जगाच्या पाठीवरचं एखादं गाव “आपल्याकडे पूर्वीसारखी फुलपाखरं का बरं येत नसतील?” या काळजीने हैराण झाल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? कॅलिफोर्नियातल्या ‘पॅसिफिक ग्रोव्ह’ या गावातल्या लोकांना मात्र ही खंत वाटतं होती खरी. त्यांचं गाव ओळखलं जातं ते “मोनार्च फुलपाखरांचं गाव” म्हणून! पण गेल्यावर्षी या गावात ठरल्यावेळी फुलपाखरांचे थवे उडत उडत आलेच नाहीत आणि अख्ख्या गावालाच मोठी चुटपुट लागून राहिली.
या गावाचं वैभव म्हणजे दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च महिन्यात या गावात येणारी मोनार्च फुलपाखरं. पाहाता क्षणी मन हरखून टाकणारं सौंदर्य लाभलेली ही फुलपाखरं. लालसर नारिंगी रंगाची. पंखांवर गडद काळ्या रेघा असलेली. पंखाच्या भोवती काळी कडा आणि पंखांवर मोठे पांढरे ठिपके असलेली. गेल्या काही वर्षांपासून कॅलिफोर्नियात या वेस्टर्न मोनार्च फुलपाखरांची संख्या घटते आहे. मागच्या वर्षी तर ‘पॅसिफिक ग्रोव्ह’ या गावात एकही मोनार्च दृष्टीस पडलं नाही म्हणून येथील लोक हळहळत होते. पण या वर्षी कॅलिफोर्नियात ही फुलपाखरं दिसू लागली आणि लोकांमध्ये आनंद पसरला आहे. या चिमुकल्या रंगीबेरंगी पाहुण्यांच्या ओढीने पर्यटक येतील म्हणून या गावातले नागरिक आनंदी आहेत.
ही फुलपाखरं परत येताहेत हे इथल्या पर्यावरणाचं जैविक आरोग्य सुधारत असल्याचं लक्षण! वातावरणातील बदल, त्यांच्या अधिवासाचा नाश/नुकसान आणि दुष्काळामुळे अन्नाची कमतरता या कारणांमुळे कॅलिफोर्नियातील ही मोनार्च फुलपाखरं कमी झाली, असं पर्यावरण तज्ज्ञ सांगत आहेत.
मागच्या वर्षी ‘एक्सर्सेस सोसायटी’ने कॅलिफॉर्नियाच्या थंडीत मोनार्च फुलपाखरांची गणना केली असता ती 2000 पेक्षाही कमी भरली. गेल्या काही वर्षातला हा निचांक होता. उत्तर कॅलिफॉर्नियातील मेनडॉसिनो परगाणा ते बाजा कॅलिफॉर्निया या मेक्सिकन शहरातील झाडांवर हिवाळ्यात कोटींच्या संख्येत आढळणाऱ्या मोनार्च फुलपाखरांची संख्या 1980 पासून घटत असून ती गेल्या काही वर्षात काही हजारांवर आलेली आहे. वातावरण बदल, शेती करण्याची बदलेली पद्धत याबरोबरच मोनार्चच्या स्थलांतरणाच्या प्रवास मार्गावरील झाडांचा मोहोर आणि जंगली फुलं कमी होणं यामुळे फुलपाखरांची संख्या घटली असल्याचं संशोधक सांगतात.
1980 पासून मोनार्च फुलपाखर थवे ज्या ज्या भागात थंडीच्या हंगामात राहायला यायचे त्या जागाही कमी झाल्या! सध्या ही फुलपाखरं प्रामुख्याने कॅलिफोर्नियाच्या मध्य किनाऱ्यावर आढळतात. यावर्षीची मोनार्च फुलपाखरांची औपचारिक गणना नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू झाली. पण संशोधकांनी आणि मोनार्च फुलपाखरांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवकांनी अनौपचारिक गणना त्याआधीच सुरू केली होती. सुमारे 50,000 मोनार्च फुलपाखरं त्यांच्या थंडीतल्या मुक्कामाच्या ठिकाणी आढळली. ही खूप मोठी संख्या नसली, तरी त्यांच्या येण्यानं आता आशा निर्माण झाली आहे. ही पश्चिम मोनार्च फुलपाखरं दरवर्षी हिवाळ्यात वायव्य पॅसिफिकवरून कॅलिफोर्नियाला येतात. थंडीत उब मिळावी म्हणून ज्या झाडांवर ती आधी राहिली होती त्याच झाडांवर ती न चुकता पुन्हा येऊन बसतात आणि मार्चमधे वातावरण गरम होऊ लागलं की सर्वत्र पसरतात. पश्चिम भागातून येणाऱ्या मोनार्च फुलपाखरांच्या कॅलिफोर्निया पॅसिफिक किनाऱ्यावर थंडीत मुक्काम करण्याच्या शंभरेक जागा आहेत. पॅसिफिक ग्रोव्ह गावातलं ‘मोनार्च ग्रोव्ह अभयारण्य’ ही प्रसिद्ध जागा! जिथे मागच्या वर्षी एकही मोनार्च दृष्टीस पडलं नाही.
सॅन फ्रान्सिस्कोपासून 112 किलोमीटर अंतरावर असलेलं पॅसिफिक ग्रोव्ह हे गाव अमेरिकेतील ‘बटरफ्लाय टाऊन’ म्हणूनच ओळखलं जातं. या शहरात ऑक्टोबरमधे या मोनार्च फुलपाखरांची नयनरम्य परेड साजरी होते. ज्याचा आनंद घ्यायला जगभरातून पर्यटक येतात. या फुलपाखरांना कोणी त्रास दिला, तर तो इथे दंडनीय गुन्हा असून त्यासाठी 1,000 डॉलरचा दंड आकारला जातो.
फुलपाखरांवर जीवापाड प्रेम करणारी या गावातली माणसं आणि खास करून या गावातले तरुण स्वयंसेवक आपल्या गावावर फुलपाखरांनी रुसू नये म्हणून जिवाचं रान करीत आहेत. हजारो फुलपाखरांचे ठावे गावात विहरतानाचं नयनरम्य दृश्य पाहाता यावं या मोहाने अख्ख्या देशभरातून पॅसिफिक ग्रोव्हमध्ये येणारे पर्यटक या गावाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावतात, हे त्यामागचं एक कारण तर आहेच; पण या देखण्या, चिमुकल्या जिवांना आपण पुरेसं दाणापाणी देऊ शकत नाही याचा मोठा विषाद या गावकऱ्यांना अधिक त्रास देतो आहे. ही पृथ्वी केवळ आपली एकट्याची नव्हे, इथे जगणाऱ्या इवल्या जिवांचा आणि चिमुकल्या पाखरांचाही या भूमीवर तेवढाच अधिकार आहे, याची जाणीव माणसामध्ये कायम असल्याचा दिलासा देणारी ही बातमी महत्त्वाची आहे ती म्हणूनच!
फुलपाखरांना अन्नपाणी कसं मिळेल?कॅलिफोर्नियामधे सलग काही वर्षांपासून दुष्काळ पडत आहे. त्यामुळे मोनार्च फुलपाखरांना पोट भरायला पुरेसं अन्न मिळणं मुश्कील झालं आहे. त्यांच्या अन्नपाण्याचे स्रोत जगावेत म्हणून प्रयत्न होत आहेत. या फुलपाखरांच्या संरक्षणासाठी राज्य आणि संघराज्य स्तरावर कायदेशीर तरतूदीही केल्या जात आहेत.!