समविचारी पक्षांच्या ऐक्याची जबाबदारी सोनिया गांधींकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 12:29 AM2018-07-13T00:29:08+5:302018-07-13T00:29:21+5:30

समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्यात अडचणी येत असून, त्या दूर करण्यात राहुल गांधी यांना बराच वेळ लागत असल्याचे आढळून आल्यानंतर आघाडी करण्याची सूत्रे सोनिया गांधी या स्वत:कडे घेतील, अशी शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील घटना चिंताजनक आहे.

Sonia Gandhi will take responsible for Mahagathbandhan | समविचारी पक्षांच्या ऐक्याची जबाबदारी सोनिया गांधींकडे

समविचारी पक्षांच्या ऐक्याची जबाबदारी सोनिया गांधींकडे

Next

- हरीश गुप्ता
(‘लोकमत’ समूहाचे नॅशनल एडिटर)

समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्यात अडचणी येत असून, त्या दूर करण्यात राहुल गांधी यांना बराच वेळ लागत असल्याचे आढळून आल्यानंतर आघाडी करण्याची सूत्रे सोनिया गांधी या स्वत:कडे घेतील, अशी शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील घटना चिंताजनक आहे. बसपा नेत्या मायावती या चर्चा करण्यासाठी कोणत्याही काँग्रेस नेत्याला उपलब्ध होत नाहीत. तेव्हा २००४ सालची पुनरावृत्ती सोनिया गांधी करतील, अशी अपेक्षा आहे. मायावतींच्या घरी मोटारने जाण्याऐवजी त्यांनी आपल्या १० जनपथ या निवासस्थानापासून त्यांच्या घरी पायी जाणेच पसंत केले होते. त्यामुळे त्यावेळच्या लोकसभा निवडणुकांपूर्वी त्यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यानंतर त्या राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी मात्र मोटारने गेल्या होत्या. त्यांचे नेतृत्व अमान्य करीत शरद पवारांनी काँग्रेस पक्ष त्यावेळी सोडला होता. सोनिया गांधी यांनी यावेळी पुढाकार घेण्याचे कारण राहुल गांधी हे नवखे आहेत आणि अननुभवी आहेत. ममता बॅनर्जी यांनी त्यांचा उल्लेख ‘बच्चा’ असा अलीकडेच केला आहे. त्यामुळे अन्य पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधींसोबत बोलणी करण्यास उत्सुक नसतात. त्याऐवजी सोनिया गांधींसोबत ते मोकळेपणाने बोलू शकतात. उत्तर प्रदेशात काँग्रेसला ८ ते १० जागांपेक्षा अधिक जागा सोडण्याची मायावतींची तयारी नाही, ही बाब काँग्रेससाठी चिंताजनक ठरली आहे. बसपा हा उत्तर प्रदेशात ४० जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे, असे त्यांनी सपाचे नेते अखिलेश यादव यांना स्पष्टपणे सांगितले आहे. तेव्हा काँग्रेस आणि रालोदसाठी समाजवादी पक्षाने आपल्या कोट्यातून जागा द्याव्यात, असे त्यांना वाटते. पंतप्रधान पदावर दावा सांगण्यासाठी स्वत:कडे अधिक जागा असणे आवश्यक आहे, असे त्यांना वाटते. त्यादृष्टीने त्या काँग्रेसशी कठोरपणे वागत आहेत. शिवाय काँग्रेसने बसपासाठी पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, महाराष्टÑ आणि गुजरातमध्ये अधिक जागा सोडाव्यात, असेही त्यांना वाटते. तेव्हा याबाबतीत सोनिया गांधी याच लक्ष घालतील, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे सरचिटणीस अशोक गहलोत यांनी दिले आहे.
शत्रुघ्न सिन्हा, कीर्ती आझाद यांच्या जागा जदयुकडे
भाजपा आणि जनता दल (संयुक्त) यांच्यात बिहारमध्ये जागा वाटपाची जी चर्चा सुरू आहे त्यात शत्रुघ्न सिन्हा, कीर्ती आझाद यांच्याप्रमाणे भाजपाच्या आणखी एक-दोन असंतुष्ट खासदारांचा बळी दिल्या जाऊ शकतो. हे दोन्ही पक्ष लोकसभा निवडणूक एकत्रितपणे लढणार, हे आता पक्के झाले आहे. त्यामुळे आपापल्या पक्षातील डोकेदुखी दूर करण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांकडून केला जाईल, असे दिसते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या पक्षाला ४० पैकी १५ जागा मिळाव्यात, असे नितीशकुमार यांना वाटते आहे. पण त्यांना बहुधा १० जागांवरच समाधान मानावे लागेल, असे दिसते. शत्रुघ्न सिद्धा आणि कीर्ती आझाद यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यासाठी जदयुला पटणासाहिब आणि दरभंगा जागा दिल्या जातील. त्यासाठी अमित शाह हे नितीशकुमारांच्या खांद्यावर बंदूक ठेवतील, असे वाटते. पूर्णिया आणि नालंदा येथे जदयु विजयी झाले आहे. त्यामुळे काँग्रेस विजयी झालेली सुपॉलची जागा तसेच राजदची अरेरिया येथील जागा जदयुला मिळतील. तसेच राष्टÑवादीचे तारिक अन्वर जेथून जिंकले होते ती कटिहार ही जागासुद्धा जदयुला मिळू शकते. मधेपुरा येथे राजदकडून जदयुचा पराभव झाला होता. ती जागा बार्टरमध्ये मिळू शकते. आरएलएसपीच्या एका खासदाराने बंडखोेरी केल्यामुळे ती जागा त्या पक्षाकडून काढून घेतली जाऊ शकते.
भाऊबंदकीने लालूप्रसाद चिंतित
घरातील भाऊबंदकीमुळे लालूप्रसाद यादव सध्या चिंताग्रस्त आहेत. ते नुकतेच उपचारासाठी मुंबईला गेले होते. पण मोठा मुलगा तेजप्रताप यादव व दुसरा मुलगा तेजस्वी यांच्यातील भांडणामुळे त्यांना तातडीने पाटणा येथे जावे लागले. ५ जुलै रोजी त्यांच्यात भांडण झाले. त्यामुळे आधीच संकटात असलेल्या राजदमध्ये नवीन पेचप्रसंग निर्माण झाला आहे. महागठबंधनमध्ये प्रवेशाची दारे नितीशकुमार यांच्यासाठी बंद झाली आहेत, असे विधान तेजस्वीने करून मर्यादा ओलांडली आहे. पण लालूप्रसादांनी मुंबईहून दोन्ही मुलांशी फोनवर बोलणी करून त्यांना चुचकारले आणि आग शांत करण्यासाठी ते स्वत: तडक पाटण्यात पोहचले. नितीशकुमारांच्या सहकार्याशिवाय आपल्याला बिहारमध्ये मोठे यश मिळू शकणार नाही, याची जाणीव लालूप्रसादांना आहे. सध्या तरी भाजपा, जदयु, लोजप आणि आरएलएसपी यांची युती अभेद्य आहे. तेजप्रताप यादव यांची पत्नी ऐश्वर्या राय ही राजकीय कुटुंबातून आलेली असल्याने तिच्याही राजकीय आकांक्षा आहेत. तिच्या कुटुंबातील माणसे आगीत तेल ओतण्याचे काम करीत असल्याने तिने सध्या तरी प्रकाशझोतात राहू नये, असे लालूप्रसाद यादव यांना वाटते. पाटणा येथील मुक्कामात नितीशकुमार यांच्याशी फोनद्वारे ते बोलण्याची शक्यता आहे.
जेटली यांच्या भेटीगाठी
चित्रपट तारेतारकांच्या भेटीस जाणाऱ्या चाहत्यांप्रमाणे जेटलींच्या भेटीस येणाºया त्यांच्या चाहत्यांना भेटण्यासाठी जेटली यांनी वेगळा मार्ग शोधला आहे. १४ मे रोजी एआयआयएमएस येथे त्यांच्यावर किडनी ट्रान्सप्लान्टची शस्त्रक्रिया झाल्यावर गेल्या महिन्यात त्यांना हॉस्पिटलमधून घरी पाठवण्यात आले. सध्या ते आपल्या २-ए कृष्ण मेनन मार्ग येथील निवासस्थानी विश्रांती घेत आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी २४ तास डॉक्टर्स असतात; कारण त्यांना इन्फेक्शन होऊ नये याची काळजी घेण्यात येत आहे. त्यांच्या खोलीत कुणालाही प्रवेश देण्यात येत नाही. पण शस्त्रक्रियेनंतर त्यांच्यात वेगाने सुधारणा झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्या हालचालींवरील निर्बंध कमी केले आहेत. वेळ जाण्यासाठी ते दररोज ब्लॉग लिहित असतात, टीव्ही बघत असतात. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अधिकाºयांच्या संपर्कात असतात. याच माध्यमातून आपल्या चाहत्यांशी स्वत:च्या निवासस्थानी बोलता येईल, अशी त्यांनी व्यवस्था केली आहे. त्यामुळे दररोज १०-१२ लोकांशी त्यांना बोलता येते. पण त्यांना भेटायला येणाºयांची गर्दी वाढल्याने त्यांचे मुखदर्शन घेणे शक्य होईल अशा तºहेच्या काचेच्या खिडकीसमोर बसण्याची त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे दर्शकांना ते बघू शकतात तसेच हात हलवून ते निरोप घेऊ शकतात. अरुण जेटली हे राज्यसभेचे नेते असल्यामुळे त्यांना राज्यसभेत काय सुरू आहे, हे पाहता यावे यासाठी राज्यसभेतील त्यांच्या कक्षातसुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. नॉर्थ ब्लॉकमधील स्वत:च्या कार्यालयात ते जुलै अखेरपर्यंत येण्याची शक्यता आहे.

Web Title: Sonia Gandhi will take responsible for Mahagathbandhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.