- वसंत भोसले -
सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांचा भाग एक विकासाचा उत्तम कॉरिडॉर होऊ शकतो. यासाठी दक्षिण महाराष्ट्रातील सहा खासदारांनी एकत्र येऊन अजेंडा तयार करावा. या भागाला कशाची कमतरता नाही. कमतरता आहेती व्हिजन असलेल्या राजकीय नेतृत्वाची ! यासाठीच साऊथ महाराष्ट्र डेव्हलपमेंट कॉरिडॉर स्थापन करण्याचा आग्रह आपण धरला पाहिजे. अन्यथा, तरुण पिढी पुणे, बंगलोर, हैदराबाद मार्गे युरोप आणि अमेरिकेत चाकऱ्या करण्यासाठी जातील आणि आपण वृद्धाश्रमच काढत बसू !महाबळेश्वरला उगम पावलेल्या कृष्णा नदीच्या प्रेरणेतून कृष्णा खोºयातील प्रदेशाचा विकास झाला आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांचा हा भाग एक विकासाचा उत्तम कॉरिडॉर होऊ शकतो. यासाठी नव्याने निवडून आलेल्या खासदारांनी एकत्र येऊन दक्षिण महाराष्ट्राच्या विकासाचे आणि रेंगाळलेल्या प्रश्नांचे प्रारूप तयार करावे. यासाठी एका व्यासपीठावर येण्यासाठी साऊथ महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स अॅण्ड डेव्हलपमेंटसारखी संस्था स्थापन करावी. पूर्वीचा काळ राहिलेला नाही. केंद्र असो की राज्य सरकार किंवा खासगी क्षेत्रे त्यांच्याकडून विविध योजनांद्वारे निधी उभा राहू शकतो. या परिसरातील धनिक, उद्योजक, शेतकरी वर्ग, कारखानदार आणि नवी सुशिक्षित पिढी पुढे आल्याशिवाय राहणार नाही. मात्र, हे करण्यासाठी नवा दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे. लोकांनीही त्याचा आग्रह धरल्याशिवाय काही होणार नाही. नव्या दमाचे खासदार निवडून आले आणि लग्न, मयती, वाढदिवस आणि किरकोळ उद्घाटनाच्या कार्यक्रमांना हजेरी लावत पाच वर्षे निघून जायची.
दक्षिण महाराष्ट्राचा कॉरिडॉर असे जेव्हा मी म्हणतो, तेव्हा हा परिसर डोळ्यासमोर आणून पहा. सातारा-पुणे जिल्ह्यांची सीमा ही नीरा नदी आहे. ती भीमेला जाऊन मिळते. साताºयाच्या पलीकडच्या म्हणजे पुणे आणि पुणे जिल्ह्याचा विचार पश्चिम महाराष्ट्र म्हणून करण्याची गरज नाही. पुणे परिसर हा शैक्षणिक हब, आॅटोमोबाईल हब, पुरंदरचे आंतरराष्ट्रीय विमानतळ, पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरी, आयटी नगरी, आदी झालीच आहे. पुण्याचा रंगही आता कॉस्मोपॉलिटीन झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्हा वगळूनचा भाग आहे तो अविकसित राहिला आहे. त्याला अविकसित याच्यासाठी म्हणायचे की, १९९१ च्या आर्थिक उदारीकरणानंतर जी स्थित्यंतरे झाली, त्यातून सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापुरात काही घडले नाही. वास्तविक, पुण्याबरोबर या भागालाही संधी होती. ऐतिहासिक पार्श्वभूमी, हवामान, नैसर्गिक साधन संपत्ती, उत्तम शेती, सहकारी चळवळीचे बळ, पर्यटनासाठी पर्यायी संधी, कोयना, चांदोली आणि दाजीपूरची मोठी अभयारण्ये, महाबळेश्वर, पाचगणी, गगनबावडा, आंबोली, तिलारी आणि आंबासारखी निसर्गरम्य केंद्रे आहेत.
