प्रभू चावला, ज्येष्ठ पत्रकार
आपल्या संसदेला दुहेरी तोफा नव्या नाहीत. आता प्रियांका गांधी वायनाडमधून लोकसभेत आल्यावर काँग्रेसपाशी तिहेरी तोफ सज्ज असेल. संसदीय इतिहासात प्रथमच सोनिया गांधी आणि त्यांच्या दोन उत्साही अपत्यांची त्रिमूर्ती काँग्रेसचे नेतृत्व करेल. मोदींच्या भाजपशी झुंज देण्याची भूमिका या त्रिमूर्तींकडे आली आहे.
सोनिया गांधी
व्यक्तिगत शोकांतिका आणि प्रदीर्घ राजकीय कारकीर्द यामुळे सोनियांनी आपले खास स्थान निर्माण केले आहे. मौन हेच त्यांचे प्रबळ अस्त्र असते. दैनंदिन राजकारणाच्या धबडघ्यात त्या पडत नाहीत. गेली २६ वर्षे राजकारणात कार्यरत आहेत. जोन ऑफ आर्कप्रमाणे भाजप आणि मोदी यांना त्या तोंड देत आल्या आहेत. इतर काँग्रेस नेत्यांप्रमाणे आघाडीतील परस्परहल्ल्यात सामील न होता, सर्व भाजपेतर पक्षांना एकत्र ठेवण्याची कामगिरी त्यांनी बजावली आहे. कुणावरही व्यक्तिगत चिखलफेक करणे सोनियांच्या स्वभावात बसत नाही. समतोल वृत्तीच्या संयमी नेत्या अशी सोनियाजींची ओळख आहे. २००४ साली सोनियांनी सर्व विरोधकांची मोट बांधून १६ पक्षांसह यूपीएची स्थापना केली. या आघाडीने तब्बल दहा वर्षे देश चालवला. नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून मात्र सोनियाजींनी केवळ साहाय्यकर्ती आणि समस्याहर्ती याच भूमिकेत राहायचे ठरवलेले दिसते.
मौन हे शस्त्र मानणारे नेते शीतल शांतिदूत असतात तसेच ते महान योद्धेही असतात. लोकसभेच्या गेल्या सत्रादरम्यानच्या एका स्वपक्षीय सभेत सोनियाजी गरजल्या, ‘गेले दशकभर लोकसभा दडपली जात होती तशी आता दडपली जाऊ शकत नाही, जाता कामा नये. आता सत्ताधीशांच्या आदेशानुसार लोकसभेत अडथळे आणू देता कामा नयेत. त्यांच्या मनमर्जीनुसार सदस्यांशी गैरवर्तन करू देता कामा नये. काळजीपूर्वक विचारविनिमय आणि युक्तिवाद झाल्याशिवाय विधेयके घाईघाईने मंजूर करू देता कामा नयेत. २०१४ नंतर नेहमीच संसदीय समित्यांना बगल देऊन विधायके मंजूर केली जात. पण यापुढे संसदेची मुस्कटदाबी आणि कोंडमारा करता येणार नाही, करू द्यायचा नाही.’ १९९८ साली राजकारणात पाऊल टाकताना सुरुवात तर त्यांनी मोठ्या धूमधडाक्याने केली होती. यापुढच्या काळात सोनियाजींचा कृतिशील सहभाग फारसा नजरेत भरणार नाही. परंतु, पक्षाच्या प्रतिपालक आणि आपल्या अपत्यांच्या मातोश्री या नात्याने त्यांचे अस्तित्व सर्वत्र जाणवत राहील.
