कणखर, निष्कलंक अन् संयमी नेत्या म्हणजे सोनिया गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 06:22 AM2021-12-09T06:22:10+5:302021-12-09T06:22:30+5:30

एककल्ली नेतृत्वाचा अनुभव देश आज घेत असतानाच्या पार्श्वभूमीवर सोनियाजींच्या सर्वसमावेशक, संयमी नेतृत्वाचे महत्त्व अधोरेखित होते.

Sonia Gandhi is a strong, immaculate and restrained leader | कणखर, निष्कलंक अन् संयमी नेत्या म्हणजे सोनिया गांधी

कणखर, निष्कलंक अन् संयमी नेत्या म्हणजे सोनिया गांधी

Next

विजय वडेट्टीवार 

मंत्री, मदत-पुनर्वसन-बहुजन कल्याण, महाराष्ट्र

काँग्रेसच्या अध्यक्ष, आमच्या सर्वांच्या आदरणीय नेत्या सोनिया गांधी यांचा आज पंच्याहत्तरावा वाढदिवस. काँग्रेस पक्षाचा एक पाईक म्हणून मी वाढदिवसानिमित्त त्यांचे अभीष्टचिंतन करतो. पती राजीवजी हे नृशंस हल्ल्यात शहीद झाल्यानंतर सोनियाजींनी कोट्यवधी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर पक्षाची सूत्रे हाती घेतली आणि अवघ्या पाच वर्षांत म्हणजे २००४ मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाला केंद्रात सत्तेमध्ये आणले. लोकसभेतील बहुमताने त्यांना दिलेले पंतप्रधानपद त्यांनी नाकारले तेव्हा त्यांच्या त्यागाचा महिमा देशाने व जगाने गायला होता. 

आज काँग्रेस पक्ष एका स्थित्यंतरातून जात आहे. देशात विचार स्वातंत्र्याची मुस्कटदाबी होत आहे. १३६ वर्षांची देदीप्यमान परंपरा असलेला काँग्रेस पक्षच देशात विचारस्वातंत्र्य, व्यक्तिस्वातंत्र्य आणू शकतो आणि संविधानाच्या चौकटीत देश चालविण्याची क्षमता फक्त काँग्रेसमध्येच आहे असा विश्वास लोकांना पुन्हा एकदा वाटू लागला आहे. काँग्रेसचे नेतृत्व सोनियाजी करीत आहेत. त्यांचे नेतृत्व व व्यक्तिमत्व  निर्विवादपणे निष्कलंक असे आहे. पतीच्या अकाली मृत्यूनंतर स्वत:चे व कुटुंबाचे दु:ख बाजूला ठेवून त्यांनी देशसेवेला प्राधान्य दिले यातच त्यांचे मोठेपण सामावलेले आहे. त्या सुखासीन आयुष्य जगू शकल्या असत्या पण त्यांनी ते नाकारले. त्यांच्यावर अत्यंत अनुचित शब्दात आणि रीतीने टीकाही केली गेली, पण त्या अश्लाघ्य टीकेला सोनियाजींनी कधीही उत्तर दिले नाही. ते त्यांच्या सुसंस्कृत स्वभावाला मानवणारेही नव्हते. जबाबदारीपासून मागे हटण्याची भूमिका त्यांनी कधीही घेतली नाही. काँग्रेस पक्षाचा महान इतिहास समोर ठेवून, वर्तमानाची पक्षाची व देशाची गरज लक्षात घेऊन त्यांनी काँग्रेसला सक्षम नेतृत्व दिले.