कोयना, चांदोली, काळम्मावाडीसारख्या जवळपास दोन डझन धरणांचे पाणलोट क्षेत्र. निसर्गाची ओंजळच भरून वाहते आहे. सोबतीला कोकण आणि कोकणची किनारपट्टी आहे. या कोकणात जाण्यासाठी एक-दोन नव्हे, नऊ घाट रस्ते आहेत. मिरजेला मध्यवर्ती आणि सोलापूरला दक्षिणेला जोडणारी दोन रेल्वे जंक्शन्स आहेत. कर्नाटक आणि गोवा ही पर्यटनाची आकर्षणे शेजारीच आहेत.सहकाराच्या माध्यमातून साखर कारखानदारी, बँकिंग, सूतगिरण्या, पतपुरवठा संस्था, पाणी उपसा योजना यांचे जाळे आहे. प्रत्येक नदीवर धरणे आहेत. आता धरणे बांधायला जागाच शिल्लक राहिलेली नाही. सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांत फळबाग शेतीची भरभराट आहे. पुणे-बंगलोर आणि पुणे-हैदराबाद महामार्ग आहेत. तुळजाभवानी, पंढरपूरचा विठोबा, कोल्हापूरची अंबाबाई, जोतिबा, नृसिंहवाडीचे दत्त देवस्थान अशी अनेक धार्मिक केंद्रे आहेत, ती पर्यटनासाठीची आकर्षणे आहेत. विशेष म्हणजे, सातारा आणि कोल्हापूर परिसराला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. पारगड ते प्रतापगडापर्यंत देदीप्यमान इतिहासाचे दाखलेच आहेत. वीरांनी गाजविलेली ही रणभूमी आहे.
कोल्हापूरचा लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या क्रांतिकारी जीवनाचा पट समजून घ्यायला दिवस अपुरे पडतील.ही सर्व सारिपाटासारखी मांडणी केली तरी त्यास आधुनिकतेची जोड द्यावी लागणार आहे. पर्यटनवाढीसाठी असो, औद्योगिकीकरणासाठी असो की, सध्याचा शिक्षणाचा दर्जा असो, त्यात आमूलाग्र बदल करावा लागणार आहे. त्यासाठी असलेल्या शैक्षणिक संस्थांचे रूप पालटून टाकले पाहिजे. शिवाजी विद्यापीठाचा विस्तार त्या गुणवत्तेच्या आधारे केला पाहिजे. सोलापूरच्या अहिल्याबाई होळकर विद्यापीठाचा दर्जा बदलला पाहिजे. दक्षिण महाराष्ट्राची राजधानी किंवा मुख्य केंद्र म्हणूून कोल्हापूरची निवड करून नियोजन करायला हवे. मिरज आणि सोलापूर तसेच कुर्डुवाडी ही रेल्वेची मुख्य केंद्रे होतील. कोल्हापूरचे विमानतळच मुख्य असेल. त्याला जोडणाºया रस्त्यांचा विकास झाला, तर कºहाडच्या विमानतळाची गरज राहणार नाही. कोल्हापूरला १९३९ मध्ये छत्रपती राजाराम महाराज यांनी विमानतळ करून विमानसेवा सुरू केली होती. भारतात १९२८ मध्ये विमानसेवा सुरु झाली. त्यानंतर केवळ अकरा वर्षांत कोल्हापूरला ती पोहोचली. मात्र, अद्याप पूर्ण सेवा नाही. रात्रीचे विमान उड्डाण होत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिवसा कोल्हापूरला येतात आणि रात्री बेळगाव विमानतळावरून मुंबईला रवाना होतात. नाईट लँडिंग किंवा फ्लाईटची सोय नसावी, हे दुर्दैवी आहे. या विमानतळाचा इतिहास ८0 वर्षांचा आहे. आणखी २0 वर्षांनी त्याची शताब्दी होईल. हे विमानतळ परिपूर्ण करण्याऐवजी कºहाडलाही विमानतळ तयार करण्याची घाई झाली.