पाच वेळा खासदार राहिलेल्या ५४ वर्षीय राहुल यांच्या मस्तकावर बरेच मुकुट आहेत. ते प्रमाणित स्कुबा ड्राइव्हर, काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष व अध्यक्ष आणि आता लोकसभेतील विरोधी पक्षनेता आहेत. अत्यंत पुरोगामी आर्थिक आणि सामाजिक प्रारूप ते भारतीय जनतेसमोर मांडू इच्छितात. गर्दीला चेतवण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे. जातीवर आधारित धोरण आणि व्यापर-उद्योगाच्या मक्तेदारीला आळा घालणे या दोन मुद्द्यांवर ते सातत्याने ठाम आहेत. दक्षिणेकडून उत्तरेकडे आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे असा सारा भारत पादाक्रांत करणाऱ्या दोन प्रचंड पदयात्रा काढणारे राहुल गांधी हे पहिलेच काँग्रेस नेते ठरले. त्यांनी अंबानी-अदानी जोडगोळीचे प्रतिपालन करत असल्याचा आरोप मोदी सरकारवर सातत्याने केला आहे. अमेरिकेतील राष्ट्रीय प्रेस क्लबमध्ये ते म्हणाले, ‘भारतातील २०० सर्वांत मोठे उद्योग चालविणाऱ्यांत देशातील ९०% लोकसंख्या असलेल्या समूहांमधील जवळपास एकही माणूस आढळत नाही.
उच्चस्तरावरील न्यायालयात या ९० टक्क्यांतील जवळपास कुणाचाच समावेश नाही. माध्यम क्षेत्रात निम्नस्तरीय जाती, ओबीसी, दलित यांचा सहभाग शून्य आहे.’ काँग्रेसच्या वेबसाइटवरचा मजकूर सांगतो : ‘सरकारांनी जनतेची सेवा केली पाहिजे आणि ती जनतेला जबाबदार असली पाहिजेत अशी राहुल गांधी यांची ठाम भूमिका आहे. संसाधनांच्या समन्यायी वाटपावर धोरणकर्त्यांचा भर असला पाहिजे. आपल्या धोरणांमुळे वाढती आर्थिक विषमता कमी करण्याला साहाय्य व्हावे. भारतातील शेतकरी, युवक, श्रमिक, स्त्रिया आणि वंचित समूहांच्या गरजा भागवून त्यांचे संरक्षण करावे.’ सध्या प्रामुख्याने राहुल यांच्या पसंतीचे, त्यांच्याच विचारांचे अनुयायी असलेली काँग्रेस घडविली जात आहे. विरोधी पक्षनेता म्हणून पंतप्रधानांकडे रोखलेली त्यांची प्रक्षोभक राजकीय टीका आक्रमक होत जाणार आहे.
प्रियांका गांधी
वायनाडच्या सुरक्षित मतदारसंघातून विजय मिळवून विपश्यनेची उपासक असलेल्या या ५२ वर्षीय लढाऊ स्त्रीने लोकसभेत पहिले पाऊल ठेवले आहे. आपल्या आईच्या राजकीय विवेकबुद्धीची राखणदार अशी प्रियांका गांधी यांची प्रतिमा आहे. हा पक्षाचा मृदू चेहरा असेल. आजवर प्रियांकांनी कोणत्याही एका गटाशी स्वतःला जोडून घेणे टाळलेले आहे. आपल्या भावाचा बचाव करताना आणि मोदींवर हल्ला करताना त्या अत्यंत धारदार आणि आक्रमक असतात. त्यामुळे मोदींवर राहुल चढवत असलेले हल्ले अधिक वरच्या पट्टीतून सर्वत्र पसरवणे हेच त्यांचे प्रमुख काम असेल.
गुजरातमधील एका मेळाव्यात त्या म्हणाल्या, ‘ते’ माझ्या भावाला शहजादा म्हणतात. हा शहजादा गाऱ्हाणी ऐकण्यासाठी कन्याकुमारी ते काश्मीर ४००० किमी चालत गेला. माझ्या भावा-बहिणींना, शेतकरी, कामकऱ्यांना भेटला. त्याने त्यांच्याकडून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, हे लक्षात घ्या!’प्रियांका गांधी यांना विरोधी बाजूच्या पहिल्या बाकावर कदाचित जागा मिळणार नाही; पण आपला भाऊ सदनात देत असलेला संदेश अधिक जोरदारपणे प्रतिध्वनित करणे हेच त्यांचे उद्दिष्ट असेल.