सोनियाजी काँग्रेसच्या अध्यक्ष आणि अत्यंत विद्वान असे डॉ. मनमोहन सिंग हे देशाचे पंतप्रधान अशी तब्बल दहा वर्षे पक्षसंघटना आणि सरकारमधील समन्वयातून अत्यंत  उत्तम चांगला कारभार देशाने अनुभवला. डॉ. मनमोहन सिंग यांच्या पदाचा सोनियाजींनी नेहमीच सन्मान राखला. सत्ता किंवा पक्षाची सूत्रे आपल्याकडे आहेत, याचा स्वाभाविक अहंकार ना कधी त्यांच्या वक्तव्यांमध्ये दिसला, ना कधी त्यांच्या वर्तनामध्ये! २००४ मध्ये तर त्यांनी काँग्रेसला सत्तेत आणलेच शिवाय २००९ मध्येही विजय संपादन केला. काँग्रेसला त्यावेळी लोकसभेच्या २०६ जागा मिळाल्या. १९९१ नंतर त्या वेळेपर्यंत कोणत्याही पक्षाने जिंकलेल्या त्या सर्वाधिक जागा होत्या.

संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार दोनवेळा केंद्रात आणताना मित्रपक्षांना अत्यंत सन्मानाची वागणूक मिळालीच पाहिजे असा त्यांचा आग्रह राहिला. २०१० मध्ये फोर्ब्स मासिकाने जाहीर केलेल्या यादीत जगातील नवव्या सर्वात शक्तिशाली व्यक्ती म्हणून सोनियाजींना स्थान देण्यात आले. २०१२ मध्येही त्या सदर यादीमध्ये  होत्या. २०१० मध्ये न्यू स्टेट्समन मासिकाने जगातील शक्तिशाली ५० व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश केला. गांधी-नेहरू घराण्याचा अलौकिक वारसा सोनियाजींना लाभलेला आहे. मोठेपण सांगता येईल अशा शेकडो गोष्टी त्यांच्या ठायी आहेत पण त्यांनी त्याचे भांडवल तर कधी केलेच नाही पण स्वभावातला नम्रभाव कधीही किंचितही कमी होऊ दिलेला नाही.

या देशाप्रती त्यांच्या मनात असलेला आदरभाव, कमालीची राष्ट्रनिष्ठा आणि तत्त्वांशी तडजोड न करण्याची वृत्ती यामुळे त्यांच्याबाबत कमालीची आदरभावना देशवासीयांच्या मनात आहे. त्यांच्या वागण्याबोलण्यात कधीही आक्रस्ताळेपणा येत नाही. एककल्ली प्रवृत्ती नेतृत्वाला हुकूमशहा बनविते आणि देश हुकूमशाहीकडे गतीने जातो. अशा नेतृत्वाचा अनुभव देश आज घेत असतानाच्या पार्श्वभूमीवर  सोनियाजींच्या सर्वसमावेशक, संयमी नेतृत्वाचे महत्त्व अधिकच अधोरेखित होते. गांधी-नेहरुजींच्या विचारांच्या त्या सच्च्या पाईक आहेत.

समाजातील विविध घटकांना न्याय देण्याची भूमिका काँग्रेसने सातत्याने घेतली. जात-पात, धर्म, पंथ असा कोणताही भेद न करता माणसाकडे माणूस म्हणून पाहण्याचा विचार काँग्रेसने या देशाला दिला. काँग्रेसने देशासाठी काय केले असा उथळ प्रश्न करून टीका करणाऱ्यांची बजबजपुरी आज दिसत आहे. काँग्रेसला घेरण्याचे, खच्ची करण्याचे प्रयत्न अधोगाम्यांकडून नेहमीच झाले, पण त्यातून तावूनसुलाखून निघत काँग्रेसने स्वत:ला नेहमीच सिद्ध केले. आज सोनियाजींच्या रुपाने दमदार नेतृत्व काँग्रेसला लाभलेले आहे. असंख्य वादळे झेलत त्या काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा नवसंजीवनी देत आहेत. अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाची वाटचाल तितक्याच दमदारपणे भविष्यातही होत राहील याबाबत शंकाच नाही.

Web Title: Sonia Gandhi is a strong, immaculate and restrained leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.