कोकण रेल्वेचीही हीच अवस्था आहे. वास्तविक दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक कोकण किनारपट्टीवरील जयगड बंदराशी जोडता येऊ शकतो. उरणच्या जवाहरलाल नेहरू बंदरावर इतका ताण आहे की, आपला माल अनेक दिवस तेथे पडूनच राहतो. साखर असो की फळे यांचा आंतरराष्ट्रीय व्यापार करण्यासाठी जयगड बंदराचा उपयोग करून घेता येऊ शकतो. त्यासाठी कोकण रेल्वेला कोल्हापूर जोडले पाहिजे. ही मागणी अनेक दशके पूर्ण होत नसताना कºहाड ते चिपळूण मार्गाची आखणी करण्यात आली. वास्तविक पावणे दोनशे वर्षांच्या रेल्वेच्या इतिहासात कोकण ते उर्वरित महाराष्ट्र जोडणारे पुणे-मुंबई आणि नाशिक-मुंबई दोनच मार्ग आहेत. तिसरा करण्याची एक मागणी (कोल्हापूर-वैभववाडी) पूर्ण होत नसताना कºहाडचे घोडे दामटण्यात येत आहे. इचलकरंजी शहरापासून १२ किलोमीटरवरून रेल्वेलाईन जाते. हातकणंगलेचे स्थानक आहे, तरीही बारा किलोमीटर आत रेल्वे घेऊन जाण्याचा वायफळ खर्चाचा आग्रह धरण्यात येतो.
हातकणंगले स्थानकच विकसित केले जाऊ शकते. इचलकरंजी ते हे स्थानक चौपदरी रस्त्याने जोडले तर नुकसान कोणाचेच होणार नाही. आता प्रत्येकाच्या घरात वाहने आहेत. रेल्वे प्रत्येकाच्या दारात घेऊन जाण्याचा आग्रह कशासाठी?दक्षिण महाराष्ट्राचा पूर्व भाग दुष्काळाने होरपळतो आहे. कोयना धरणातील पाणी पश्चिमेकडे वळविले आहे. ते कमी करून पूर्वेला देता येऊ शकते. शिवाय पुणे परिसरातील ४८ टीएमसी पाणी पूर्णत: इंद्रायणी, मुळा-मुठा नदीतून पूर्वेला सोडत राहिले तर उजनीचे धरण बारमाही तुडुंब भरून राहील. जेणेकरून दुष्काळी पट्ट्यात तसेच मराठवाड्याच्या आणि कर्नाटकच्या काही भागाला पाणी देता येईल. विजेची गरज पर्याय ऊर्जा स्रोतातून भागविता येऊ शकते. पूर्वेच्या डोंगराळ भागात सौरऊर्जेची शेतीच करता येऊ शकते. हजारो हेक्टर शेती उजाड पडली आहे. त्यावर सोलर प्लॅनर्स टाकली आणि त्याची ऊर्जा वापरता येऊ शकते. कृष्णा खोºयातील ऊर्जेसाठी वापरण्यात येणारे ११८ टीएमसी पाणी वापरता येईल. दक्षिण महाराष्ट्रात एकही मोठी संशोधन संस्था नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात पशुधन आहे; पण शिरवळला एकमेव पशुचिकित्सालय महाविद्यालय आहे. सोलापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात पशुपैदास उत्तम होऊ शकते. त्यासाठी ऊस नव्हे, तर चारानिर्मितीच्या शेतीस प्रोत्साहन द्यायला हवे. गाई, म्हशी, शेळ्या-मेंढ्या पालनासाठी अनुदान द्यायला हवे. दूध आणि मांसनिर्मिती होऊ शकते.
