जगभरातील कोणताही अभ्यास घ्या.. तो हेच सांगतो, बहुसंख्य मुलांना कोणता विषय अवघड जातो, तर तो गणितच! त्यासाठी संशोधन करण्याचीही गरज नाही. दहावी, बारावी किंवा कोणत्याही वर्गातील, वयोगटातील मुलांच्या नापास होण्याचं प्रमाण बघितलं, तर ते गणितातच आणि त्यानंतर इंग्रजीत दिसेल. आपल्याकडे तर आजवर अनेक अहवालही प्रकाशित झालेत, त्यात वेळोवेळी हेच सिद्ध झालं आहे की, दुर्गम भागातील बऱ्याच शाळांतील अनेक मुलांना मोठ्या वर्गांत म्हणजे पाचवी-सहावी किंवा त्यापेक्षाही पुढच्या वर्गातील मुलांना साधी बेरीज-वजाबाकीही करता येत नाही! याचा अर्थ दुर्गम, आदिवासी, ग्रामीण भागातील सरकारी शाळांतील मुलांनाच गणित अवघड जातं, तिथे नीट शिकवलं जात नाही, असा नाही. उलट अनेक ठिकाणी ग्रामीण भागातील शिक्षक फारच मनापासून आणि वेगवेगळ्या कल्पक योजना आखून मुलांना शिकवतात. त्यात गणितासह सर्वच विषयांचा समावेश आहे.. मात्र गणित अनेक मुलांना अवघड जातं, समजत नाही, ही वस्तुस्थिती आहे..
पण निसर्गात काही प्रकारचे मासे, अनेक पक्षी, मधमाशा यांना गणित ‘उत्तम’ जमतं, गणितातली त्यांची प्रगती चांगली असते, असं सांगितलं तर?...- हो, ही वस्तुस्थिती आहे..
जर्मनीच्या बॉन युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी नुकताच एक प्रयोग केला. त्यात त्यांना आढळून आलं की, काही प्रकारच्या माशांमध्ये गणिती बुद्धिमत्ता चांगली असते. त्यांच्या दृष्टीनं ‘किचकट’ असलेली गणितंही ते सोडवू शकतात. त्यासाठी या संशोधकांनी काय करावं? - त्यांनी या माशांना थेट गणितच शिकवायला घेतलं! सिचिल्ड्स आणि स्टिंगवे या दोन प्रकारच्या माशांना त्यांनी गणिताचं, म्हणजे बेरीज-वजाबाकीचं थोडं ट्रेनिंग दिलं..
बॉन युनिव्हर्सिटीच्या संशोधक आणि झूलॉजीच्या प्रोफेसर डॉ. वेरा श्लूसेल सांगतात, या माशांना दिलेल्या संख्येत एक हा आकडा मिळवायला किंवा वजा करायला आम्ही शिकवलं. तसंच दिलेल्या संख्येतील मोठी संख्या कोणती आणि लहान संख्या कोणती हेही त्यांना शिकवलं. त्यात ते लवकरच पारंगत झाले.
काही जणांच्या मते प्राणी जगतातील सर्वांत मंदबुद्धी प्राणी म्हणजे मासे. कारण त्यांची स्मरणशक्ती- लक्षात ठेवण्याची क्षमता फक्त तीन सेकंद आहे. पण हेच मासे सोप्या बेरीज-वजाबाक्या करू शकतात, हे संशोधकांनी सिद्ध करून दाखवलं. त्यामुळे पूर्वीचा समज खोडून काढताना पक्षी आणि काही प्राण्यांमध्ये जशी बऱ्यापैकी बुद्धिमत्ता असते, त्याप्रमाणेच काही प्रजातींचे मासे ‘हुशार’ असतात, हे त्यांनी सप्रमाण सिद्ध करून दाखवलं.
संशोधकांनी सिचिल्ड्स आणि स्टिंगवे या प्रजातीचे नऊ मासे घेतले. यातील सिचिल्ड्स प्रजातीचे मासे झेब्रा मबुना या नावानं ओळखले जातात. कारण त्यांच्या अंगावर झेब्र्यासारखे पट्टे असतात. संशोधकांनी जो प्रयोग केला, त्यात त्यांनी या माशांना वेगवेगळ्या रंगाचे आणि आकाराचे काही डिस्प्ले कार्ड्स दाखवले. त्याद्वारे त्यांना प्रशिक्षण देण्यात आलं. या माशांच्या समोर दोन दरवाजे होते. वेगवेगळ्या संख्या आणि आकाराच्या डिस्प्ले कार्ड्सच्या मदतीनं माशांना योग्य दरवाजापर्यंत पोहोचायचं होतं. निळ्या रंगाचे कार्ड्स जर त्यांना दाखवले, तर त्यातून त्यांना एक मिळवायचा होता आणि पिवळ्या रंगाचे कार्ड्स दाखवले तर त्यातून एक वजा करायचा होता. हे जर त्यांना समजलं आणि त्यांनी योग्य कृती केली, योग्य दरवाजातून ते आत गेले, तर त्यांच्यासाठी ‘खाऊ’ ठेवण्यात आला होता.
या दोन्ही प्रजातींच्या माशांना वजाबाकीपेक्षा बेरीज करणं अधिक सोपं गेलं. दिलेलं गणित बरोबर सोडवण्यासाठी झेब्रा मबुना जातीच्या माशांसाठी सरासरी २८ सेशन्स, तर स्टिंगरेज या जातीच्या माशांसाठी ६८ सेशन्स घेण्यात आली.झेब्रा मबुना जातीच्या माशांना ३८१ वेळा बेरजेचे प्रश्न विचारण्यात आले. त्यापैकी २९६ वेळा त्यांनी बरोबर उत्तर सोडवलं.
म्हणजेच एकूण ७८ टक्के वेळा त्यांनी बरोबर उत्तर दिलं. स्टिंगरेज जातीच्या माशांना १८० प्रश्न विचारण्यात आले, त्यात १६९ वेळा म्हणजेच ९४ टक्के वेळा त्यांनी बरोबर उत्तरं दिली. वजाबाकी मात्र या दोघाही प्रकारच्या माशांना थोडी अवघड गेली. झेब्रा मबुना जातीच्या माशांनी ३८१ पैकी २६४ वेळा बरोबर म्हणजे ६९ टक्के वेळा बरोबर उत्तरं दिली, तर स्टिंगरेज प्रकारच्या माशांनी १८० पैकी १६१ वेळा वजाबाकीची गणितं बरोबर सोडवली. म्हणजेच त्यांच्या बरोबर उत्तरांची टक्केवारी ८९ टक्के इतकी होती. निसर्गातले काही पक्षी, मधमाशा तसेच इतरही काही प्राण्यांना गणिती आकलन होऊ शकतं, हे शास्त्रज्ञांनी याआधीच सिद्ध केलं आहे.
माशांनी पाण्यात चालवली कार! या दोन्हीही जातीचे मासे शिकारी नाहीत. संशोधकांच्या मते गणिती प्रक्रिया येत असल्यामुळे दैनंदिन आयुष्यात या माशांना काही फायदाही होत नाही आणि तोटाही होत नाही, पण एखादं अधिकचं ‘स्किल’ कोणाकडे असलं, तर भविष्यात त्यांना ते उपयोगी पडू शकतं. त्यांच्या मते कोणत्याही जीवाला कमी समजण्याचं कारण नाही. माशांनाही संज्ञात्मक आकलन असतं, हे आता सिद्ध झालं आहे. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या एका संशोधनात माशांनी पाण्यात छोटी कारही चालवून दाखवली होती!