रेसची मरगळ दूर करील व त्या पक्षाला पुन्हा एकवार लढाऊ पक्षाचे स्वरूप प्राप्त करून देतील ही अपेक्षा आहे. त्यांचा शब्द पक्षात कुणी खाली पडू देणार नाही आणि विरोधी पक्षातीलही कुणाला त्यांचा शब्द अव्हेरता येणार नाही. त्यामुळे पुन्हा एकवार ते पक्ष एकत्र येण्याची शक्यताही नाकारता येण्याजोगी नाही. सोनिया गांधींच्या नेतृत्वाला शुभेच्छा.

Web Title: Sonia Gandhi again in Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.