शिक्षणसंस्थांची प्रगती करायला हवी. फालतू अभियांत्रिकी बंद करून वालचंद, केआयटीसारखी किंवा शिवाजी विद्यापीठाने सुरू केलेल्या इंजिनिअरिंग विभागाला अनुदान देऊन त्यांना आयआयटीचा दर्जा द्यायला हवा आहे. वैद्यकीय महाविद्यालये रडतखडत चालू आहेत. त्यांना एम्स्ची जोड का नको? कागलच्या फाईव्ह स्टार एमआयडीसीचा विस्तार आणि विकास होत नाही. खंडाळ्याच्या औद्योगिक वसाहतीप्रमाणे अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या सोलापूर आणि कोल्हापूरला येतील, असा प्रयत्न पाहिजे. सध्याचा उच्चशिक्षित तरुण या भागात राहतच नाही. तो स्थलांतरित होत आहे. म्हणून या चार जिल्ह्यांतील मतदारांची संख्या अपेक्षेप्रमाणे किंवा महाराष्ट्राबरोबर समान वाढत नाही. परिणामी, पाच आमदारांची संख्या कमी झाली आणि एक खासदारही कमी झाला. (कºहाड मतदारसंघ नाहीसा झाला) ही अविकसित भाग राहण्याची लक्षणे आहेत.
दक्षिण महाराष्ट्रात महाबळेश्वर, पाचगणी, तापोळा, वासोटा किल्ला, प्रतापगड, कोयना अभयारण्य ते कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील महाकाय पाणीसाठ्याचा वापर पर्यटनासाठी करून घेता येऊ शकतो. कोल्हापूरला तर पर्यटनाचा विशेष दर्जा द्यायला हवा. येथे धार्मिक, ऐतिहासिक, सामाजिक, चित्रपट, क्रीडानगरी, आदी सर्व प्रकार आहेत. आंबा, अणुस्कुरा, गगनबावडा, दाजीपूर, रांगणा किल्ला, आंबोली ते पारगड-तिलारी धरण परिसर हा सर्व सुंदर पर्यटनाचा पट्टाच आहे. कांझीरंगा किंवा बंदीपूर अभयारण्याचे आपण कौतुक करतो. मात्र कोयना, चांदोली आणि दाजीपूर ही तीन मोठी अभयारण्ये आहेत. त्यांचा पर्यटनासाठी वापर किती करून घेतो आहोत?या सर्व पर्यटन कॉरिडॉरसाठी आधुनिकतेचीही जोड द्यायला हवी. कोकण किनारपट्टीवरील पर्यटनाचाही विकास करायला हवा आहे. तरच महाबळेश्वर, पाचगणी, कोयना आणि कोल्हापूरचे पर्यटन वाढीस लागेल. कोकण आणि गोव्याला जाणारे पर्यटक एक-दोन दिवस या परिसरात राहतात. तसे न होता त्यांचा मुक्काम चार दिवस राहील, असे पाहायला हवे. मराठी चित्रपटांचे माहेर कोल्हापूर आहे. रामोजीराव फिल्म सिटीएवढी नसेल तरी छोटी फिल्मसिटी उभारून तिला संग्रहालयाची जोड द्यायला हवी. राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर उत्तम, दर्जेदार संग्रहालय हवे. साताऱ्याला प्रतिसरकारचा इतिहास सांगणारे संग्रहालय का करू नये? नाट्यगृहे हवीत. मैदाने हवीत.
राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणाचे केंद्र कोल्हापूरला करायचे नाही? येथे शंभर वर्षांहून अधिक वर्षांची क्रीडा परंपरा आहे ती विसरून जायचे? म्हणून मांडावेसे वाटते की, दक्षिण महाराष्ट्रातील सहा खासदारांनी एकत्र येऊन अजेंडा तयार करावा. या भागाला कशाची कमतरता नाही. कमतरता आहे ती व्हिजन असलेल्या राजकीय नेतृत्वाची! यासाठीच साऊथ महाराष्ट्र डेव्हलपमेंट कॉरिडॉर स्थापन करण्याचा आग्रह आपण धरला पाहिजे. अन्यथा, तरुण पिढी पुणे, बंगलोर, हैदराबाद मार्गे युरोप आणि अमेरिकेत चाकºया करण्यासाठी जातील आणि आपण वृद्धाश्रमच काढत बसू! यासाठी खासदारांनी काम करावे. त्यांनी कोणाचे मयत किंवा लग्न समारंभ केला नाही तरी चालतो!